नगरच्या लढतीला विखे-पवार संघर्षाचीच झालर!

नगरमध्ये लढत विखे-पाटील विरुद्ध जगताप अशी असली, तर त्यात अंतःस्थ अनेक पदर आहेत. गणिते आहेत. थेट लढत असल्याने नेत्यांच्या सभांनी तापलेल्या वातावरणाने चुरस वाढवली आहे.
नगरच्या लढतीला विखे-पवार संघर्षाचीच झालर!

नगर मतदारसंघातील निवडणूक प्रामुख्याने भाजपचे डॉ. सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप या उमेदवारांमध्येच आहे. तथापि, या निवडणुकीस थेट ज्येष्ठ नेते शरद पवार आणि विखे पाटील घराण्यातील पारंपरिक संघर्षाची झालर आहे. कॉंग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपचे उमेदवार असलेले आपले पुत्र डॉ. सुजय यांच्या प्रचारात उघडपणे उतरल्याने चुरस वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, पंकजा मुंडे आदी दिग्गजांच्या सभांचा भाजपतर्फे धडाका आहे. राष्ट्रवादीतर्फे ज्येष्ठ नेते शरद पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, फौजिया खान, कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या सभांनी राळ उठविली आहे. चुरशीमुळे राज्यातील प्रमुख लढतींमध्ये नगरचा समावेश झालाय.

नगर मतदारसंघात 18 लाख 46 हजार 314 मतदार असून, यात पुरुष 9 लाख 66 हजार 797, तर महिला मतदार 8 लाख 79 हजार 431 आहेत. विखे पाटील आणि जगताप हे दोन्हीही उमेदवार मराठा समाजातील आहेत. तथापि, दोन्ही नेत्यांनी जातीची गणिते समोर ठेवून नेत्यांच्या सभांचे आयोजन केले आहे. छगन भुजबळ, पंकजा व धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, फौजिया खान आदींचा त्यात समावेश आहे. व्यक्तिगत संबंध आणि पक्षीय राजकारणावरही मतांची गणिते अवलंबून आहेत. भाजपचे खासदार दिलीप गांधींना ऐनवेळी उमेदवारी नाकारल्याने नाराज जैन समाजाचा कौल कोणाला मिळणार, याचीही उत्सुकता आहे.

जगताप परिवारास प्रथमच जिल्ह्याच्या नेतृत्वाची संधी मिळणार आहे. दुसरीकडे विखे भाजपमध्ये आल्याने त्याचा ज्यांना भविष्यात धोका जाणवतो, ती नेतेमंडळी काम करतील? असा प्रश्‍न विचारला जातोय. त्यातही विखेंना राहुरी विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक अपेक्षा आहेत. भाजप आमदार शिवाजी कर्डिले साथ करतील, असे त्यांना वाटते. मात्र, कर्डिलेंचे कार्यकर्ते संग्राम यांच्या प्रचारात दिसू लागल्याने मतदार संभ्रमात आहेत. पारनेर तालुक्‍यावर जगतापांच्या तुलनेत विखेंचे अधिक वर्चस्व असल्याचे सांगण्यात येते. या तालुक्‍यात अगोदरच औषधापुरती असलेली कॉंग्रेस विखेंनी नामशेष केली. बोटावर मोजण्याइतकेच असलेले भाजपचे पदाधिकारीही दंगल आणि खंडणीच्या गुन्ह्यात अडकले आहेत.

त्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांना पुढे येऊ न देता प्रचाराची वेळ आली आहे. श्रीगोंद्यात आमदार राहुल जगताप, राजेंद्र नागवडे आणि घनश्‍याम शेलार हे जगतापांसाठी, तर बबनराव पाचपुते यांच्यासह इतर नेत्यांनी विखेंसाठी कंबर कसली आहे. कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी पालकमंत्री राम शिंदेंकडे आहे. त्यांनी स्वतः दोन्ही तालुक्‍यांमध्ये लक्ष घातले आहे. त्यांना शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्या जोरकस प्रचार यंत्रणेचा सामना करावा लागतोय. पाथर्डी-शेवगावमध्ये भाजप आमदार मोनिका राजळे यांनी विखेंसाठी, तर राष्ट्रवादीचे नेते नरेंद्र व चंद्रशेखर घुले यांनी जगताप यांच्यासाठी जोरदार मोहीम उघडली आहे. हर्षदा काकडे व ऍड. प्रताप ढाकणे यांनीही घुले यांचाच कित्ता गिरवण्याचे काम सुरू केल्याने शेवगाव-पाथर्डीमध्ये जगताप यांच्या अपेक्षा उंचावल्यात.

मतदारसंघातील प्रलंबित प्रश्‍न
- नगर शहरातील उड्डाण पूल रखडला
- दक्षिणेतील 6 तालुके धरणांच्या पाण्यापासून वंचित
- साकळाई पाणी योजना वर्षानुवर्षे कागदावरच
- नगरमधील एमआयडीसीचे विस्तारीकरण लांबले
- पांढरीपूल येथील फूड इंडस्ट्रीस अद्याप उद्योगांची प्रतीक्षा
- नगर शहराच्या बाह्यवळण रस्त्यांची दुर्दशा
- दौंड-मनमाड रेल्वेमार्गाचे रखडलेले विद्युतीकरण व दुहेरीकरण

उमेदवारांची बलस्थाने
आमदार संग्राम जगताप
- स्वतःचे नेटवर्क, जैन आणि मुस्लिम समाजाशी जवळीक
- भाजपसह सर्वच मित्र पक्षांमध्येही नगरसेवकांशी मैत्रीचे संबंध
- भाजप खासदार दिलीप गांधी यांच्या स्वपक्षावरील नाराजीचा फायदा

डॉ. सुजय विखे पाटील
- आजोबा आणि वडिलांचे कार्यकर्त्यांचे राजकीय व सहकारातले आयते नेटवर्क
- मोठ्या प्रमाणावरील शिक्षण संस्थांमधील कर्मचाऱ्यांची कुशल टीम.
- विरोधी उमेदवार जगतापांचे सासरे आमदार कर्डिले भाजपच्या प्रचारात

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com