Muttemwar - Raut political war enters Nagpur Municipal corporation | Sarkarnama

मुत्तेमवार -राऊत गटातील  संघर्षाचा नागपूर महापालिकेत भडका 

सुरेश भुसारे
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

महापालिकेतील कॉंग्रेसच्या 29 सदस्यांमध्ये दोन गट आहेत. एका गटाचे नेतृत्व माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार करतात तर दुसऱ्याचे गटाचे नेतृत्व माजी मंत्री नितीन राऊत करतात. 

नागपुरातील काँग्रेस बंडखोर संदीप सहारे म्हणतात  विरोधी पक्षनेता भाजपचे पिल्लू'?  

नागपूर : नागपूर महापालिकेतील कॉंग्रेस पक्षात पुन्हा मतभेद उफाळून आलेले आहेत. विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्या विरोधात बंडाचे निशाण  आता फडकले आहे. तानाजी वनवे हे भाजपचे 'पिल्लू' असल्याचा आरोप कॉंग्रेसमधील बंडखोर गटाचे नेते संदीप सहारे यांनी केला आहे.

गेल्या तीन वर्षांपासून नागपूर महापालिकेतील कॉंग्रेस पक्षात मतभेद सुरू आहेत. महापालिकेतील कॉंग्रेसच्या 29 सदस्यांमध्ये दोन गट आहेत. एका गटाचे नेतृत्व माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार करतात तर दुसऱ्याचे गटाचे नेतृत्व माजी मंत्री नितीन राऊत करतात. 

प्रारंभी मुत्तेमवार गटाचे संजय महाकाळकर विरोधी पक्षनेते झाले होते. परंतु नितीन राऊत गटाने 16 सदस्यांसह विभागीय आयुक्तांकडे दावा केल्याने तानाजी वनवे यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली. आता या गटातच फूट पडली असून आतापर्यंत वनवे यांच्या मागे असलेले संदीप सहारे यांनी बंडाचा झेंडा फडकावून मुत्तेमवार गटात उडी घेतली आहे.

संदीप सहारे यांच्या नेतृत्वात 16 सदस्यांनी गट स्थापना केल्या दावा केला आहे. परंतु यासंदर्भात महापौर किंवा विभागीय आयुक्तांकडे दावा केलेला नाही. संदीप सहारे यांच्या नेतृत्वात बंडखोर नगरसेवक कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेणार आहेत. कॉंग्रेसमधील नगरसेवकांचे मत जाणून घेण्यासाठी पक्षातर्फे निरीक्षक पाठविण्यात येईल. या निरीक्षकांच्या अहवालानंतर विभागीय आयुक्तांकडे गटनेतेपदासाठी रितसर अर्ज केला जाईल, असे संदीप सहारे यांनी "सरकारनामा'शी बोलताना सांगितले.

 तानाजी वनवे यांनी गेल्या तीन वर्षात विरोधक म्हणून आवाज उठविला नसून भाजपचे 'पिल्लू' म्हणून ते काम करीत आहेत. कॉंग्रेसच्या पक्षाच्या कार्यक्रमांना हजेरी न लावणारे तानाजी वनवे भाजप पुरस्कृत कार्यक्रमांना मात्र आवर्जुन हजेरी लावतात, असा आरोप सहारे यांनी केला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख