nagar collector rahul dwiwedi issue | Sarkarnama

निवृत्त कर्नलने नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांना शाळेतून हाकलले

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल प्रशासनाला आयकॉन पब्लिक स्कूलच्या जमिनीसंदर्भात माहिती गोळा करण्याचे निर्देश दिले आहेत. 

नगर : शहरातील शरद मुथा एज्युकेशन ट्रस्टच्या आयकॉन पब्लिक स्कूलमध्ये मतदान केंद्रासाठी शाळाखोल्यांची पाहणी करण्यासाठी गेलेले जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना शाळेच्या संचालकांनी हाकलून दिल्याचा प्रकार बुधवारी दुपारी घडला. त्यामुळे जिल्हा प्रशासनासह शहरात खळबळ उडाली. याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत महापालिकेचे उपायुक्त प्रदीप पठारे णाले, "नऊ डिसेंबरला महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होत असून, त्यासाठी मतदान केंद्रे निश्‍चित करण्यात आली आहेत. त्यातील काही मतदान केंद्रातील अडचणींमुळे जवळपासच्या शाळांमध्ये जागा उपलब्ध होईल का, याची तपासणी महापालिका प्रशासनाकडून सुरू आहे. बुधवारी (ता. 28) दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्यासह उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर, शहर अभियंता विलास सोनटक्के, उपअभियंता कल्याण बल्लाळ आदींनी रेल्वेस्थानक रस्त्यावरील महापालिकेच्या शाळेची पाहणी केली. 

त्यानंतर जवळच असलेल्या आयकॉन पब्लिक स्कूलमध्ये मतदान केंद्र प्रस्तावित करता येईल का? तेथे जागा उपलब्ध होईल का? याची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसह निवडणूक निर्णय अधिकारी गेले असता, शाळेच्या आवारात गेल्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांना सांगितले, की जिल्हाधिकारी आले असून, प्राचार्यांना बोलावून घ्या. त्यांनी संचालक राणा यांना जिल्हाधिकारी आल्याचे सांगितले. त्या वेळी राणा यांनी जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या कक्षामध्ये येण्यास सांगितले. पुन्हा निरोप पाठविल्यानंतर राणा जिल्हाधिकाऱ्यांकडे आले. अधिकाऱ्यांनी त्यांची जिल्हाधिकाऱ्यांशी ओळख करून दिली. शाळेत मतदान केंद्र देता येईल का, त्यासाठी शाळाखोल्यांची पाहणी करावयाची आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यावर राणा यांनी शाळाखोल्या पाहण्यास मज्जाव करीत तुम्ही शाळेच्या आवारात कोणाच्या सांगण्यावरून आलात, असा सवाल करून बाहेर जाण्यास सांगितले.''

या प्रकरणी उपायुक्त प्रदीप पठारे यांच्या फिर्यादीवरून आयकॉन स्कूलचे संचालक कर्नल (निवृत्त) आर. सी. राणा यांच्याविरुद्ध शाळाखोल्या पाहण्यास मज्जाव केल्याचा आणि सरकारी कामात अडथळा आणल्याच्या कारणावरून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  
आज सकाळच्या घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल प्रशासनाला आयकॉन पब्लिक स्कूलच्या जमिनीसंदर्भात माहिती गोळा करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार आज सायंकाळपर्यंत या शाळेची परवानगी, जमीन आदींसंदर्भात माहिती गोळा करण्याचे काम सुरू होते. यात जमिनीसंदर्भात काही महत्त्वाची कागदपत्रे महसूल प्रशासनाच्या हाती लागली आहेत, असे विश्‍वसनीय सूत्रांकडून समजते.

आयकॉन स्कूलच्या संबंधितांनी आम्हाला निवडणूक कामासाठी मज्जाव केल्याची चूक लेखी स्वरूपात मान्य केली आहे. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता निवडणूक कामात सहकार्य करण्याचे त्यांनी मान्य केले आहे.

- राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी
 
जिल्हाधिकारी अथवा इतर अधिकाऱ्यांच्या कामात संस्थेच्या कोणीही अडथळा आणला नाही. उलट शाळेचे संचालक कर्नल आर. सी. राणा यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दालनात येऊन चहा घेण्याची विनंती केली होती; परंतु ती मान्य न करता उलट गुन्हा दाखल केला.
- शरद मुथा, विश्‍वस्त, शरद मुथा एज्युकेशन ट्रस्ट

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख