nagar lanke about parner issue | Sarkarnama

अजून 'मातोश्री'चा निरोप आलेला नाही : लंके 

मुरलीधर कराळे 
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

मी शिवसेनेचा आहे. माझ्या कोणत्याही कार्यकर्त्यांने दगडफेक केली नाही. शिवसेना आमच्या रक्तात आहे. तालुक्‍यात शिवसेना वाढीसाठी मी रात्रीचा दिवस केला आहे. त्यामुळे शिवसेना प्रमुखांच्या कार्यक्रमादरम्यान असे वर्तन आमच्याकडून होणे शक्‍य नाही. हे राजकीय आकसापोटी कुणीतरी केले आहे, असे स्पष्टीकरण पारनेरचे शिवसेना तालुकाप्रमुख निलेश लंके यांनी केले आहे. 

नगर : मी शिवसेनेचा आहे. माझ्या कोणत्याही कार्यकर्त्यांने दगडफेक केली नाही. शिवसेना आमच्या रक्तात आहे. तालुक्‍यात शिवसेना वाढीसाठी मी रात्रीचा दिवस केला आहे. त्यामुळे शिवसेना प्रमुखांच्या कार्यक्रमादरम्यान असे वर्तन आमच्याकडून होणे शक्‍य नाही. हे राजकीय आकसापोटी कुणीतरी केले आहे, असे स्पष्टीकरण पारनेरचे शिवसेना तालुकाप्रमुख निलेश लंके यांनी केले आहे. 

पारनेर तालुक्‍यात आज आमदार विजय औटी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शिवसेनेच्या मेळाव्यानिमित्त पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आले होते. कार्यक्रम आटोपून ते हॅलिपॅडकडे गेल्यानंतर काही लोकांकडून एका गाडीवर दगडफेक झाली. ती लंके यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांनी केली, अशी अफवा उठली. याबाबत लंके यांना विचारले असता त्यांनी असे कृत्य करणारे आपले कार्यकर्ते नसल्याचा खुलासा केला. 

लंके म्हणाले, राजकीय आकसापोटी कुणीतरी हा प्रकार केला आहे. माझे खच्चीकरण करण्याचा हा प्रकार आहे. बाळासाहेब ठाकरे हे आमचे दैवत आहे. उद्धव ठाकरे हे प्रेरणास्थान आहे. आमच्या रक्तात शिवसेना आहे, नसानसात शिवसेना भिनली आहे. शिवसैनिक घडविण्यासाठी आम्ही किती खस्ता खाल्ल्या हे आम्हालाच माहित आहे. त्यामुळे आमच्याकडून असे वर्तन होणे शक्‍यच नाही. ज्या वेळी घटना घडली, त्यानंतर पंधरा मिनीटांनी मला कळाले. एका गाडीमुळे माजी आमदार अनिल राठोड, नगर तालुकाप्रमुख संदेश कार्ले हेही जखमी झाल्याचे समजले. नेमका हा प्रकार काय झाला, याबाबत मला काहीच माहिती नव्हते, असे लंके म्हणाले. 

उद्या उद्धव ठाकरे यांच्याशी होणाऱ्या बैठकीबाबत विचारले असता लंके म्हणाले, मला तसा अधिकृत निरोप मिळालेला नाही. त्यामुळे याबाबत काहीच सांगता येणार नाही. 

 

संबंधित लेख