munde and nitin gadkari | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...
हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

साडेचार हजार कोटींच्या विकास कामांचे लोकार्पण, नऊ वर्षानंतर गडकरी मुंडेंच्या जिल्ह्यात

दत्ता देशमुख
सोमवार, 16 एप्रिल 2018

आताही केंद्रात चार वर्षांपासून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाज बांधणी आणि गंगा व जलसंधारण अशा खात्यांची धुरा सांभाळताना रस्ते बांधणीच्या वेगाचा नवा आयाम तयार केला आहे.

बीड : कधी काळी दुसऱ्या फळीत काम करणाऱ्या नितीन गडकरी यांना संघाचे पाठबळ मिळाल्याने त्यांचा राजकीय प्रवास वेगाने झाला. दूरदृष्टी आणि संयम या दोन्ही गोष्टींचा अंतर्भाव असलेल्या या नेत्याने पायाभूत कामच्या उभारणीचे नवे मापदंड उभा करुन देशात विकासाचे जाळे उभा केले आहे. यापूर्वी 2009 मध्ये दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीवेळी बीड जिल्ह्यात आलेले नितीन गडकरी आता नऊ वर्षांनी येत असले तरी विकासाची गंगाच घेऊन येत आहेत. तब्बल चार हजार 587 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपुजन आणि लोकार्पण केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होत आहे. 
राज्याच्या ग्रामविकास व महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे नियोजन करत असलेल्या या कार्यक्रमाला गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित राहणार आहेत. 

विधानसभा निवडणुकीत 1985 मध्ये पराभूत झालेल्या दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांच्या गळ्यात दुसऱ्याच वर्षी भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडली. यावेळी नितीन गडकरी भाजप युवा मोर्चाचे नागपूर जिल्हाध्यक्ष होते. पुढे सलग पाच वेळा आमदार, राज्याचे उपमुख्यमंत्री, पुन्हा एकदा भाजपचे प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय उपाध्यक्ष, केंद्रीय सरचिटणीस, दोन वेळा खासदार आणि केंद्रात ग्रामविकास मंत्री असा दिवंगत मुंडेंचा राजकीय प्रवास राहिला. 

दरम्यान, सुरुवातीच्या काळापासून नितीन गडकरी हे दुसऱ्या फळीतले नेते म्हणून ओळखले जात. मात्र, प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर पक्षातील एका गटाने मुंडेंना शह देण्यासाठी नितीन गडकरी यांना पाठबळ दिले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय नागपूरला असल्याने त्या बळावर नितीन गडकरी यांचा प्रवासही निर्वेध झाला. त्यांनीही पदवीधर मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करताना विधान परिषदेचे गटनेते, राज्यात कॅबीनेट मंत्री, प्रदेशाध्यक्ष ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असा चढत्या क्रमाचा प्रवास केला आहे. युतीच्या काळात राज्यात सार्वजनिक बांधकाम आणि सार्वजनिक उपक्रम अशी खाते सांभाळणाऱ्या नितीन गडकरी यांनी मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गाची उभारणी करुन पायाभूत सुविधांचा नवा आयाम राज्याला दाखवून दिला. 

आताही केंद्रात चार वर्षांपासून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाज बांधणी आणि गंगा व जलसंधारण अशा खात्यांची धुरा सांभाळताना रस्ते बांधणीच्या वेगाचा नवा आयाम तयार केला आहे.

नेत्याने जिल्ह्याच्या विकासालाही सढळ हाताने निधीची बरसात केली आहे. मुंडेंच्या निधनाची माहिती सर्वप्रथम त्यांनीच सांगीतल्याने त्यांच्याबद्दल समर्थकांच्या मनात काही काळ प्रचंड रागही होता. तर, मुंडे - गडकरी गट अशी चर्चाही अधून मधून होई. पण, पायाभूत विकास आणि दळवळणाच्या दृष्टीने या नेत्याने बीड जिल्ह्याच्या झोळीत भरभरुन दान टाकले आहे. अर्थात या कामासाठी मंत्री पंकजा मुंडे यांचा पाठपुरावाही दुर्लक्षून चालणार नाही. 

जिल्हयातील विविध भागातून जाणाऱ्या 729 किलोमीटर रस्त्यांच्या बांधकामासाठी त्यांच्या खात्याकडून तब्बल सहा हजार 42 कोटी रुपयांचा निधी मिळाला असून यापैकी चार हजार 587 कोटी 54 लाख रुपयांच्या राष्ट्रीय महामार्ग व रस्ते महामार्ग रुंदीकरण प्रकल्पाचा लोकार्पण व कोनशिला अनावरण समारंभ होणार आहे. याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित असतील. 

नऊ वर्षानंतर लांबलेला योग पुन्हा जुळतोय 
दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांनी 2009 मध्ये पहिल्यांदा बीड लोकसभेची निवडणुक लढविली आणि विक्रमी मतांनी जिंकली. त्यावेळी श्री. गडकरी जिल्ह्यात आले होते. त्यानंतर तब्बल नऊ वर्षाच्या खंडानंतर दोन महिन्यांपूर्वी त्यांचा दौरा निश्‍चित झाला होता. मात्र, राज्यात झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीमुळे हा दौरा पुढे ढकलला होता. आता हा योग पुन्हा गुरुवारी जुळून येत आहे. 

संबंधित लेख