nagar election and campaign | Sarkarnama

नगर महापालिका निवडणुकीत अंधश्रद्धेचा कहर, भानामतीचा घेतला आधार ?

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

नगर : महापालिकेच्या निवडणुकीत निवडून येण्यासाठी आता अंधश्रद्धेचा आधार घेतला जात आहे. कोणीतरी राष्ट्रवादी व शिवसेनेच्या उमेदवारांच्या पोस्टरवर अंडी, बकरीचे पाय, दोन काळ्या बाहुल्या, लिंबू, हळदी-कुंकू टाकून हे पटवर्धन चौकात मंगळवारी मध्यरात्री ठेवले. या प्रकाराने या निवडणुकीत अंधःश्रद्धेचाही फंडा कोणीतरी वापरल्याचे दिसून येत आहे. हा जादुटोणा कोणी केला, याबाबत आता शोध घेतला जात आहे. निवडून येण्यासाठी उमेदवार आता जादुटोणा-भानामतीचा आधार घेवू लागले आहेत. याबाबत आज दिवसभर सुगावा लावला जात होता, मात्र कोणाही संशयिताचे नाव पुढे आले नाही.

नगर : महापालिकेच्या निवडणुकीत निवडून येण्यासाठी आता अंधश्रद्धेचा आधार घेतला जात आहे. कोणीतरी राष्ट्रवादी व शिवसेनेच्या उमेदवारांच्या पोस्टरवर अंडी, बकरीचे पाय, दोन काळ्या बाहुल्या, लिंबू, हळदी-कुंकू टाकून हे पटवर्धन चौकात मंगळवारी मध्यरात्री ठेवले. या प्रकाराने या निवडणुकीत अंधःश्रद्धेचाही फंडा कोणीतरी वापरल्याचे दिसून येत आहे. हा जादुटोणा कोणी केला, याबाबत आता शोध घेतला जात आहे. निवडून येण्यासाठी उमेदवार आता जादुटोणा-भानामतीचा आधार घेवू लागले आहेत. याबाबत आज दिवसभर सुगावा लावला जात होता, मात्र कोणाही संशयिताचे नाव पुढे आले नाही. दरम्यान, आज या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे पाहणार असल्याचे समजते. 

विरोधक लढण्या आधीच हारले : वाघ 
आमच्या फोटोवर काळ्या बाहुल्या टाकून संबंधितांनी आपली अल्पबुध्दी दाखवून दिली आहे. असे प्रयोग करून भोंदू बाबाचे भले होईल. सर्वसामान्यांच्या भावनेशी खेळणाऱ्या विरोधकांनी लढण्या आधीच हार मानली आहे, हे यावरून दिसते, असे मत राष्ट्रवादीचे उमेदवार वैभव वाघ यांनी सरकारनामा शी बोलताना सांगितले. 
अंधश्रद्धेला थारा नको : कवडे 
आमच्या प्रभागात जादूटोणा सारखा प्रकार झाला. अज्ञात व्यक्तीने केलेला हा प्रकार म्हणजे अंधश्रद्धेला खतपाणी घालण्यासारखा आहे. आमच्या फोटोवर उतारा टाकून काही फरक पडणार नाही. लोकांनी यावर विश्वास ठेवू नये, अशी प्रतिक्रिया प्रभाग 13 चे शिवसेनेचे उमेदवार उमेश उर्फ गणेश कवडे यांनी सरकारनामा शी बोलताना दिली. 
जिंकण्यासाठी सर्व फंडे 
महापालिका निवडणुकीत जिंकण्यासाठी सर्व उमेदवारांनी जंग-जंग पछाडले आहे. प्रारंभी उमेदवारी मिळण्यासाठी पक्षाची निष्ठा बाजुला ठेवली. जो पक्ष उमेदवारी देईल, तिकडे पळाले. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याच्या आधी पंधरा दिवस अनेक उमेदवार आज एका पक्षात, तर रात्रीतून परिवर्तन होऊन दुसऱ्या दिवशी दुसऱ्या पक्षात जात होते. केडगावमध्ये तर रात्रीतून चमत्कार होऊन कॉंग्रेसचे सर्वच उमेदवार भाजपमध्ये दाखल झाले होते. ही निवडणूक पक्षीय पातळीवर नव्हे, तर वैयक्तिक पातळीवर घेत उमेदवारांनी पक्षाला नव्हे, आपल्याला निवडून द्या, अशीच अप्रत्यक्ष हाक मतदारांना दिली आहे. त्यामुळे केवळ जिंकण्यासाठी सर्व फंडे वापरण्याचे दिसून येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून भानामती-जादुटोणाही यातून सुटला नाही. 

संबंधित लेख