Nagar district politics | Sarkarnama

नगर जिल्हा नियोजन समितीवरही भाजपचेच वर्चस्व राहणार? 

वृत्तसंस्था
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण मतदारसंघाच्या आठ जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामेध्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सुधाकर दंडवते, माधवराव लामखडे, कॉंग्रेसचे राजेश परजणे, भाजपचे जालिंदर वाकचौरे, जनशक्तीच्या हर्षदा काकडे आदींचा समावेश आहे. त्यामुळे ही निवड चुरशीची होणार आहे

नगर  : जिल्ह्यातील विविध पंचायत समित्या, नगरपालिकांवर वर्चस्व मिळविल्यानंतर उद्या (ता. 22) होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत भाजपचेच वर्चस्व राहण्याची चिन्हे आहेत.

कारण यापूर्वीच बिनविरोध झालेल्या दहापैकी चार जागा भाजपने मिळविल्या आहेत. उद्या होणाऱ्या निवडणुकीतही भाजपचाच वरचष्मा राहण्याची शक्‍यता आहे. 

जिल्हा नियोजन समितीसाठी 26 जागांसाठी उद्या मतदान होत आहे. अर्ज मागे घेण्याच्या दिवशी भाजपच्या चार, कॉंग्रेसच्या दोन, तर राष्ट्रवादीची एक जागा बिनविरोध झाली होती. साहजीकच भाजपचे संख्याबळ आधीच वाढलेले आहे. असे असले, तरी इतर जागांमधूनही भाजपचेच उमेदवार निवडून येण्यासाठी भाजपने "फिल्डिंग' लावली आहे. पालकमंत्री प्रा. राम शिंदे, खासदार दिलीप गांधी, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी या समितीच्या निवडणुकीत जास्त लक्ष घातले आहे. 

यापूर्वी बिनविरोध निवडून आलेल्यांमध्ये भाजपचे ललिता शिरसाठ, संध्या आठरे, कांतीलाल घोडके, सोमीनाथ पाचरणे या चौघांचा समावेशआहे. कॉंग्रेसचे शालिनी विखे पाटील व कविता लहारे यांचा, तर राष्ट्रवादीच्या तेजश्री लंघे यांचा बिनविरोधमध्ये समावेश आहे. 

जुळवून घेत साधला डाव 

भाजपने कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसशी जुळवून घेत आपल्या चार जागा बिनविरोध करून घेतल्या. कॉंग्रेस व राष्ट्रवादीला कमी जागा बिनविरोध करता आल्या असल्या, तरी कार्यकर्त्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. वरिष्ठ पातळीवर नेत्यांशी चर्चा करून उमेदवार निवडून येण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भाजपची सध्याच राज्यपातळीवर व केंद्रातही सत्ता असल्याने जुळवाजुळवीची गणिते सोपे जात असल्याचे भाजपच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 

. नगर येथील महासैनिक लॉन येथे उद्या (ता. 22) सकाळी 8 वाजता मतदान सुरू होईल. सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान सुरू राहिल. दुसऱ्या दिवशी (ता. 23) त्याच ठिकाणी सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू होईल. त्यासाठी 23 अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्‍त्या करण्यात आल्या आहेत. अतिरिक्त जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान होणार आहे.
 

संबंधित लेख