Nagar news - students agitation at shevgaon for school building | Sarkarnama

शेवगाव पंचायत समितीच्या आवारात भरली शाळा

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 28 जून 2017

बोडखे (ता. शेवगाव) येथील शाळेच्या इमारतीचा प्रश्न मार्गी न लागल्याने शिक्षक व पालकांनी शंभर विद्यार्थी पंचायत समितीसमोर आणून आवारातच शाळा भरविली. एव्हढेच नाही, तर सभापती व शिक्षण समितीच्या दारात जेवण करून अनोखे आंदोलन केले.

नगर : बोडखे (ता. शेवगाव) येथील शाळेच्या इमारतीचा प्रश्न मार्गी न लागल्याने शिक्षक व पालकांनी शंभर विद्यार्थी शेवगाव पंचायत समितीसमोर आणून आवारातच शाळा भरविली. एव्हढेच नाही, तर सभापती व शिक्षण समितीच्या दारात जेवण करून अनोखे आंदोलन केले.

बोडखे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या विदयार्थ्यांना बसण्यासाठी पर्याय उपलब्ध नसल्याने भर पावसाळ्यात उघडयावर बसून शिक्षण घेण्याची वेळ आली. नवीन इमारतीच्या बांधकामासाठी मंजूरी मिळालेली असतानाही बांधकामास सुरवात होत नसल्याने संतप्त पालक व ग्रामस्थांनी हे आंदोलन केले. जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष व शिक्षण समितीच्या सभापती असलेल्या राजश्री घुले यांच्या गटात बोडखे हे गाव आहे. जायकवाडी धरणग्रस्त असलेल्या या गावात पहिली ते चौथीपर्यंतचे सुमारे शंभर विद्यार्थी आहेत. यावर्षी वादळामुळे शाळेच्या खोल्यांची पत्रे उडून पडझड झाली होती. त्याची दुरुस्ती करण्यासाठी जिल्हा परिषदेने तीन लाख रुपये मंजूर केले होते. मात्र शाळेला नवीन इमारत बांधावी, अशी मागणी ग्रामस्थ व पालकांनी केल्यामुळे तो निधी पुन्हा जिल्हा परिषदेकडे वर्ग करुन घेतला. त्यानंतर तीन महिन्यांपूर्वी नवीन इमारतीच्या बांधकामासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला. मात्र बांधकामासाठी जागा उपलब्ध नसल्याने बांधकामास परवानगी मिळाली नाही. प्रशासकीय चालढकलीत बांधाकमास उशीर होत असल्याने ऐन पावळ्यात येथील विदयार्थ्यांना उघड्यावर शाळेत बसण्याची वेळ आली. यामुळे वैतागलेल्या पालकांनी व ग्रामस्थांनी हे आंदोलन केले.

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाकार्याध्यक्ष संजय कोळगे यांनी मध्यस्थी करुन प्रस्ताव मंजूर झालेला असून येत्या १५ दिवसात बांधकामासाठी परवानगी मिळवून देवू, असे आश्वासन दिले. मुलांना खाऊवाटप करुन पालकांना विनंती केली. पालकांनीही ती मान्य करत येत्या १५ दिवसांत प्रश्न मार्गी न लागल्यास नगर येथील जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर मुलांसह आंदोलन करण्यात येईल, असे सांगितले.

संबंधित लेख