nagar nilesh lanke new party isuue | Sarkarnama

शिवसेनेने हटवलेल्या निलेश लंकेंचा पक्ष शनिवारी स्पष्ट होणार? 

मुरलीधर कराळे 
गुरुवार, 8 मार्च 2018

पारनेर तालुक्‍यातील शिवसेनेत अखेर फूट पडून निलेश लंके यांना तालुका प्रमुख पदावरुन पायउतार व्हावे लागले. विकास रोहोकले यांची या पदावर नियुक्ती करून शिवसेना आमदार विजय औटी यांच्यामागे पक्ष भक्कमपणे उभा असल्याचे अधोरेखित झाले. त्यामुळे आता लंके कोणत्या पक्षात जाणार, याबाबत चर्चेला उधाण आले आहे. शनिवारी (ता. 10) लंके यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने लंके शक्तीप्रदर्शन करतील. त्या वेळी औटी यांचे विरोधक कोण-कोण येणार, यावरच पुढील भूमिका ठरणार आहे. 

नगर : पारनेर तालुक्‍यातील शिवसेनेत अखेर फूट पडून निलेश लंके यांना तालुका प्रमुख पदावरुन पायउतार व्हावे लागले. विकास रोहोकले यांची या पदावर नियुक्ती करून शिवसेना आमदार विजय औटी यांच्यामागे पक्ष भक्कमपणे उभा असल्याचे अधोरेखित झाले. त्यामुळे आता लंके कोणत्या पक्षात जाणार, याबाबत चर्चेला उधाण आले आहे. शनिवारी (ता. 10) लंके यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने लंके शक्तीप्रदर्शन करतील. त्या वेळी औटी यांचे विरोधक कोण-कोण येणार, यावरच पुढील भूमिका ठरणार आहे. 

लंके यांचे राष्ट्रवादी कॉग्रेसशी सौख्य आहे. भाजपचे दरवाजेही त्यांना उघडे राहू शकतील. पण लोकसभेसाठी डॉ. सुजय विखे यांना मदतीसाठी कॉग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील लंके यांना जवळ करतील, अशी शक्‍यताही व्यक्त होत आहे. 

पारनेर तालुक्‍यात भारतीय जनता पक्षाची ताकद कमी आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप चांगल्या उमेदवाराच्या शोधात आहे. त्यात चांगला जनसंपर्क असलेले व कार्यकर्त्यांचे आधीचेच जाळे असलेले लंके गळाला लागले, तर भाजप नेत्यांना आनंदच होईल, असे राजकीय वर्तुळातून बोलले जाते. त्यामुळे लंके यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचे जिल्ह्यातील वरिष्ठ नेते येणार का, असे झाले तर याच दिवशी लंके यांच्याबाबतची भूमिका निश्‍चित होण्याची शक्‍यता असल्याचे बोलले जात आहे. 

राष्ट्रवादी कॉग्रेसचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुजीत झावरे यांच्याशी लंके यांचे मित्रत्त्वाचे संबंध आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीशी लंके यांचे सौख्य आहे. राष्ट्रवादीने लंके यांचा विचार केल्यास झावरे यांची विधानसभा लढविण्याची इच्छा अधुरी राहणार आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना तालुक्‍यात बोलावून शक्ती प्रदर्शन करणारे झावरे ही संधी सोडण्याची शक्‍यता नाही. त्यात आज नगरमध्ये झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकित पक्षाच्या नेत्यांनी इतर पक्षाच्या कार्यक्रमांना जाऊ नये, असे फर्मान काढले आहे. त्यामुळे लंके यांच्या वाढदिवसाला झावरे उपस्थित राहतील का, याकडे तालुक्‍याचे लक्ष लागले आहे. 

 

संबंधित लेख