nagar parner crisis | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

देशात 277 ठिकाणी भाजपचे उमेदवार आघाडीवर
देशात एनडीएचे 314 उमेदवार आघाडीवर असून यूपीएचे 112 उमेदवार आघाडीवर आहे.
पूनम महाजन - 850 मतांनी आघाडीवर, प्रिया दत्त पिछाडीवर
राहुल गांधी पिछाडीवरून पुन्हा आघाडीवर
पुणे : पहिल्या फेरित एनडीए तीनशे जागांवर आघाडीवर असल्याचे चित्र आहे.
रायबरेलीत सोनिया गांधी आघाडीवर आहेत
दक्षिण मध्य मुंबईत पहिल्या फेरीत शिवसेना उमेदवार राहुल शेवाळे आघाडीवर...

उद्धव ठाकरेंसमोरच निलेश लंके गटाचा तमाशा!

मुरलीधर कराळे 
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

पारनेरमध्ये शिवसेनेत फूट पडत असल्याची कुणकूण गेल्या एक वर्षांपासून सुरू होती. शिवसेनेचे आमदार विजय औटी यांच्या विरोधात तालुकाप्रमुख निलेश लंके दंड थोपटून उभे राहू शकतात, ही चर्चा आता खरी घडू पाहत आहे. आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उदधव ठाकरे यांच्या सभेतच याचे दर्शन घडल्याने आगामी विधानसभेत औटी विरुद्ध लंके अशी लढत जवळजवळ निश्‍चित होऊ पाहत आहे. 

नगर : पारनेरमध्ये शिवसेनेत फूट पडत असल्याची कुणकूण गेल्या एक वर्षांपासून सुरू होती. शिवसेनेचे आमदार विजय औटी यांच्या विरोधात तालुकाप्रमुख निलेश लंके दंड थोपटून उभे राहू शकतात, ही चर्चा आता खरी घडू पाहत आहे. आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उदधव ठाकरे यांच्या सभेतच याचे दर्शन घडल्याने आगामी विधानसभेत औटी विरुद्ध लंके अशी लढत जवळजवळ निश्‍चित होऊ पाहत आहे. 

शिवसेनेचे तालुकाध्यक्ष निलेश लंके यांनी गेल्या पाच वर्षांत पारनेर विधानसभा मतदारसंघात जोरदार संपर्क मोहीम राबविली आहे. ग्रामस्थांना घेऊन धार्मिक सहली काढायच्या, त्यानिमित्ताने प्रत्येक गावातील लोकांची निवड करून त्यांना सहभागी करून घ्यायचे व त्यांचा आशिर्वाद घ्यायचा, ही जनसंपर्काची अफलातून मोहीम त्यांची यशस्वी झाली आहे. त्यामुळे आगामी काळात लंके विधानसभेचे उमेदवार होऊ शकतील, असा राजकीय अंदाज बांधला जात होता. याबाबत एकदा लंके यांनी स्पष्टीकरण देताना आपली तशी तयारी नसल्याचे सांगून विषयाला बगल देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र औटी यांच्याशी त्यांचे सौख्य राहिले नसल्याचेही दिसून येत होते. या पार्श्वभूमीवर आज झालेल्या कार्यक्रमात लंके आता स्वतंत्रपणे स्वतःचे अस्तित्त्व दाखवू इच्छितात, हे स्पष्ट झाले. 

आमदार विजय औटी यांच्या वाढदिवसानिमित्त आजचा हा मेळावा झाला असला, तरी उदधव ठाकरे यांना निमंत्रण देताना लंके यांना बोलावण्यात आले नव्हते. तसेच पक्ष प्रमुख तालुक्‍यात येत आहेत, म्हटल्यावर तालुकाप्रमुखाकडे नियोजन आवश्‍यक असताना या सर्व जबाबदारीपासून आमदार औटी यांनी लंके यांना दूरच ठेवले. कार्यक्रमाचे नियोजन करताना लंके यांचा सहभाग कुठेही नव्हता. त्यामुळे लंके यांचे कार्यकर्ते नाराज झाले. त्याचाच परिणाम थेट पक्ष प्रमुखांच्या गाडीवर दगडफेक करण्यावर झाला असल्याची तालुक्‍यात चर्चा आहे. 

उद्धव ठाकरे यांच्या सभेदरम्यान निलेश लंके यांनी उपस्थित राहून ठाकरे यांचे आशिर्वादही घेतले. जिल्हा परिषद सदस्या राणी लंके याही उपस्थित होत्या. ठाकरे यांच्या सभेच्या दरम्यान मात्र लंके यांच्या कार्यकर्त्यांनी लंके यांच्या नावाचे फलक फडकावून जोरदार घोषणाबाजी करीत शक्तीप्रदर्शन केले. आधी सभेवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिलेले हे कार्यकर्ते अचानक येऊन शक्तीप्रदर्शन करतात, यामागे नेमका काय घडले, याबाबत आता राजकीय वर्तुळातून उत्सुकता आहे. 

सभेदरम्यान सुरू असलेली ही घोषणाबाजीच सर्वकाही सांगून जात होती. औटी व लंके यांच्यातील फूट त्यानिमित्ताने उघडपणे दिसून येत होती. सभेनंतर लंके यांच्या कार्यकर्त्यांकडून झालेली दगडफेक ही त्याचाच परिणाम होता. ही दगडफेक पक्ष प्रमुख उदधव ठाकरे यांच्या गाडीवर नव्हती, असा खुलाचा शिवसेनेचे काही नेते करीत असले, तरी हा ताफा ठाकरे यांचाच होता. आमदार औटी यांच्या गाडीची काच दगडाने फुटली, हे सत्य कुणी टाळू शकणार नाही. त्यामुळे लंके यांची कार्यक्रमाला उपस्थिती असली, तरी त्यांची नाराजी कार्यकर्त्यांच्या रुपाने पुढील आली. 

पक्षप्रमुखांसमोर झालेला पक्षांतर्गंत गोंधळ हा कोणाच्या पथ्यावर पडणार, हे काळच ठरविणार असला, तरी निलेश लंके शिवसेनेचा राजीनामा देतील, की पक्षच त्यांची हकालपट्टी करेल, याबाबत आता तालुक्‍यात खलबते सुरू झाले आहेत. लंके शिवसेनेतून बाहेर पडल्यास त्यांना राष्ट्रवादी किंवा कॉग्रेसचे नेते घेण्यास इच्छुक असल्याचे समजते. याबाबतचे काही संकेतही यापूर्वी मिळाले होते. त्यामुळे आगामी काळात शिवेसनेला सोडचिठ्ठी देऊन लंके आपला युवकांचा ताफा घेऊन इतर पक्षात दाखल होऊ शकतात, अशी राजकीय वर्तुळातून चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, इतर पक्षातीतील नेतेही आमदार विजय औटी यांची घोडदौड थांबविण्यासाठी जोरदार प्रयत्नशील आहेत. औटी यांच्या विरोधात वाटेल ते करण्याची तयारी राष्ट्रवादी व कॉग्रेस पक्षातील काही नेत्यांची आहे. त्यामुळे एक पाऊल मागे जात लंके यांना पुढे करण्यास काही नेते इच्छुक असल्याचे समजते. 

संबंधित लेख