माझे पती निर्दोष, त्यांना गोवण्यात आले - शीतल अंदुरे 

माझे पती सचिन अंदुरे हे निर्दोष आहेत. एटीएसने देखील तसे स्पष्ट करून 16 ऑगस्टला त्यांची सुटका केली होती. पण चौकशीच्या नावाखाली सीबीआयने पुन्हा त्यांना ताब्यात घेतले आणि विश्‍वासघात केला. -शीतल अंदुरे
andure
andure

औरंगाबाद : " माझे पती सचिन अंदुरे हे निर्दोष आहेत. एटीएसने देखील तसे स्पष्ट करून 16 ऑगस्टला त्यांची सुटका केली होती. पण चौकशीच्या नावाखाली सीबीआयने पुन्हा त्यांना ताब्यात घेतले आणि विश्‍वासघात केला. सचिन यांचा कुठल्याही संघटनेशी संबंध किंवा संपर्क नव्हता. पण पोलीसांना 20 ऑगस्टपर्यंत कुठल्या न कुठल्या आरोपीला अटक करायची होती, म्हणून त्यांनी माझ्या नवऱ्याला अडकवले ,"असा आरोप दाभोळकर हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या औरंगाबाद येथीस सचिन अंदुरे यांची  पत्नी शीतल अंदुरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना केला आहे. 

केसापुरी येथील शरद कळसकर याला अटक केल्यानंतर त्यानी दिलेल्या माहितीच्या आधारे एटीएसच्या पथकाने 14 ऑगस्ट रोजी धावणी मोहल्ला येथे राहत असलेल्या सचिन अंदुरे यास अटक केली होती. दाभोळकरांवर गोडी झाडणारा सचिन अंदुरेच असल्याचा दावा देखील एटीएसने केला आहे. 

या संदर्भात सचिन अंदुरेची पत्नी शितल यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना आपला पती निर्दोष असून त्याला गोवण्यात आल्याचा आरोप केला आहे. त्या म्हणाल्या ,"14 ऑगस्ट रोजी एटीएसच्या अधिकाऱ्यांनी आमच्या घराची झाडाझडती घेतली तेव्हा त्यांना एकही आक्षेपार्ह  गोष्ट सापडली नव्हती. तरी त्यांना दोन दिवस मुंबईला घेऊन गेले. 16 ऑगस्टला सचिन यांना एटीएसच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा घरी आणून सोडले आणि तुमचा पती निर्दोष आहे असे सांगितले. "

" पण एटीएसने सुटका केल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ आलेल्या सीबीआयने पुन्हा माझे पती सचिन यांना काही चौकशी करायची आहे, त्यामुळे तु आमच्या बरोबर चल, तुला काहीही होणार नाही, चौकशी करून सोडून देऊ असे सांगितले होते. दरम्यान, माझे सचिन यांच्यांशी फोनवरून बोलणे व्हायचे, तेव्हा त्यांनी देखील मी काही चुकीचे केलेले नाही. त्यामुळे काही होणार नाही, सीबीआय मला चौकशी करून सोडून देणार असल्याचे मला सांगितले. "

" प्रत्यक्षात त्यांना न सोडता त्यांच्यावर आरोप करून त्यांना अडकवण्यात आले. सचिन यांना मी कॉलेजपासून ओळखते. त्यामुळे ते अस काही करूच शकत नाहीत, माझा त्यांच्यावर पुर्ण विश्‍वास आहे. सीबीआयवाल्यांना 20 ऑगस्टपर्यंत आरोपींना पकडण्याची डेडलाईन होती. त्यामुळेच त्यांनी माझ्या पतीला अडकवले आहे, सीबीआयने हे चुकीचे केले.", असेही त्या म्हणाल्या . 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com