Nagar news - jagtap-pachpute | Sarkarnama

भ्रष्टाचारी पाचपुतेंना मुख्यमंत्र्यांनी पावन करून घेतले काय? : कुंडलिकराव जगताप

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

`बबनराव पाचपुते भ्रष्टाचारी आहेत. अशा भ्रष्टाचारी पाचपुतेंना मुख्यमंत्र्यांनी गंगेच्या तिरावरून पावन करून घेतले काय,' असा सवाल जगताप यांनी करून त्यांच्या काळातील पापे झाकण्यासाठी ते राहुल जगताप यांना बदनाम करीत असल्याचा आरोप कुंडलिकराव जगताप यांनी केला.

नगर : श्रीगोंदे तालुक्यात भाजपचे माजी मंत्री बबनराव पाचपुते व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार राहुल जगताप यांच्यातून सध्या विस्तवही जात नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यात आमदार जगताप यांचे वडील कुकडी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक कुंडलिकराव जगताप यांची तोफ पुन्हा धडधडून पाचपुते यांच्यावर घसरली. या वयातही आपण पाचपुते यांना जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा जगताप यांनी दिल्याने आगामी काळात पाचपुते-जगताप यांच्यातील राजकीय संघर्ष टोकाला जाण्याची शक्यता आहे.

कुकडीच्या पाणी सोडण्यावरून तसेच घोडच्या पाण्यावरून मागील दोन महिन्यांपासून आमदार जगताप व पाचपुते यांच्यातील घमासान आता श्रोगोंदेकरांच्या अंगवळणी पडले आहे. एकाने आरोप करायचे, दुसऱ्याने त्याला उत्तर द्यायचे, यातच दोघेही चर्चेत राहिले. पाचपुते यांचे राजकीय जीवनातील कायमचे प्रतिस्पर्धी कुंडलिकराव जगताप सध्या आजारी असल्याने ते राजकारणात सक्रीय राहू शकत नाहीत. मात्र मुलगा आमदार राहुलच्या माध्यमातून राजकारणाचे छक्के-पंजे खेळताना दिसून येतात.

`बबनराव पाचपुते भ्रष्टाचारी आहेत. अशा भ्रष्टाचारी पाचपुतेंना मुख्यमंत्र्यांनी गंगेच्या तिरावरून पावन करून घेतले काय,' असा सवाल जगताप यांनी करून त्यांच्या काळातील पापे झाकण्यासाठी ते राहुल जगताप यांना बदनाम करीत असल्याचा आरोप कुंडलिकराव जगताप यांनी केला. पाचपुते यांच्या हाती आता काहीच न राहिल्याने ते वाट्टेल तसे बोलत आहेत. त्यांची तयारी असेल, तर आपण या वयातही त्यांना जशास तशे उत्तर देऊ, असे सांगून कुंडलिकराव जगताप यांनी आपण राजकारणात सक्रीय असल्याचे दाखवून दिले.

संबंधित लेख