mungekar snubs ramdas athawale | Sarkarnama

मंत्री म्हणून नाही तर आठवलेंचा `शीघ्र कवी` म्हणून ठसा : मुणगेकर

ज्ञानेश सावंत
सोमवार, 15 एप्रिल 2019

पुणे : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे संपूर्ण आंबेडकरी चळवळीचे नव्हे तर रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाचे नेतृत्व करीत आहेत. स्वत:सह काही लोकांच्या राजकीय सोयीसाठी आठवले हे भाजपसोबत गेले आहेत. या सरकारच्या माध्यमातून आठवले यांनी राज्यसभेत केवळ "शीघ्र कवी' म्हणूनच ठसा उमटविला आहे, असा टोला माजी खासदार आणि नियोजन मंडळाचे माजी सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी लगावला.

पुणे : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे संपूर्ण आंबेडकरी चळवळीचे नव्हे तर रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाचे नेतृत्व करीत आहेत. स्वत:सह काही लोकांच्या राजकीय सोयीसाठी आठवले हे भाजपसोबत गेले आहेत. या सरकारच्या माध्यमातून आठवले यांनी राज्यसभेत केवळ "शीघ्र कवी' म्हणूनच ठसा उमटविला आहे, असा टोला माजी खासदार आणि नियोजन मंडळाचे माजी सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी लगावला.

आठवले यांनी कधीच लोकांचे प्रश्‍न त्यांनी मांडले नाहीत, तरीही आता त्यांना पुन्हा कॅबिनेट मंत्री व्हायची आशा आहे. त्या हेतूने ते भूमिका मांडत असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर डॉ. मुणगेकर यांनी "सकाळ' कार्यालयाला भेट दिली. तेव्हा "सरकारनामा फेसबुक लाईव्ह'च्या माध्यमातून चर्चा केली.  आमदार शरद रणपिसे या वेळी उपस्थित होते.

भाजप सरकारची धोरणे कशी फसली हे पटवून देताना कॉंग्रेसचा जाहीरनामा कसा वास्तववादी आहे हे त्यांनी स्पष्ट केले. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यातील राजकीय बदलांसह माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी आखलेली आर्थिक धोरणांचा उलगडा त्यांनी केला.
 
आठवले यांनी रिपब्लिकन ऐक्‍याची हाक दिली आहे, याबाबत बोलताना डॉ. मुणगेकर म्हणाले, ""आठवले हे राजकीय सोय पाहतात. त्यांना केवळ खासदारकी हवी असते. त्यामुळे ऐक्‍याशी फार काही घेणे नाही. तसेच प्रकाश आंबेडकर हे आठवलेंच्या कोणत्याही आवाहनाला प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे आठवले यांच्या ऐक्याची हाक निरर्थक ठरते.'' 

"भाजपविरोधी महाआघाडीत येण्याबाबत प्रकाश आंबेडकर यांच्याशी कॉंग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांनी चर्चा केली होती. त्यांच्यात अनेक बैठका झाल्या आहेत. परंतु, त्यांच्या एकमत होऊ शकलेले नाही. त्यांनी स्वतंत्र उमेदवार उभे करण्याची भूमिका ही भाजपच्या फायद्याची असल्याची टीका त्यांनी केली. 

"राष्ट्रद्रोहाचा कायदा हा ब्रिटिशकालीन कायदा आहे. त्याच कायद्याने लोकमान्य टिळक यांना तुरुंगात टाकण्यात आले होते,' असे सांगून " खरे तर हा कायदा यापूर्वीच कॉंग्रेसने रद्द करावयास पाहिजे होता,' अशा शब्दांत त्यांनी आपली यावरील भूमिका स्पष्ट केली. 

भाजप ही निवडणूक राष्ट्रवादावर नेऊ पाहत आहे, त्यासाठी लष्कराच्या शौर्याचा प्रचारासाठी वापर करीत आहे, असे सांगून डॉ. मुणगेकर म्हणाले, " ही निवडणूक भाजप विरुद्ध कॉंग्रेस अशी नाही, तर भाजप विरुद्ध देश अशी आहे. या देशात संसदीय लोकशाही, सामाजिक न्याय, बंधुत्व टिकावयाचे असेल, तर भाजपचा पराभव जनतेला करावा लागणार आहे.'' 
 

संबंधित लेख