my work appreciated by corporators : Munde | Sarkarnama

मी चांगले काम करतो हे नगरसेवकांना खासगीत मान्य : तुकाराम मुंडे

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

नाशिकचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनीच त्यात पुढाकार घेतल्याने जनतेत नाराजी आहे. मुंडे यांच्यामुळे नगरसेवकांचे महत्त्व कमी झाल्याच्या न्यूनगंडांतून हा ठराव आणल्याचे बोलले जात आहे.

पुणे :"लोकांना केंद्रबिंदू मानून मी काम करतोय. ज्यावेळी प्रचलित पद्धत मोडून मी नव्या पद्धतीने काम करायला लागलो तर त्याचा मला त्रास होतो. पण लोकांच्यासाठी मला काम करायचे आहे. लोकांचा माझ्यावर विश्वास आणि प्रेम आहे. त्या प्रेमाचा दबाब येतो, अशी भावना नाशिकचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांनी व्यक्त केली.

नाशिक महापालिकेतील नगरसेवक मुंडे यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याच्या तयारीत आहेत. त्याबाबत त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. नाशिकमधील लोक माझ्यासोबत असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनाही मुंडे यांची कार्यपद्धती आवडत असल्याचे या वेळी सांगितले.

 
ते म्हणाले, ``सामान्य लोकांना माझी कार्यपद्धती आवडते. पण राजकारणी लोकांना माझा त्रास होतोय. मी जेथे गेलो तेथील जनता माझ्या सोबत राहिली. नाशिकमध्येही लोक माझ्यासोबत आहेत. नाशिकमध्ये माझ्यावर जे आरोप केले आहेत त्यात तथ्य नाही. काही नगरसेवकांना मी लोकांशी थेट बोलतोय हे आवडत नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की मी लोकांशी बोलत आहे म्हणून लोक त्यांना विचारत नाहीत. त्यांचं हे म्हणणं चुकीचं आहे. मी कोणत्याही परवानगीशिवाय लोकांना रोज चार ते पाच वेळेत भेटतो. लोकांच्या तक्रारी ऐकतो. त्यांच्या तक्रारीचे निवारण करतो, हे नगरसेवकांना आवडत नाही. आयुक्त लोकांना थेट भेटण्यावर त्यांचा आक्षेप आहे.

मी जे काम करतोय हे चांगलं आहे असं काही नगरसेवक खाजगीत मान्य करतात. पण जाहीरपणे मान्य करत नाहीत. मी प्रोसिजर प्रमाणे काम करतोय. पण त्याला विरोध होतोय.पण मी माझ्या पद्धतीने काम करतोय. कोणाच्या दबावाला बळी पडणार नाही." असेही त्यांनी स्पष्ट केले. नाशिकमधील घडामोडींची माहीती राज्याचे मुख्य सचिव आणि मुख्यमंत्र्यांना कळवत असतो. त्यांच्या सूचनाांनुसार माझ्यात बदलही करत असतो, असे त्यांनी सांगितले.

संबंधित लेख