nagar-jamkhed-president-election | Sarkarnama

जामखेडमध्ये नगराध्यक्ष होणार बिनविरोध

वसंत सानप
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

तिसऱ्यांदा होत असलेल्या जामखेड नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी त्या 'चौदा' मधून आलेल्या नगरसेवकांपैकी निखिल घायतडक यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने नगराध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध होणार यावर शिक्कामोर्तब झाले. 

जामखेड (जि.नगर) : तिसऱ्यांदा होत असलेल्या जामखेड नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी त्या 'चौदा' मधून आलेल्या नगरसेवकांपैकी निखिल घायतडक यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने नगराध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध होणार यावर शिक्कामोर्तब झाले. 

यानिमित्ताने पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांनी बिनविरोध नगराध्यक्ष निवडीची सुरू केलेली  परंपरा यावेळीही जपली गेली. आज दुपारी (बुधवार) उपनगराध्यक्ष पदाचीही निवड प्रक्रिया आहे. ही निवड देखील बिनविरोध व्हावी, याकरिता पालकमंत्री प्रा.राम शिंदे प्रयत्नशील असल्याचे समजते. ते घेतली ते नाव आणि सांगतील तो उपनगराध्यक्ष असे समिकरण आहे.
 
राजकारणातील सत्तेचा सारीपाटाकरिता लागणारे संख्याबळ जुळविण्यात माहीर असलेले पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांचे 'होम पिच' म्हणजे जामखेड. येथे पालकमंत्री कसेही खेळले तरी राजकारणातील सेंच्युरी येथे मारणारच आणि 'हारी हुई बाजी को भी जित में पलट देंगे' असे समीकरण बनलेले आहे.

आडीच वर्षापूर्वी झालेल्या नगरपालिका निवडणूकीत भाजपचे अवघ्ये तीन नगरसेवक निवडून आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे दहा, शिवसेनेचे चार, तीन अपक्ष व एक मनसे.राष्ट्रवादी-शिवसेना आणि अपक्ष अशी जामखेड विकास आघाडी स्थापन होऊन माजीमंत्री सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेची सत्ता स्थापन झाली. 

मात्र नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्यातील समन्वयाअभावी अवघ्या सव्वा वर्षात सत्तांतर झाले. तीन नगरसेवक असलेल्या भाजपबरोबर चौदा नगरसेवकांनी जाण्याचा निर्णय घेतला आणि हे संख्याबळ सतरा झाले. त्या बळावर पालकमंत्री प्रा.राम शिंदेंनी भाजपचे शहराध्यक्ष सोमनाथ राळेभात यांच्या सौभाग्यवती अर्चना राळेभात यांना नगराध्यक्ष केले तर अपक्ष नगरसेवक महेश निमोणकर यांना बिनविरोध उपनगराध्यक्ष केले.

दरम्यान आडीच वर्षे संपली. दुसऱ्या टर्ममध्ये नगराध्यक्ष पद अनुसूचित जाती करिता आरक्षित झाले.या प्रर्वगातून दोन नगरसेवक निवडून आले आहेत. ते दोघेही त्या 'चौदा' मधून पालकमंत्री प्रा.शिंदेंकडे आलेले आहेत. त्या दोघांनाही समान संधी देण्याची भूमिका घेऊन सव्वा-सव्वा वर्षे देण्याचा निर्णय पालकमंत्री प्रा.शिंदेंनी घेतला आणि पालकमंत्र्यांनी पहिल्यांदा नगरसेवक निखिल घायतडक यांच्या नावावर नगराध्यक्ष पदाची 'मोहर' लावली.

नेतृत्वाने घेतलेल्या निर्णयाला सर्वमान्यता मिळाली आणि बिनविरोध निवडीचा मार्ग सुकर झाला. आज यासंदर्भात औपचारिकता पूर्ण होणार आहे. याचवेळी उपनगराध्यक्षाची निवडही होणार आहे. याकरिता इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे.

पालकमंत्री प्रा.शिंदेंनी पालिकेच्या सत्तेचे बळ बांधण्यासाठी संधी उपलब्ध करून देणाऱ्या पालिकेच्या सभागृहातील भाजपच्या चिन्हावर निवडून आलेल्या त्या 'तीन' नगरसेवकांपैकी संधी दिली जाते की त्या 'चौदा' मधून कोणाला ही  संधीही मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

काही झाले तरी नगराध्यक्षाप्रमाणेच  उपनगराध्यक्षपदाची निवडही बिनविरोध व्हावी,यासाठी पालकमंत्री प्रा.शिंदे प्रयत्नशील आहेत आणि ते ती निवड बिनविरोधच करतील, असे नगरसेवकांचे मत आहे.
 

संबंधित लेख