nagar-NCP-president-apointment | Sarkarnama

`राष्ट्रवादी'ची नगरमधील व्यूहनिती : दोन्ही मोठी पदे दिली कर्जतला

मुरलीधर कराळे
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्षपद व महिला आघाडीचे जिल्हाध्यक्षपद एकाच मतदारसंघात देवून `राष्ट्रवादी'ने भाजपचे मंत्री प्रा. राम शिंदे यांच्यावर शरसंधान केले असल्याचे बोलले जाते. 

नगर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्षपद व महिला आघाडीचे जिल्हाध्यक्षपद एकाच मतदारसंघात देवून `राष्ट्रवादी'ने भाजपचे मंत्री प्रा. राम शिंदे यांच्यावर शरसंधान केले असल्याचे बोलले जाते. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र फाळके यांची नियुक्ती झाली. राष्ट्रवादी महिला आघाडीचे जिल्हाध्यक्षपदही मंजुषा गुंड यांच्याकडे यापूर्वीच दिलेले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने मोठी ताकद या मतदारसंघात लावल्याचे दिसून येत आहे. प्रा. शिंदे यांना शह देण्यासाठीच ही ताकद असल्याचे समजते.

इतर नेत्यांनाही केले खूष
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महत्त्वाच्या बदलामध्ये माजी आमदार पांडुरंग अभंग यांना प्रदेश उपाध्यक्षपदाची संधी देण्यात आली. युवा नेते अविनाश आदिक यांची राज्य सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली. अंबादास गारुडकर यांचे राज्याचे सचिव म्हणून, तर संदीप वर्पे यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. एकूणच राष्ट्रवादीच्या नेत्यांना इतर मोठी पदे देऊन खूष केले आहे. मात्र जिल्हाध्यक्षपद कर्जत-जामखेड मतदारसंघात देऊन भाजपच्या पालकमंत्र्यांच्या विरोधात आगामी काळात जोरदार लढत देण्याचे संकेत यानिमित्ताने देण्यात आले आहेत.

चंद्रशेखर घुले विधानसभेसाठी लढणार
राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांचे जिल्हाध्यक्षपद काढून फाळके यांना देण्यात आले. घुले यांना विधानसभेची तयार करण्यासाठीच त्यांनी हे पद सोडल्याचे समजते. त्यामुळे आगामी काळात शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून घुले कुटुंबातील चंद्रशेखर घुले यांची जोरदार तयारी सुरू असल्याचे दिसून येत आहे.

संबंधित लेख