Nagar District Water Issue | Sarkarnama

पाणी प्रश्न पेटला : पिचड, गडाख आक्रमक; विखे, थोरातांची भूमिका काय?

मुरलीधर कराळे
सोमवार, 29 ऑक्टोबर 2018

नाशिक, नगर जिल्ह्यातील पाणी पळविण्यास मराठवाड्यातील नेते यशस्वी झाले. जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय झाला. जायकवाडीत पुरेसा पाणीसाठा असतानाही घाईने झालेला हा निर्णय नाशिक व नगर जिल्ह्यातील नेते व शेतकऱ्यांच्या जिव्हारी लागला.

नगर : नगरच्या भंडारदरा, निळवंडे, मुळा धरणातील पाणी जायकवाडीला सोडण्याच्या निर्णयाविरोधात अकोले तालुक्यात बंद पाळून निषेध नोंदविण्यात आला. आजही आंदोलनाची धग कायम आहे. आज (सोमवारी) अगस्ती सेतूवर सत्याग्रह करून प्रसंगी पाण्यासोबत वाहत जाण्याची तयारी शेतकऱ्यांनी ठेवली आहे. याप्रकरणी शेतकरी क्रांतिकारी पक्षाचे नेते माजी आमदार शंकरराव गडाख, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार वैभव पिचड आक्रमक झाले आहेत. मात्र काँग्रेसचे दोन्ही नेते विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील व बाळासाहेब थोरात यांनी आपली भूमिका स्पष्ट करून आंदोलनात उडी घ्यावी, अशी अपेक्षा शेतकरी करीत आहेत.

नाशिक, नगर जिल्ह्यातील पाणी पळविण्यास मराठवाड्यातील नेते यशस्वी झाले. जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय झाला. जायकवाडीत पुरेसा पाणीसाठा असतानाही घाईने झालेला हा निर्णय नाशिक व नगर जिल्ह्यातील नेते व शेतकऱ्यांच्या जिव्हारी लागला. आंदोलनाचा पहिलाच धडाका नेवासे तालुक्याचे माजी आमदार शेतकरी क्रांतिकारी पक्षाचे नेते शंकरराव गडाख यांनी लावला. हजारो शेतकरी घेवून ते थेट मुळा धरणाच्या पाण्यात जलसमाधी घेण्यास निघाले. पोलिस प्रशासनाने अडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी लगेचच धरणात उडी घेण्याची धमकी दिली होती. भर पावसात झालेले हे आंदोलन शेतकऱ्यांना संघटित करण्यास पुरेसे झाले.

याच पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून आंदोलने सुरू झाली. अकोले शहर पूर्णपणे बंद ठेवून सरकारच्या या धोरणाचा निषेध करण्यात आला. अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांनी राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन उभारले. आज (सोमवारी) अगस्ती सेतू पुलावर बसून सत्याग्रह करण्याचा निर्णय झाला. निळवंडेतून पाणी सोडल्यास अगस्ती पुलावरून पाणी जाते. जायकवाडीला पाणी सोडण्याच्या निर्णयामुळे या धरणातून केव्हाही पाणी सोडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत अकोले येथील अगस्ती पुलावर शेतकरी बसले, तर वाहून जाण्याचा मोठा धोका आहे. पण हा धोका पत्कारून आमदार पिचड यांच्यासह शेतकरी उद्या पुलावर ठाण मांडून बसणार आहेत.

निवडणुकीला मिळाला नवीन विषय
दुष्काळी परिस्थितीचा फटका यंदा संपूर्ण जिल्ह्याला बसणार आहे. त्यात जायकवाडीला पाणी सोडण्यामुळे अडचणीत भरच पडणार आहे. अकोले, संगमनेर, राहाता, नेवासे, राहुरी आदी तालक्यांना सर्वांत जास्त झळ बसणार आहे. या तालुक्यांतील नेते जर आक्रमक झाले नाहीत, तर त्याचा फटका विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना बसणार आहे. कारण संबंधित विरोधक त्याचे भांडवल करतील, यात शंका नाही. शेतकऱ्यांच्या दृष्टीने असलेल्या अशा बिकट परिस्थितीत जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी पक्षाचे जोडे बाजूला ठेवून एकत्र येण्याची गरज आहे, अशी अपेक्षा शेतकरी करू लागले आहेत. 

विखे पाटलांचे मित्र काय कामाचे
उत्तरेत पाण्यासाठी लढा तीव्र असताना संगमनेरचे आमदार माजी मंत्री बाळासाहेब थोरात, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी मात्र आपली भूमिका ठामपणे मांडली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमधून रोष व्यक्त होत आहे. मुख्यमंत्र्यांच्या जवळचे मित्र म्हणविणाऱ्या विखे पाटील यांनी आपल्या मित्राला सांगून पाणी सोडण्याचा निर्णय थांबवावा, अशी प्रतिक्रिया उत्तरेतील शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहेत.

2019 मधली राजकीय समीकरणे कशी असतील...?
या विषयावर अधिक माहितीसाठी आजच 'सरकारनामा'चा दिवाळी अंक बुक करा अॅमेझॉनवर सवलतीच्या दरात...
अधिक माहितीसाठी -
व्हॉट्सअॅप : 91300 88459 
फोन : 9881598815

ईमेल : webeditor@esakal.com

संबंधित लेख