Nagar news - Vikhe-Thorat crisis | Sarkarnama

विखेंचा थोरातांवर पुन्हा बॉम्ब

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

सभेचे कारण कोणतेही असो, व्यासपीठ कोणतेही असो, विखे-थोरात यांच्यामधील वादाला प्रत्येक वेळी काही ना काही कारणांनी फोडणी मिळते, हे नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमातूनही स्पष्ट झाले. आपले शेजारी असलेले स्वकियच चांगल्या कामांना गालबोट लावत असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी करून आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर आरोपाचा बॉम्ब टाकला.

नगर : सभेचे कारण कोणतेही असो, व्यासपीठ कोणतेही असो, विखे-थोरात यांच्यामधील वादाला प्रत्येक वेळी काही ना काही कारणांनी फोडणी मिळते, हे नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमातूनही स्पष्ट झाले. आपले शेजारी असलेले स्वकियच चांगल्या कामांना गालबोट लावत असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी करून आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर आरोपाचा बॉम्ब टाकला.

प्रवरानगर येथे विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सभा रविवारी झाली. त्यावेळी विखे यांनी थोरात यांना पुन्हा टीकेचे लक्ष्य बनविले. संकटांवर मात करीत विखे पाटील कारखान्याने सभासदांना उच्चांकी भाव दिला. पण संस्था बंद पाडण्याचा धंदा केला नाही. मात्र ज्यांनी शेतकरी कामगारांना वाऱ्यावर सोडले, ते आज चांगल्या कामांना गालबोट लावत आहेत. मात्र सुज्ञ असलेले शेतकरी ही वावटळ परतून लावतील, असा टोला विखे पाटील यांना लगावला.

धाकट्या भावाला वाऱ्यावर सोडणार नाही
सहकारी कारखानदारी टिकली पाहिजे, यासाठी धाकटा भाऊ असलेल्या गणेश सहकारी साखर कारखाना चालविण्यास घेतला. सध्या आर्थिक असंतुलन असले, तरी हा कारखाना यशस्वी चालविण्याची हमी घेतली आहे. केंद्र व राज्य सरकारच्या बदलत्या धोरणांचा विपरित परिणाम कारखान्यांवर होत आहे. त्यामुळे या कामगारांना वाऱ्यावर सोडणार नाही. ऊसउत्पादकांना चांगला भाव दिला जाईल, असे विखे यांनी ठणकावून सांगतिले.

थोरात यांच्या टीकेचा रोख विखेंवरच
विखे पाटील व थोरात यांच्यातील राजकीय वाद सर्वश्रूत आहेत. कॉंग्रेसमधील या दोन दिग्गजांच्या कलहामुळे कॉंग्रेसला चांगले दिवस पाहता येईनात, हा घरचा आहेर अनेक नेते करताना दिसतात. हा वाद एकदाचा मिटविण्याएेवजी दोन्ही नेत्यांकडून वारंवार होणाऱ्या वक्तव्यामुळे वाढतच असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर विखे यांनी केलेले हे वक्तव्य थोरात गटाला जिव्हारी लागले आहे. कालच झालेल्या संगमनेर शेतकरी संघाच्या कार्यक्रमात थोरात यांनी सरकारला टीकेच लक्ष्य केले. सरकारवर टीका करताना रोख मात्र विखे पाटील यांच्यावरच होता, हे उपस्थितांनी समजून घेतले.

संबंधित लेख