घुले बंधूनी मारले एका दगडात अनेक पक्षी 

घुले बंधूनी मारले एका दगडात अनेक पक्षी 

नगर : ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पद्मविभूषण किताब मिळाल्याबद्दल व त्यांच्या संसदीय कारकिर्दीला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल नगर जिल्ह्यातर्फे त्यांचा सर्वपक्षीय गौरव समारंभ "होम पीच'वर करून ज्ञानेश्‍वर उद्योगसमूहाचे मार्गदर्शक नरेंद्र घुले पाटील व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले पाटील या बंधूंनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. त्यानिमित्ताने जिल्ह्यात राष्ट्रवादीची बांधणी जोरदार तर झालीच, शिवाय घुले बुंधूंनी एका दगडात अनेक पक्षी मारले. त्यांचे हे शक्तीप्रदर्शन यशस्वी झाले, असेच म्हणावे लागेल. 

राजकीय ध्रुवीकरण 
समारंभातच दिवंगत पिताश्री मारुतराव घुले पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलेले त्यांचे शिष्य व माळी समाजाचे राज्यातील आदरणीय व्यक्तिमत्त्व पांडुरंग अभंग यांचा गौरव करून घुले पाटील बंधूंनी "सोशल इंजिनिअरिंग'चाही यशस्वी प्रयोग केला. जिल्ह्यातील सर्व पक्षांतील नेत्यांना या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आणून आपले सर्वांशीच "जमते' असा संदेशही त्यांनी दिला. घुले पाटील यांचे राजकीय विरोधक व पवार यांचे कौटुंबिक स्नेही, हेही या निमित्ताने "ज्ञानेश्‍वर'च्या कार्यस्थळावर आले, पवारांना भेटले अन्‌ त्यांचे "आशीर्वाद'ही घेतले. कोपरगावातील भाजपच्या आमदार स्नेहलता कोल्हे यांचे सासरे माजी मंत्री शंकरराव कोल्हे प्रकृती ठीक नसतानाही कार्यक्रम संपेपर्यंत व्यासपीठावर ठाण मांडून होते. राजकीय जाणकारांच्या दृष्टीने या घटनेला विशेष महत्त्व असून, आगामी काळातील राजकीय ध्रुवीकरणासाठी ही बाब उपयोगी पडेल. 

पंढरीचा पांडुरंग 
जिल्ह्यातील पाणीप्रश्‍नासंदर्भातही या निमित्ताने सर्वपक्षीय प्रयत्नांची किमान चर्चा तरी झाली. पवार यांना "पांडुरंग' म्हणत त्यांचे खिसे कापणाऱ्या व्यासपीठावरील "खिसेकापूं'चाही या निमित्ताने समाचार घेतला गेला. कार्यक्रमाला महिला व तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती. त्यामुळे जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजश्री घुले पाटील व शेवगावचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे "प्रॉपर लॉंचिंग' झाल्याची खातरजमाही या कार्यक्रमामुळे झाली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नगरच्या "भरगच्च' दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर शरद पवार यांच्यासमोर मोठी गर्दी जमवून स्वपक्ष आणि इतर पक्षांतील नेत्यांसमोर घुले पाटील बंधूंनी यशस्वी शक्तिप्रदर्शन करीत एकाच दगडात अनेक पक्षी मारले, असेच या कार्यक्रमाचे विश्‍लेषण करावे लागेल. 

"जिल्हाध्यक्ष पद सोडतील'ला तिलांजली 
जिल्हा परिषद निवडणुकीनंतर स्वतःच्या घरात उपाध्यक्षपद व शेवगावचे सभापतिपद घेतल्यानंतर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले स्वतःच पद सोडतील, या आशेने पक्षातील काही मंडळी जिल्हाध्यक्षपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसली होती. त्यात नेवाशातील गडाख परिवाराने ऐन जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर "राष्ट्रवादी'शी फारकत घेत तालुक्‍यात जोरदार विजय संपादन केला. साहजिकच, पक्षातील मंडळी घुले पाटील यांच्यावर पडद्यामागून पक्षश्रेष्ठींकडे याबाबत "आगपाखड' करीत होती. त्यामुळे अजित पवार यांच्या सात जुलैच्या नगर दौऱ्यात "राष्ट्रवादी'च्या नव्या अध्यक्षांची घोषणा होईल, अशी अटकळ बांधली जात होती. तथापि, झाले उलटेच. अजित पवार यांनी भाषणात कित्येकदा चंद्रशेखर यांचे नाव घेत, आता त्यांनाच "सर्व काही' करावे लागेल, असा संदेश दिला. त्यानंतर लगेच घुले बंधूंच्या बालेकिल्ल्यात शरद पवार व पांडुरंग अभंग यांच्या गौरवाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने घुले बंधूंनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत "राष्ट्रवादी'चे जिल्ह्यातील "सब कुछ' आम्हीच आहोत, हे श्रेष्ठींना दाखवून दिल्याचे बोलले जाते. 

कानपिचक्‍या झाल्याच नाहीत 
नगरला सात जुलैला झालेल्या मेळाव्यात अजित पवार यांनी पक्षातील ज्येष्ठ व जिल्हाध्यक्षपदाच्या चर्चेत असलेले पारनेरचे नेते सुजित झावरे यांना जाहीर फटकारले. त्यामुळे काही मंडळींनी शरद पवार यांच्या कानावर हा प्रकार घातल्याची वदंता होती. साहजिकच, या कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवार ज्येष्ठांना चार भिंतींआड "संजीवनी' देतील, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. मात्र, तसे काहीच झाले नाही. त्यामुळे काही मंडळींच्या अपेक्षेवर विरजण पडल्याची चर्चाही कार्यक्रमस्थळी होती. 

"सोशल इंजिनिअरिंग'ही यशस्वी 
माळी समाजात राज्यभर आदर असलेले पांडुरंग अभंग यांचा अमृतमहोत्सवी गौरव करून घुले बंधूंनी केवळ शेवगाव विधानसभा मतदारसंघातीलच नव्हे, तर राज्यपातळीवर "राष्ट्रवादी'शी माळी समाजाची असलेली वीण अधिक घट्ट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे मानले जाते. राज्यातील अनेक जिल्ह्यांमधून आणि जिल्ह्यातील बहुतांश गावांमधून या कार्यक्रमासाठी आलेले समता परिषदेचे नेते, कार्यकर्ते व माळी समाजाची आवर्जून उपस्थिती, हे त्याचेच द्योतक मानले जाते. साहजिकच, पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासाठी या बाबीचा उपयोग होणार असल्याचा "राष्ट्रवादी'च्या जाणकारांचा होरा आहे. 

...तर जिल्ह्याचा पाणीप्रश्‍न सुटेल 
भेंड्यातील या कार्यक्रमात अनेक विषयांवर मंथन झाले. नरेंद्र घुले पाटील यांनी पश्‍चिमेचे पाणी वळविण्याचा मुद्दा प्रास्ताविकात उपस्थित केला. त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्ह्याच्या पाणीप्रश्‍नासाठी सर्वपक्षीय प्रयत्नांची गरज प्रतिपादित करीत पवार यांनी त्यात मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. बाळासाहेब थोरात यांनीही असाच सूर लावला. त्यावर सुनील तटकरे यांनी विखे-थोरात यांच्यातील "मनोमीलन' सर्वांसमोर मांडत कार्यक्रमाला वेगळाच "टर्न' दिला. पालकमंत्री राम शिंदे यांनीही या संदर्भात सरकारच्या पातळीवर सकारात्मक भूमिका घेण्याचे जाहीर केले. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्याच्या पाण्याच्या प्रश्‍नाच्या सोडवणुकीसाठी सर्वपक्षीय प्रयत्नाला चालना मिळाल्याचे मानले जाते. 

घुले-गडाखांमधील वितुष्ट संपणार? 
पवारांशी कित्येक वर्षांपासूनचा कौटुंबिक स्नेह असलेले ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. ते येणार की नाही, याबाबत तर्कवितर्क लढविले जात होते. त्यात कार्यक्रम सुरू झाला, तरी ते आले नव्हते. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. तथापि, कार्यक्रम सुरू झाल्यानंतर काही मिनिटांतच गडाख थेट व्यासपीठावर आले. त्यांनी आपले पुस्तक पवारांना दिले व त्यांना अभिवादनही केले. या पार्श्‍वभूमीवर विधानसभा निवडणुकीपर्यंत घुले-गडाख यांच्यामधील राजकीय वितुष्ट संपुष्टात येईल, की अमृतमहोत्सवी गौरव झालेल्या पांडुरंग अभंग यांनाच शंकरराव गडाख यांच्याशी ऐन वेळी झुंजावे लागेल, असा प्रश्‍न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे. 

घुले यांची कुवत अन्‌ दानत चर्चेत 
पक्षात पदावर काम करताना अनेक नेते पक्षाकडून, तसेच "इतर' मार्गांनी पैसा मिळवून "गाडा' चालवत असतात. कोणत्याही पक्षाचा कार्यालय, वीजबिल, कर्मचारी वर्ग, दळणवळण आदींसाठी लाखोंचा खर्च होतो. याशिवाय विविध मार्गांनी कार्यकर्त्यांना "ताकद'ही द्यावी लागते. नेमके त्यात अनेक नेते कमी पडतात. मात्र, चंद्रशेखर घुले पाटील यांनी जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून ते या कार्यक्रमापर्यंत स्वतःची "कुवत' अन्‌ "दानत' दाखवून दिल्याचा निर्वाळा राज्याच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांनी हायकमांडला दिला. त्याचा प्रत्ययही श्रेष्ठींना आला. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनाही त्याची प्रचिती आली. त्यामुळेच घुले यांची कुवत अन्‌ ताकदीबाबत केवळ "राष्ट्रवादी'तच नव्हे, तर स्पर्धक व मित्रपक्षांमध्येही चांगलीच चर्चा आहे, हे मात्र निश्‍चित!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com