nagar chindam bell grant | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

कर्नाटक: कुमारस्वामी यांच्या शपथविधीसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार

छिंदमला गोपनीयरित्या नगरला आणले, जामीन मिळाला मात्र सुटका नाही! 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 9 मार्च 2018

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अपशब्द वापरल्याने तुरुंगात रवानगी झालेल्या श्रीपाद छिंदमला आज नगरच्या न्यायालयात आणण्यात आले. याप्रकरणात त्याचा जामीन अर्ज मंजूर झाला, परंतु दुसऱ्या एका गुन्ह्यात त्याला दहा दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. न्यायदंडाधिकारी र. म. कुलकर्णी यांच्यासमोर ही सुनावणी झाली. 

नगर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अपशब्द वापरल्याने तुरुंगात रवानगी झालेल्या श्रीपाद छिंदमला आज नगरच्या न्यायालयात आणण्यात आले. याप्रकरणात त्याचा जामीन अर्ज मंजूर झाला, परंतु दुसऱ्या एका गुन्ह्यात त्याला दहा दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. न्यायदंडाधिकारी र. म. कुलकर्णी यांच्यासमोर ही सुनावणी झाली. 

आज अत्यंत गोपनियपणे छिंदम याला नगरच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. जामीन मिळण्यासाठी त्याने अर्ज दिला होता. त्यावर आज सुनावणी झाली. त्याने अर्जात स्वतःवरील आरोप नाकारत फिर्यादी दिलीप सातपुते यांच्याबरोबर आपला राजकीय वाद असल्याने त्याने आपल्याविरुद्ध खोटी फिर्याद दाखल केल्याचे म्हटले आहे. तसेच आई शुगरने आजारी असून, तिची देखभाल करणे व कुटुंबातील कर्ता असल्याने जामीन मंजूर करावा, अशी भूमिका त्याने मांडली होती. न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज मंजूर करीत दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत प्रत्येक रविवारी छिंदम याने पोलीस ठाण्यात हजेरी देण्याची अट घातली आहे. तसेच पोलीस तपासात हस्तक्षेप न करण्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. 

दरम्यान, महापालिकेच्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात छिंदमला 19 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. त्यामुळे त्याचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. 

घटनेची पार्श्वभूमी ः मागील महिन्यात उपमहापौर पदावर असताना श्रीपाद छिंदम याने महापालिकेच्या एका कर्मचाऱ्यास दूरध्वनीवरून काही कामाबाबत सुनावले. त्यामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अपशब्दही वापरले. त्याची ध्वनीफित सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाली. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी छिंदम याचे कार्यालय व घराची तोडफोड करून शहरात आंदोलने केली. नंतर जिल्हाभर हे आंदोलने झाले. याबाबत नगरच्या तोफखाना पोलिस ठाण्यात छिंदम याच्याविरोधात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गुन्हा दाखल केला. या प्रकारामुळे छिंदम याने उपमहापौरपदाचा राजीनामा दिला. तसेच त्याची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली. पोलिसांनी छिंदम याला अटक केल्यानंतर त्याला पोलिस कोठडी न देता थेट न्यायालयीन कोठडी देण्यात आली. प्रथम नगरच्या सबजेलमध्ये ठेवण्यात आले. नंतर सुरक्षेच्या कारणावरून नाशिकच्या जेलमध्ये रवानगी करण्यात आली. या प्रकरणी आज नगरच्या न्यायालयात सुनावणी झाली. त्यासाठी छिंदम याला अत्यंत गोपनीयता ठेवून आणण्यात आले होते. 

संबंधित लेख