महापौर निवडणुकीत नगरमध्ये बोराटे जादुई आकडा कसा गाठतील ?
नगर : नगरमध्ये महापालिका त्रिशंकू झाल्याने तीनही पक्षात गोंधळ झाला आहे. गटनोंदणी झाल्यानंतर कोण कोणाला पाठिंबा देणार, याबाबत बैठकामागे बैठका सुरू आहेत. शिवसेनेने आपला महापौरपदाचा उमेदवार म्हणून अधिकृतपणे बाळासाहेब बोराटे यांचे नाव जाहीर केल्याने सर्व आघाड्या सांभाळून घेण्यात बोराटे यांना कितपत यश येते, हे त्यांच्या विरोधी पक्षातील संपर्कावरही अवलंबून राहणार आहे.

महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या सर्वाधिक जागा म्हणजे 24 नगरसेवक निवडून आले आहेत. मात्र महापौर निवडीसाठी त्यांना भाजप किंवा राष्ट्रवादीची गरज पडणार आहे. अशीच स्थिती राष्ट्रवादीचीही आहे. राष्ट्रवादीच्या 18 जागा असून, त्यांना एका अपक्षानेही पाठिंबा दिला आहे. आघाडी असल्याने 5 नगरसेवक कॉंग्रेसचे मिळतील. म्हणजेच 34 जागा आघाडीच्या होत असल्या तरी 35 हा जादुई आकडा गाठण्यासाठी त्यांना इतर पक्षाचीच गरज पडणार आहे.
भाजपचे 14 नगरसेवक असल्याने त्यांनाही कोणत्या ना कोणत्या पक्षाला पाठिंबा देणे गरजेचे आहे. बसपाचे 4 नगरसेवक आहेत. त्यांचीही स्वतंत्र गटनोंदणी झाल्याने ते सत्ता ज्यांच्याकडे जाईल, त्यांनाच पाठिंबा देवून मिळेल ते पदरात पाडून घेण्याची शक्यता आहे.
शिवसेनेच्या नेत्यांनी अंग झटकले
महापौरपद मिळविण्यासाठी शिवसेनेने महापौरपदाचा उमेदवार जाहीर करून सर्व धुरा बोराटे यांच्यावर टाकली आहे. नेत्यांनीही एक प्रकारे या विषयातून अंग काढून घेतल्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे बोराटे यांना आता इतर पक्षाची मनधरणी करावी लागणार आहे. शिवाय नाराज नगरसेवकांची नाराजी दूर करण्यासाठी मोठी ताकद लावावी लागणार आहे. शिवसेनेतील पक्षांतर्गत काही नगरसेवकांची नाराजी बोराटे कशी दूर करणार, हे आगामी काळात दिसून येईल.
भाजप, राष्ट्रवादीचे उमेदवार कोण
भाजप व राष्ट्रवादीने मात्र अद्याप महापौरपदाचा उमेदवार जाहीर केला नाही. वरिष्ठ पातळीवरील नेते निर्णय घेणार असल्याचे कारण दाखवून अंतर्गत घडामोडी घडत आहेत. त्यामुळे महापौरपदासाठी या दोन्ही पक्षाचे उमेदवार कोण, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. दरम्यान, सोमवारपासून महापौरपदासाठी अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ होणार आहे. डिसेंबरला महासभा होऊन मतदान होईल.