nagar politics | Sarkarnama

पालकमंत्र्यांमुळेच गोंधळ अन्‌ पाचपुतेंचीही फोडणी 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 3 मे 2017

पुणेकरांची पाण्यातील दादागिरी मोडीत काढण्यासाठी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी नगरकरांना एकत्र करून नियोजन करणे आवश्‍यक आहे. तसे होत नसल्याने पाण्याच्या सगळ्या गोंधळाला ते तर जबाबदार आहेतच; पण माजी पालकमंत्री बबनराव पाचपुतेही "मीच केले' असे सांगत कायमच पाण्याबाबतच्या गोंधळाला फोडणी देतात, अशी टीका साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांनी केली. 

नगर : पुणेकरांची पाण्यातील दादागिरी मोडीत काढण्यासाठी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी नगरकरांना एकत्र करून नियोजन करणे आवश्‍यक आहे. तसे होत नसल्याने पाण्याच्या सगळ्या गोंधळाला ते तर जबाबदार आहेतच; पण माजी पालकमंत्री बबनराव पाचपुतेही "मीच केले' असे सांगत कायमच पाण्याबाबतच्या गोंधळाला फोडणी देतात, अशी टीका साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांनी केली. 

नागवडे यांनी तोंडसुख घेताना पालकमंत्र्यांवर खरमरीत टीका केली. ते म्हणाले, ""कुकडी प्रकल्पात पाणीसाठा असतानाही उन्हाळ्यात किमान फळबागांना पाणी देण्याचा निर्णय अपेक्षित होता. बैठकीत पिण्याचे पाणी देण्याचा निर्णय करणारे शिंदे यांनी मात्र त्यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघात शेतीला पाणी असल्याचे सांगून गोंधळ केला. फळबागांना पुरेल एवढे पाणी धरणांमध्ये होते, तर मग तसा निर्णय का घेतला नाही? तेही पाचपुते यांच्याप्रमाणेच पुणेकरांच्या दडपणाला बळी पडत असल्याचे दिसते.'' 

पाचपुतेंचा मी पणा 
पाचपुते यांच्याबद्दल बोलताना नागवडे म्हणाले, ""ज्यांच्याकडे अनेक वर्षे सत्ता होती, ते आजही "मीच केले, मीच केले' अशी टिमकी वाजवीत बसले आहेत. "कुकडी'-"घोड'च्या पाण्याचे वाटोळे करण्यात त्यांचाच मोठा वाटा आहे. हवेतील घोषणा करण्यात पटाईत असणाऱ्या पाचपुते यांनी माझ्या आमदारकीच्या काळात झालेल्या कामांचेही श्रेय लाटले. बीड-श्रीगोंदेमार्गे न्हावरा मार्ग आपल्या प्रयत्नामुळे 1980मध्ये मंजूर झाला. आबासाहेब निंबाळकर मंत्री असताना निमगाव खलूमार्गे उस्मानाबाद मार्ग आपण मंजूर करून घेतला. न केलेल्या कामांचेही श्रेय लाटण्यात पटाईत असलेले हे महाशय "मीच केले' असे सांगून जनतेची दिशाभूल करीत आहेत.''

संबंधित लेख