Nagar Police negligence in Kalaspimpri | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

पोलिसांचा निष्काळजीपणा :  कळसपिंप्री येथील मारामारीत बारा जखमी, एकाचा मृत्यू

सरकारनामा
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

या प्रकरणी गेल्या काही दिवसांपासून वाद धुमसत होता, परंतु पोलिसांनी निष्काळजीपणा दाखविला. त्यामुळे एकाला जीव गमवावा लागला, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.

पाथर्डी (जि. नगर) :  कळसपिंप्री (ता. पाथर्डी) येथील शासकीय गायरान जमिनीत अतिक्रमण करण्याच्या वादातुन मारामारी झाली. यामध्ये दोन्ही बाजुचे बारा जण जखमी झाले.

पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन सात जणांना नगर येथे उपचारासाठी पाठविले होते. नगर येथे उपचारादरम्यान जखमी कंस लक्ष्मण पवार (६५ वर्षे) यांचा मृत्यू झाला. 

या प्रकरणी गेल्या काही दिवसांपासून वाद धुमसत होता, परंतु पोलिसांनी निष्काळजीपणा दाखविला. त्यामुळे एकाला जीव गमवावा लागला, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.

कळसपिंप्री गावात गायरान जमीन आहे. या जमीनीत काही लोकांनी अतिक्रमण केले आहे. कृषी विभागाचे जलयुक्त शिवार योजनेचे खोल समतल चराचे काम अतिक्रमण करणा-या करणा-या कुटुंबाने अडविले.

गावातील सरपंच, ग्रामसेवक व ग्रामस्थांनी याबाबत पंचवीस आॅगस्ट २०१८ पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांची भेट घेतली. हा जमीनीचा विषय असल्याने तुम्ही तहसीलदारांना भेटा, असे रत्नपारखी यांनी सांगितले. तहसीलदार नामदेव पाटील यांची ग्रामस्थांनी सोमवारी भेट घेतली. 

त्यांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिका-यांचे पत्र  आणावे, असे सांगितले. मंगळवारी ग्रामस्थांनी गटविकास अधिका-यांचे पत्र घेवुन पोलिस निरीक्षकांना दिले. पोलिस सरंक्षण द्या, असे पोलिसांना मंगळवारी मागणी केली. तुम्ही पुढे जा पोलिस येतील, असे सांगितल्याने ग्रामस्थ गावाकडे गेले. तेथे कृषी विभागाचे काम सुरु होते. 

सरपंच,माजी सरपंच व सदस्य आणि ग्रामस्थ यांच्यावर अतिक्रमण करणा-या कुंटुबाने हल्ला केला. यामधे सरपंच बद्रीनाथ भगवान येढे (वय ३२ वर्षे), माजी सरपंच भगवान संतराम सोनवणे (वय ५५ वर्षे), विश्वनाथ नारायण बुळे, (वय ४१ वर्षे) , संदिप रावसाहेब मिसाळ (वय  २५ वर्षे), संदिप शिवाजी मिसाळ (वय २५ वर्षे), कमलाकर गणपत गाडे ( वय ३० वर्षे), दादासाहेब बन्सी झिरपे (वय ३२ वर्षे), ज्ञानेश्वर गोवर्धन मिसाळ (वय २६ वर्षे), मैनाबाई विठ्ठल बर्डे (वय६५ वर्षे). शोभा शिवाजी बर्डे (वय-३०), बाळु अर्जुनगायकवाड(वय-३० वर्षे) , कंस लक्ष्मण पवार (वय६५ वर्षे)  हे जखमी झाले.  बद्रीनाथ येढे ,भगवान सोनवणे, विश्वनाथ बुळे, मैनाबाई बर्डे, शोभा  बर्डे , बाळु गायकवाड, कंस पवार यांना पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात उपचार करुन नगरला पाठविले आहे. या वेळी दोन्ही गटामधे मारामारी झाल्याने ग्रामस्थ सैरभैर पळाले. नगर येथे उपचार सुरु असताना कंस पवार यांचा आज मृत्यू झाला. 

पोलिसांचा  निष्काळजीपणा
कळसपिंप्री येथील अतिक्रमणाचा प्रश्न पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला असता, तर ही घटना टाळता आली असती. मात्र पोलिस तेथे गेलेच नाही .मारामारी झाल्यानंतर मात्र पोलिस लगेच घटनास्थळी गेले. त्यामुळे ग्रामस्थांमधून पोलिसांच्या विरोधात तीव्र असंतोष आहे.      

संबंधित लेख