My mother had told me that if the situation arises leave politics but never leave Pawar saheb | Sarkarnama

आई म्हणाली होती ,वेळ पडली तर राजकारण सोड ,पण  पवार साहेबांना  सोडू नको

दत्ता देशमुख
बुधवार, 3 ऑक्टोबर 2018

अक्षय मुंदडा यांचे भाषण झाले. त्यामुळे त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांच्या मोहिमेतील बळच निघून गेले. 

बीड :  " माझी आई  खूप आजारी असताना शरद पवार भेटून गेले. मृत्यूच्या दोन दिवस अगोदर आईने माझा हात हातात घेतला आणि मला म्हणाली, 'अक्षय पवार साहेबांनी मला खूप काही न  मागता दिलंय, मी आता नसेन.   वेळ पडली तर राजकारण सोड मात्र पवार साहेबांना सोडू नको' ," अक्षय मुंदडा बोलत होते आणि सभेत  एकदम शांतता पसरली  .  

 शरद पवार यांच्या उपस्थितीत सोमवारी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या  विजयी संकल्प मेळाव्यात जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघातील प्रमुखांना भाषणाची संधी मिळाली. यामध्ये केजमधून प्रमुख म्हणून अक्षय मुंदडा यांचे भाषण झाले. 

अक्षय मुंदडा म्हणाले," दिवंगत विमलताई मुंदडा यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सत्तेत असलेला भाजप पक्ष सोडला. विमलताईंचे काम आणि निष्ठा पाहून शरद पवार यांनीही 10 वर्षे मंत्रिपदाची संधी दिली. मंत्रीपद  आणि सत्तेच्या माध्यमातून मतदार संघात जिल्हा निर्मितीच्या दृष्टीने अनेक नवीन  कार्यालये झाली. विकासाच्या योजना झाल्या. आता सर्व कामे ठप्प आहेत, दुष्काळ असताना प्रशासन आणि राज्यकर्ते काहीही उपाय योजना करत नाहीत. "

श्री पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यानंतर संयोजकांनी मोजकीच भाषणे ठेवली. मतदार संघांच्या प्रमुखांसह संदीप क्षीरसागरांचे प्रास्ताविक आणि जिल्हाध्यक्ष म्हणून बजरंग सोनवणे यांच्यासहत जिल्ह्यातील सहा नेत्यांची भाषणे झाली. परळीतुन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, बीडमधून जयदत्त क्षीरसागर, माजलगावमधून प्रकाश सोळंके, गेवराईतून अमरसिंह पंडित, आष्टीतून बाळासाहेब आजबे आणि केजमधून अक्षय मुंदडा यांचेही भाषण झाले. त्यामुळे त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांच्या मोहिमेतील बळच निघून गेले. 

दिवंगत लोकनेत्या डॉ. विमल मुंदडा यांच्या अकाली निधनानंतर 2012 मध्ये पोट निवडणुकीत पृथ्वीराज साठे विजयी झाले होते. दरम्यान, मागच्या वर्षभरात पक्षांतर्गत घडामोडीत हा गट पुन्हा मुंदडा यांच्या विरोधात सक्रिय झाला. याच काळात धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके यांच्यापासून मुंदडा दुरावल्याने या गटाच्या आशा अधिकच उंचावल्या होत्या. 

अगदी शरद पवार पोचल्यापासून परत निघेपर्यंत अक्षय मुंदडा आसपासच होते. मुंदडा कुटुंबीयांना संवाद साधायचा पवारांनी वेळ दिला. धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके व अमरसिंह पंडित यांची शेवटच्या टप्प्यात मदत मिळेल ,अशी विरोधी गटाची आशा होती. पण, दौऱ्यात अक्षय मुंदडा यांचा या तीन नेत्यांशी संवाद वाढल्याचे दिसले. आता पुढे काय काय घडते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

संबंधित लेख