Nagar Municipal corporation : BJP to take interview of willing candidates | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

नगर महापालिका : युतीची शक्यता मावळली ,भाजप घेणार मुलाखती

मुरलीधर कराळे
रविवार, 11 नोव्हेंबर 2018

भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष तथा खासदार दिलीप गांधी यांनी इच्छुकांच्या मुलाखती सोमवारी (ता. १२) होणार असल्याचे जाहीर केले आहे.

नगर :  महापालिकेची निवडणूक एक महिन्यावर आली असताना भाजप व शिवसेनेच्या युतीचा घोळ मिटत नाही. त्यामुळे शिवसेनेने काल प्रभागनिहाय उमेदवार जाहीर केले. आता भाजपनेही उमेदवारी अर्ज वाटप करून उद्या (सोमवारी) मुलाखतींचे नियोजन केले आहे. त्यामुळे युती झाल्यास गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या नवरदेवांचे काय होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

दरम्यान, युती झाली, तरीही शिवसेना व भाजपचे ताणलेले संबंध आता जुळणार नाहीत, अशी शक्यता असल्याने एकमेकांना जिरवाजिरवीचेच राजकारण होईल, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष तथा खासदार दिलीप गांधी यांनी इच्छुकांच्या मुलाखती सोमवारी (ता. १२) होणार असल्याचे जाहीर केले आहे. असे अर्ज दाखल करण्यासाठी पक्षाचा अर्ज भरणे व मुलाखत देणे अनिवार्य केले आहे. आतापर्यंत १६८ जणांनी अर्ज नेले आहेत. उद्या लक्ष्मी नारायण मंगल कार्यालयात (टिळक रोड) इच्छुकांच्या मुलाखती होतील.

 कोअर कमिटीचे पाच सदस्य या मुलाखती घेणार आहेत. आपणच निवडून येणार या आशेने जिद्दीस  पेटलेल्या इच्छुकांनी मोठा गाजावाजा करीत उमेदवारी अर्ज नेले आहेत. आता उमेदवारी कोणाला द्यायची ते वरिष्ठ मंडळी जाहीर करतील. तदनंतर संबंधित निवड झालेले उमेदवार जोरदार प्रचार सुरू करतील. पण वरिष्ठ पातळीवर भाजप – शिवसेनेची युती झाल्यास कोणत्या प्रभागात कोणाची उमेदवारी कपात होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे उमेदवारी मिळाली तरीही तळ्यात-मळ्यात राहण्याची शक्यता असल्याने इच्छुकांपुढे मोठा पेच आहे.

पाडवा व भाऊबीजेच्या मुहूर्तावर शिवसेनेने उमेदवारीच्या याद्या प्रसिद्ध केल्या. सर्वच जागांवर त्यांनी उमेदवार मात्र दिले नाहीत. अजून एक यादी प्रसिद्ध करण्याची शक्यता आहे. मात्र युती झाल्यास उर्वरित जागांवर भाजपला संधी देवू, असे शिवसेनेचे धोरण असावे. भाजपनेही हेच धोरण धरत उमेदवारी जाहीर करण्याचे नियोजन केले आहे.

तणाव निवळेल का ? 

भाजप व शिवसेनेची युती झाल्यास मोठा प्रश्न उपस्थित होणार आहे. भाजप व शिवसेनेमध्ये मागील वर्षभरात जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले आहेत. त्यामुळे एकत्र प्रचार करण्याची वेळ आल्यास एकमेकांना पूर्वी भिडलेले कार्यकर्ते एकमेकांच्या हातात हात घालून लोकांसमोर जातील का, हे लवकरच दिसणार आहे.  दोघांच्या वादात काॅंग्रेस – राष्ट्रवादीचा फायदा होऊ शकेल, असा अंदाज राजकीय वर्तुळातून बांधला जात आहे.

 

संबंधित लेख