माझी बायको आणि माझे सासरे ( रावसाहेब दानवे ) मला वैतागले   :  हर्षवर्धन जाधव   

चिंतन बैठकीत आपली मते मांडणाऱ्या बहुतांश वक्‍त्यांनी हर्षवर्धन जाधव यांचा भावी खासदार असा उल्लेख करत त्यांना आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याचा आग्रह देखील केला.
danve-Jadhav.
danve-Jadhav.

औरंगाबादः "  नवा पक्ष स्थापन करण्यावरून  माझी बायको आणि माझे सासरे ( रावसाहेब दानवे )   मला वैतागले आहेत  . मी आमदार किंवा खासदार होण्यासाठी पक्ष काढत नाहीये. तेवढच व्हायंच असतं तर माझे सासरे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहे, त्यांनी मला कुठूनही तिकीट दिले असते. पण आपल्याला त्यांच्या सोबत जायच नाही. हा ऐकतच नाही म्हणत माझे सासरे डोक्‍याला हात मारून घेतात," अशा शब्दात आमदार हर्षवर्धन जाधव यांनी नवा पक्ष स्थापन करण्यावरून त्यांच्या कुटुंबात चाललेल्या ताण तणावाची माहिती  चिंतन बैठकीत   दिली . 

भाजपचे प्रदेश अध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे हे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांचे सासरे आहेत . हर्षवर्धन जाधव यांनी नवा राजकीय पक्ष काढण्यास रावसाहेब दानवे यांचाही तीव्र विरोध आहे . तसेच  हर्षवर्धन यांच्या सौभाग्यवतींचाही विरोध आहे . याबाबात बोलताना आमदार हर्षवर्धन जाधव हसत हसत पुढे म्हणाले ," राजकीय पक्ष काढण्याचा रिकामा उद्योग कशाला करता ? यावरून बायकोचेही बोलणे मला खावे लागतात. पण मी ऐकणार नाही म्हटल्यावर तिनेही 'तुम्हाला काय करायचे ते करा'"  असे सांगून टाकले. 

" राजकीय पक्ष काढण सोप काम नाही, याची मला जाणीव आहे. लोक मला वेड्यात काढतात, पक्ष चालवायला पैसा लागतो, माणसं लागतात हे खर आहे. मी पैसा कमावला नसला तरी माणसं खूप कमावली आहे. त्यामुळे मी त्यांच्या पाठिंब्यावर यशस्वी होणारच. फिजिक्‍सच्या सिध्दांता प्रमाणे जसा प्लास्टीकचा चेंडू महासागरात टाकला तरी बुडत नाही, तसा मी देखील बुडणार नाही,' असा विश्‍वास हर्षवर्धन जाधव यांनी  व्यक्त केला. 

मराठा, मुस्लिम, धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी स्वंतत्र राजकीय पक्ष काढण्याची संकल्पना हर्षवर्धन जाधव यांनी केली होती. यावरून त्यांच्यावर टिका देखील झाली. पण सामाजिक विषमता नाहीसी करण्यासाठी आपण राजकीय पक्ष काढत असल्याची घोषणा जाधव यांनी आजच्या चिंतन बैठकीत केली. 

"मराठा आरक्षणावरून केले जाणारे राजकारण, चाळीसहून अधिक तरुणांनी केलेल्या आत्महत्या आणि राजकीय पक्षांकडून पसरवली जात असलेली सामाजिक विषमता यामुळे उद्विग्न होऊन आपण राजकीय पक्ष काढण्याचा निर्णय घेतला .  मराठा, धनगर तरूणांच्या आरक्षणासाठी होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी आपण समुपदेशन यात्रा काढली तरी आत्महत्या थांबल्या नाही ही वस्तुस्थिती आहे. " असेही आमदार जाधव म्हणाले . 

छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित स्वराज्य निर्माण करायचे असेल तर अठरा पगड जातीला सोबत घ्यावेच लागेल आणि म्हणून मी हा प्रयत्न करतोय. माझ्या राजकीय आयुष्यात जी माणस मी जोडली त्यांच्या पाठिंब्यावर मी यशस्वी होईल असा दावा देखील हर्षवर्धन जाधव यांनी केला. 

आपल्या पक्षात सगळ्या जाती-धर्म समाजाला प्रतिनिधित्व असेल. प्रत्येक समाजातील वीस लोकांचा पक्षातील कमिटीत समावेश असणार आहे. मी पक्षाचा अध्यक्ष असलो तरी निर्णय घेण्याचा अधिकार या लोकांना असेल. महिनाभरात पक्षाची नोंदणी झाल्यांनतर नंदुरबार जिल्हा परिषद आणि धुळे महापालिकेत उमेदवार देणार असल्याचेही हर्षवर्धन जाधव यांनी जाहीर केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com