Nagar News Adinath Shastri | Sarkarnama

महाराज हरवले, महाराज सापडले : तारकेश्‍वर गडाचे महंत गायब नव्हे, गेले होते पंढरीच्या वारीला

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 15 ऑगस्ट 2017

तारकेश्‍वर गडाचे महंत आदिनाथशास्त्री महाराज बेपत्ता झाल्याच्या बातमीने त्यांचे भक्त-अनुयायी आज अस्वस्थ झाले. गडाला मानणाऱ्या भक्तांची संख्या मोठी आहे. महाराजांना शोधण्यासाठी भक्तांनी दिवसभर बरीच धावपळ केली. 'सोशल मीडिया'वर दिवसभर याची चर्चा होती.

नगर : पाथर्डी व आष्टी तालुक्‍याच्या सरहद्दीवर असलेल्या तारकेश्‍वर गडाचे महंत आज पहाटे बेपत्ता झाल्याचे वृत्त आज सोशल मिडियावरून जोरदार शेअर झाले. त्यामुळे त्यांच्या भक्तांमध्ये अस्वस्थता होती. सायंकाळी मात्र महाराज पंढरपूरला सुखरुप असल्याचे समजल्याने भक्तांचा जीव भांड्यात पडला. दरम्यान गडावरील विकास कामांमध्ये काही कार्यकर्त्यांचा हस्तक्षेप होत असून, त्याला कंटाळून महाराजांनी गड सोडला, अशी चर्चा भाविकांमध्ये व सोशल मिडियावर होती. त्यामुळे गडावर नेमका काय राजकारण शिजतेय, याबाबत चर्चेला उधाण आले आहे.

तारकेश्‍वर गडाचे महंत आदिनाथशास्त्री महाराज बेपत्ता झाल्याच्या बातमीने त्यांचे भक्त-अनुयायी आज अस्वस्थ झाले. गडाला मानणाऱ्या भक्तांची संख्या मोठी आहे. महाराजांना शोधण्यासाठी भक्तांनी दिवसभर बरीच धावपळ केली. 'सोशल मीडिया'वर दिवसभर याची चर्चा होती.

आदिनाथशास्त्री मध्यरात्रीनंतर गडावरून नगर येथे गेले. त्यांनी आपली कुंडले व वाहन गडावर सोडले. अशोक उबाळे यांना दूरध्वनी करून त्यांनी बोलावून घेतले व त्यांच्या मोटरसायकलीने मध्यरात्रीनंतर पाथर्डीला आले. तेथून ते दोघे पुन्हा नगरला गेले. तेथे 'लघुशंकेला जाऊन येतो' असे सांगून महाराज निघून गेले. काही वेळाने त्यांनी उबाळे यांना दूरध्वनी करून 'तुम्ही गडावर जा; मला शोधू नका' असे सांगितले.

या निरोपामुळे घाबरलेल्या उबाळे यांनी नगरच्या कोतवाली पोलिस ठाणे गाठून महाराज हरवल्याची तक्रार दिली. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. सारेच भक्त हवालदिल झाले. भक्तांनी पुणे, औरंगाबाद, मुंबई, पंढरपूर, आळंदी येथे त्यांचा शोध घेतला. पाथर्डीतील 100-150 तरुण दिवसभर याच कामात होते.

महाराज पंढरपूर येथे असल्याचे दुपारनंतर समजले. तशी माहिती त्यांच्या जवळच्या व्यक्तींनी दिली. मोबाईल बंद असल्याने त्यांच्याशी संपर्क साधता आला नाही. उशिरा गडावरील त्यांचे काही शिष्य तीन-चार वाहनांमधून पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. दरम्यान, गडावरील विकासकामांत राजकीय हस्तक्षेप, येणारे अडथळे, हेवेदावे, पाण्याचा वाद अशा विविध कारणांमुळे त्रासल्याने महाराज गड सोडून गेल्याची चर्चा सोशल मीडियावर दिवसभर होती.

संबंधित लेख