My father taught me to treat political opponent with respect : Pankaja Munde | Sarkarnama

माझ्या वडिलांचा संस्कार राजकीय विरोधकांनाही  सन्मानाने वागवण्याचा : पंकजा मुंडे 

दत्ता देशमुख 
शुक्रवार, 9 नोव्हेंबर 2018

पंकजा मुंडे व त्यांचे  पती डॉ. अमित पालवे सध्या परळीत दिवाळी साजरी करीत आहेत. या निमित्ताने व्यापारी व सामान्यांना शुभेच्छा देऊन संपर्क वाढवीत आहेत. 

 

बीड :  " राजकीय विरोधकांनाही  सन्मानाने वागवण्याचे  संस्कार माझे वडील  कै . गोपीनाथ मुंडे यांचे आहेत . त्यामुळे त्यादिवशी धनंजय मुंडे अचानक परळीतील एका व्यापाऱ्याच्या दुकानात समोर आल्यावर मीच त्यांना आधी शुभेच्छा दिल्या ," असे राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले . 

पंकजा मुंडे म्हणाल्या ," मी परळीत दिवाळीनिमित्त व्यापाऱ्यांच्या आणि नागरिकांच्या भेटीगाठी घेत होते . एका दुकानात अचानक धनंजय मुंडे समोर आले . माझ्या वडिलांच्या शिकवणीनुसार मी पुढे होऊन त्यांच्याशी हात मिळवला आणि दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या . त्यांच्याजागी अन्य कोणी राजकीय विरोधक माझ्यासमोर आले असते तरी त्यांनाही मी शुभेच्छा दिल्या असत्या . " 

राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे पती डॉ. अमित पालवे यांच्यासह परळीत दिवाळी साजरी करत आहेत. या दाम्पत्याने परळीतील यशश्री निवासस्थानी लक्ष्मीपूजनही केले. यानंतर डॉ. अमित पालवे यांनी पंकजा आणि त्यांच्या आई प्रज्ञाताई मुंडे यांच्यासोबत फोटोही काढले.

दरम्यान, दिवाळी लक्ष्मीपूजन आणि पाडव्याच्या दिवशी राजकीय नेते व्यापारी आणि सामान्यांना शुभेच्छा देण्याची पद्धत आहे. पंकजा मुंडे यांच्यासोबत पती डॉ. अमित पालवे देखील त्यांच्या सोबतीने भेटीगाठी दिसत आहेत. या निमित्ताने या दाम्पत्याचाने संपर्क अधिकच घट्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. 

दिवाळी पाडव्या निमित्त गुरुवारी पंकजा मुंडे व डाॅ. अमित पालवे यांनी वैद्यनाथ मंदिरात जावून प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेऊन पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य आनंद भाटे यांच्या भक्तीगीत व अभंगवाणीच्या कार्यक्रमाचाही आस्वाद घेतला.  

तत्पूर्वी योगेश्वरी शुगरच्या गळीत हंगामाची सुरुवातही पंकजा मुंडे व अमित पालवे यांच्या हस्ते पूजा करून आणि गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून झाली. दरम्यान, नेहमी सर्वपरिचित असले तरी पंकजा मुंडे यांचे पती डॉ. अमित पालवे अनेकदा  व्यासपीठावर हजर असतात.

मात्र, यावेळी त्यापुढे जात त्यांनीही दिवाळीच्या कार्यक्रमांसह  परळीभर पंकजाताईं समवेत व्यापारी प्रतिष्ठानांना आणि घरोघरी जाऊन परळीकरांना शुभेच्छा दिल्या .  यावेळी पंकजा ताईं बरोबर  भाऊजीना पाहून चाहत्यांचा आणि हितचिंतकांचा उत्साह अधिक वाढला.
 

संबंधित लेख