Nagar Corporation Election Who Will Stall BJP | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

नगर महापालिका निवडणूक : भाजपला रोखण्याचे आव्हान शिवसेना की आघाडी पेलणार?

मुरलीधर कराळे
मंगळवार, 27 नोव्हेंबर 2018

महापालिका निवडणुकीत सर्व पक्षाच्या आधी प्रचाराचा नारळ वाढवून आघाडी घेतलेल्या भाजपच्या उमेदवारांचे अर्जही वैध ठरले आहे. दुसऱ्यांदा जोरदार फटाके फोडत विजयोत्सव साजरा केलेल्या भाजपला आता शिवसेना की राष्ट्रवादी काँग्रेस -काँग्रेस आघाडी रोखणार, की भाजपचा वारू असाच उधळत राहणार, याकडे आता लक्ष लागले आहे.

नगर : महापालिका निवडणुकीत सर्व पक्षाच्या आधी प्रचाराचा नारळ वाढवून आघाडी घेतलेल्या भाजपच्या उमेदवारांचे अर्जही वैध ठरले आहे. दुसऱ्यांदा जोरदार फटाके फोडत विजयोत्सव साजरा केलेल्या भाजपला आता शिवसेना की राष्ट्रवादी काँग्रेस -काँग्रेस आघाडी रोखणार, की भाजपचा वारू असाच उधळत राहणार, याकडे आता लक्ष लागले आहे.

महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच भाजप व शिवसेना स्वतंत्रपणे लढणार, असे चित्र निर्माण झाले होते. छिंदम प्रकरण, केडगाव दुहेरी हत्याकांड या प्रकरणांमुळे शिवसेना व भाजपचीही गोची झाली. छिंदम हा भाजपचा कार्यकर्ता होता, त्यामुळे भाजपचे त्याला पाठबळ होते, असे म्हटले जात असे. या कारणाने भाजप नेते संकटात होते. नंतर मात्र हे वातावरण निवळले. शिवसेना व भाजपमधील नगरसेवकांचे जमेना. वारंवार आरोपाच्या फैरी सुरू होत्या. महापालिका निवडणुका जवळ आल्या त्या वेळी हे संबंध अधिकच ताणले गेले. त्यात वरिष्ठ पातळीवरून दोन्ही पक्षाची युती होण्याचे संकेत दिसत नसल्याने हे संबंध अधिकच बिघडले. नंतर मात्र दोन्ही पक्षांनी आपण स्वतंत्रपणे लढणार असल्याचे जाहीर करून वेगळी चूल मांडली. सर्व प्रभागांत आपले स्वतंत्र उमेदवार दिले.

शिवसेना व भाजपच्या उमेदवार खेचाखेचीत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसला उमेदवारही मिळेनासे झाले. त्यामुळे कमी उमेदवारात महापालिकेवर आपला झेंडा फडकविण्याचे स्वप्न राष्ट्रवादीने पाहिले. काँग्रेस व राष्ट्रवादी यांची आघाडी असली, तरी त्यांना उमेदवार जमवता आले नाहीत. केडगावमधील काँग्रेसचे आठही उमेदवार शेवटच्या दिवशी भाजपने पळवून काँग्रेसचे खच्चीकरण केले. सोबतच राष्ट्रवादीलाही ब्रेक दिला. या सर्व घडामोडी सध्यातरी भाजपच्याच पथ्थ्यावर पडल्या आहेत. 

मध्यंतरी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने भाजपमधील खासदार दिलीप गांधी व ज्येष्ठ नेते अॅड. अभय आगरकर यांच्या गटाचे मनोमिलन झाले. त्यामुळे भाजपमध्ये दुफळी राहिली नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. खासदार दिलीप गांधी यांचे पूत्र सुवेंद्र व स्नुषा दिप्ती गांधी यांचे अर्ज अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून बाद झाले होते. उच्च न्यायालयात मात्र त्यांना दिलासा मिळाला, या भाजपच्या जमेच्या बाजू ठरल्या. 

प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या सभेने तर भाजपमध्ये नवचैतन्य आले आहे. त्यात आता आगामी काळात भाजपच्या सर्वच महत्त्वाच्या नेत्यांच्या सभा होणार आहेत. शेवटच्या दिवशी मुख्यमंत्रीही येणार आहेत. एकूणच शहरात भाजप रोज काही ना काही निमित्ताने फटाके फोडणार, हे निश्चित झाले आहे. त्यामुळे भाजपच्या या अच्छे दिनाचे वातावरण बदलून टाकण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे नेते आता कोणता फंडा वापरतात, हे काळच ठरविणार आहे.

संबंधित लेख