दादा, मी त्यांच्यापैकी नाही; 'पवार एके पवार'!

दादा, मी त्यांच्यापैकी नाही; 'पवार एके पवार'!

कागल (कोल्हापूर) : दोन्ही कॉंग्रेसचे नेते, अनेक आमदार राजिनामा देऊन भाजपात येतील असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणतात. मी भाजपमध्ये यावे आणि अल्पसंख्यांकांचे प्रतिनिधित्व करावे असे आवाहन त्यांनी मलाही केले आहे, पण मी पक्ष बदलणाऱ्यांपैकी नाही. 'पवार एके पवार' हेच माझे तत्व आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. 

आपला देश आणि आपण सर्व सध्या मोठ्या संकटातून जात आहोत. नोटा बंदी आणि जीएसटीच्या धोरणामुळे एमआयडीसीतील अनेक कारखाने बंद पडत आहेत. कामगार मोठ्या प्रमाणात बेकार होत आहेत. उच्चशिक्षितांची आधीच बेकारी मोठ्या संख्येत आहे. प्रचंड बेकारी व दरवाढ यामुळे जनतेत असंतोष आहे. ही जनता आता विधानसभेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेचे कंबरडे मोडल्याशिवाय राहणार नाही. असेही ते म्हणाले. 

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने पेट्रोल, डिझेल, गॅस, रॉकेल आदी जिवनावश्‍यक वस्तूंच्या दरवाढी विरोधात शाहू सभागृहापासून बसस्थानकापर्यंत मोर्चा काढण्यात आला. बसस्थानकाजवळील भुयेकर पेट्रोल पंपावर वाहनचालकांना गांधीगिरीने गुलाबपुष्प देत दरवाढीची जाणिव करुन दिली. या मोर्चाला संबोधताना आमदार हसन मुश्रीफ बोलत होते. 

आमदार मुश्रीफ म्हणाले, ज्या नवमतदारांनी मोदींना तारले तेच आता त्यांना मारतील. त्यांची सत्तेची सूज, माजमस्ती उतरण्याची हीच वेळ आहे. सत्तेत असून शिवसेना भाजपाशी भांडली आणि लोकसभा निवडणुकीत गोगलगायीप्रमाणे हळूच एकत्र आली. तुळशीचे पान, परमेश्वर, गरीब, कष्टकरी आपल्याच बाजूला आहेत म्हणून विजय आपलाच आहे. 

ते म्हणाले, गुढग्याला बाशिंग बांधून असणारे स्टेजवरच उपस्थित असताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माझ्या कार्याचे जाहीर कौतुक केले. याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. विरोधक असूनही ते कौतुक करतात. हे माझ्या कार्यकर्त्यांचेच कौतुक आहे असे ते म्हणाले.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com