nagar corporation election : police detains political workers on the suspicion of money distribution | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

नगर महापालिका निवडणूक : पैसे वाटपाच्या संशयावरून कार्यकर्त्यांची धरपकड 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 8 डिसेंबर 2018

महापालिकेसाठी उद्या (रविवारी) मतदान होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर मतदारांना पैसे वाटप करण्याच्या संशयावरून शहरात कार्यकर्त्यांची धरपकड सुरू होती.

नगर : महापालिकेसाठी उद्या (रविवारी) मतदान होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर मतदारांना पैसे वाटप करण्याच्या संशयावरून शहरात कार्यकर्त्यांची धरपकड सुरू होती. रात्री आठच्या दरम्यान केडगाव येथे काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेवून सोडून दिले. याबाबत रात्री उशिरापर्यंत कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, महापालिकेच्या भरारी पथकाने काही रक्कम रात्री उशिरा जप्त केल्याचे समजते. 

मतदारांना अशी आर्थिक व अन्य स्वरूपाची प्रलोभने दाखविणाऱ्यांवर "वॉच' ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी यांनी विशेष 23 पथके तैनात केली आहेत. शहराच्या विविध भागांत थांबलेल्या या पथकांचा सोशल मीडियावर एक स्वतंत्र ग्रुप तयार केला आहे. त्यावर तक्रारी व त्याबाबतची घटनास्थळे टाकली जात होती. त्यावरून घटनास्थळाच्या जवळ असलेल्या पथकांकडे तेथे छापा घालण्याची जबाबदारी होती. स्वत: जिल्हाधिकारी द्विवेदीदेखील या ग्रुपमध्ये असून, त्यांचेही ग्रुपवर येणाऱ्या तक्रारींकडे बारीक लक्ष होते. मात्र, जेथून तक्रार आली, त्या भागात पथक पोचण्यापूर्वी गैरप्रकार करणारे पसार होत असल्याने पथकाच्या हाती अखेरपर्यंत काहीच लागले नाही. 

दरम्यान, निवडणुकीच्या काळात मतदारांना विविध प्रलोभने दाखविली जातात. त्यावर आळा घालण्यासाठी प्रशासनाने 23 पथकांची नियुक्ती केली आहे. नागरिकांकडून तक्रार दाखल होताच, काही क्षणातच पथक तक्रारदाराने दिलेल्या पत्त्यावर धडकते. मात्र, काही नागरिकांकडून दिशाभूल केली जाते. त्यामुळे नागरिकांनी वाटपाच्या ठिकाणाची सत्य माहिती प्रशासनाला द्यावी, जेणेकरून गैरव्यवहारावर प्रशासनाला आळा घालता येईल, असे आवाहन आचारसंहिता कक्षप्रमुख संदीप निचित यांनी केले आहे. 

संबंधित लेख