mushriff on chandrakantdada patil | Sarkarnama

चंद्रकांतदादा राजकीय नव्हे अध्यात्मिक नेते : हसन मुश्रीफ 

अजित माद्याळे 
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

पुरोगामी भाजपबरोबर कसे? 
श्री. मुश्रीफ भाषण संपवून खुर्चीत बसलेले असतानाही ऍड. कुराडे यांच्या एका वक्तव्याचे समर्थन करण्यासाठी त्यांनी पुन्हा माईक हातात घेतला. गडहिंग्लज पालिकेतील जनता दल, भाजप व शिवसेना युतीबाबत त्यांनी जाता-जाता भाष्य केले. भाजप व शिवसेनेचे सोडा, परंतु राष्ट्र सेवा दलात वाढलेले आणि पुरोगामी असलेल्या जनता दलला भाजपबरोबरची युती कशी चालली, या मुश्रीफांनी केलेल्या प्रश्‍नाने एकच हशा पिकला. यावेळी व्यासपीठावर जनता दलाच्या नेत्या व नगराध्यक्षा स्वाती कोरी सुद्धा उपस्थित होत्या. 

गडहिंग्लज (कोल्हापूर) : पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे मुळात राजकीय नेते नव्हेत. त्यांचे भाषण ऐकायला लागले तर ते अध्यात्मिक नेते वाटतात, असा टोला आमदार हसन मुश्रीफ यांनी आज येथे लगावला. 

येथील एस. एन. कॉलेजच्या नूतन इमारत उद्‌घाटन कार्यक्रमानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. दरम्यान याच कार्यक्रमात प्रदेश कॉंग्रेसचे सचिव ऍड. सुरेश कुराडे यांनी मुश्रीफांचा चिमटा काढला. आमदार सतेज पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी आपसातील वाद संपवण्याचे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केल्याची बातमी आज वृत्तपत्रात वाचून माझी करमणूक झाल्याचे श्री. कुराडे यांनी सांगितले. जिल्ह्याच्या राजकारणात काय चालले आहे, हेच कळत नसल्याचे सांगून ते म्हणाले, ""मुश्रीफसाहेब व चंद्रकांतदादांच्या वादाची बातमी नाही असा एकही दिवस जात नाही. तरीसुद्धा या दोघांनी बिद्री कारखाना निवडणुकीत गळ्यात गळे घातले. गडहिंग्लज पालिकेत जनता दल, शिवसेना, भाजपा युती होते. हे सारे अनाकलनीय असून राजकारणात विरोधक असायलाच हवा यावर माझे ठाम मत आहे.'' 

श्री. कुराडे यांच्या या वक्तव्याला उत्तर देताना मुश्रीफ म्हणाले, ""आजचे हे राजकीय व्यासपीठ नव्हे. तरीसुद्धा कुराडे यांनी माझी कळ काढली. मुळात चंद्रकांतदादा हे राजकीय नेते वाटत नाहीत. अध्यात्मिक वाटावे असे त्यांचे भाषण असते. बिद्री कारखाना राजकारणाचा अड्डा होवू नये आणि सहकारातील ही संस्था चांगली चालावी या उद्देशाने मी व चंद्रकांतदादा एकत्र आलो. असे असले तरी राष्ट्रवादी व भाजपचे राजकीय मतभेद यापुढेही सुरूच राहतील. बिद्रीत एकत्र आलो म्हणून विधानसभा निवडणुकीत चंद्रकांतदादा माझ्याविरोधात कागलमध्ये उमेदवारी देणार नाहीत, असे म्हणणे चुकीचे ठरेल. यामुळे राजकीय मतभेद वेगळे, व मित्रत्व वेगळे असते हे मान्य करायला हवे.'' 

 

संबंधित लेख