मुंडे भावंडे स्वतंत्रपणेच टॉपमध्ये; मग चंद्रकांतदादांना पुजेची वेळ येईल कशी ?

मुंडेंच्या दुर्दैवी निधनानंतर पंकजा मुंडे व धनंजय मुंडे ही दोघे भावंडे एकत्र येण्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र, त्यावेळीही ती केवळ चर्चाच होती हे स्पष्ट झाले. आता, विधानसभेत "मुंडे भावंडे एकत्र आली तर मोठी पुजा घालू ' असे वक्तव्य भाजपचे जेष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर याची पुसटशी चर्चा सुरु झाली. पण, दोघांचे राजकारणातील आणि त्यांच्या पक्षातील स्थान पाहता एकत्र येणे अगदीच अवघड असल्याचेच दिसते. दोघांनी एकत्र यावे असे दोघांच्याही सामान्य समर्थकांना मनातून वाटत असले तरी त्यांनी एकत्र येणे हे त्यांच्या जिवावर राजकारण करणाऱ्यांना परवडणारे नाही.
मुंडे भावंडे स्वतंत्रपणेच टॉपमध्ये; मग चंद्रकांतदादांना पुजेची वेळ येईल कशी ?

बीड : राज्याच्या ग्रामविकास व महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आज दोघेही अनुक्रमे भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये राज्यपातळीवर टॉपच्या नेत्यांमध्ये गणले जातात. जिल्ह्यातही भाजपची सूत्रे एकहाती पंकजा मुंडेंच्या हाती तर राष्ट्रवादी पक्षावरही धनंजय मुंडे यांनी बऱ्यापैकी जम बसवला आहे. त्यामुळे त्यांच्या एकत्र येण्याने त्यांची ज्येष्ठता, दोघे एक आल्यामुळे त्यांच्या समर्थकांचे राजकीय भविष्य आणि विशेष म्हणजे दोघांची मानसिकता अशा विविध गोष्टी त्यांच्या एकत्र येण्यात अडथळ्याच्या आहेत. त्यांच्या एकत्र येण्याची कुठलीही शक्‍यता नसल्याने सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना मोठी पुजा घालण्याचा योग येणे अवघडच असल्याचे वास्तव आहे. 
गोपीनाथ मुंडे यांनी 80 च्या दशकात जिल्ह्याच्या राजकीय फडात उडी घेतली. जिल्हा परिषद सदस्य ते राज्याचे उपमुख्यमंत्री आणि केंद्रात व पक्षात राष्ट्रीय सरचिटणीस आणि शेवटी केंद्रीय ग्रामविकास मंत्री अशा विविध पदांवर मजल मारली. 1995 ते 2014 या काळापर्यंत राज्यातील भाजपवर त्यांनी एकहाती वर्चस्व ठेवले. जिल्ह्यातील नगर पालिका, पंचायत समित्या, जिल्हा परिषद व जिल्हा मध्यवर्ती बॅंक अशा विविध संस्थांवरही दिवंगत मुंडेंनी वर्चस्व राखले. 

या काळात त्यांचे दिवंगत जेष्ठ बंधू पंडित अण्णा मुंडे यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदासह इतर सहकारी संस्था आणि पक्षसंघटनेतही विविध पदांवर कामांची संधी मिळाली. मुंडेंचे स्थानिक पातळीवरील राजकारण सांभाळण्यात दिवंगत पंडितअण्णांचा मोलाचा वाटा राहीलेला आहे. धनंजय मुंडेंनाही पक्षाच्या युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि विधान परिषदेवर संधी मिळाली. याच काळात दिवंगत मुंडेंनी प्रथम केंद्रीय राजकारणात पाय ठेवल्यानंतर त्यांची परळी विधानसभेची जागा त्यांच्या जेष्ठ कन्या पंकजा मुंडेंना देण्यात आली. तेव्हापासूनच या भावंडांमध्ये अंतर पडायला सुरुवात झाली. 2012 मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळी धनंजय मुंडेंनी काकांपासून दुर होत राष्ट्रवादीचत प्रवेश केला. 

मुंडेंच्या दुर्दैवी निधनानंतर पंकजा मुंडे व धनंजय मुंडे ही दोघे भावंडे एकत्र येण्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र, त्यावेळीही ती केवळ चर्चाच होती हे स्पष्ट झाले. आता, विधानसभेत "मुंडे भावंडे एकत्र आली तर मोठी पुजा घालू ' असे वक्तव्य भाजपचे जेष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर याची पुसटशी चर्चा सुरु झाली. पण, दोघांचे राजकारणातील आणि त्यांच्या पक्षातील स्थान पाहता एकत्र येणे अगदीच अवघड असल्याचेच दिसते. दोघांनी एकत्र यावे असे दोघांच्याही सामान्य समर्थकांना मनातून वाटत असले तरी त्यांनी एकत्र येणे हे त्यांच्या जिवावर राजकारण करणाऱ्यांना परवडणारे नाही. 

पंकजा मुंडेंचा विचार केला तर वडिलांकडून राजकीय बाळकडू घेतलेल्या पंकजाताईंनी त्यांच्या पश्‍चात राज्यभर संघर्षयात्रा काढून वाटचालीची दिशा स्पष्ट केली आहे. राज्यमंत्रीमंडळात टॉपच्या मंत्र्यांमध्ये त्यांचे स्थान आहे. पक्षातही त्यांच्या शब्दाला मान आहे. राज्यभरातही आता त्यांनी स्वकर्तृत्व, धाडसी निर्णय आणि स्पष्टवक्तेपणातून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. 

जिल्हा भाजपवर त्यांची एकहाती सत्ता असून चार आमदार निवडुन आणण्यात त्यांनी यश मिळविले. तसेच भगीनी डॉ. प्रितम मुंडे यांना विक्रमी मतांनी खासदार म्हणून निवडुन आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. जिल्हा मध्यवर्ती बॅंक, जिल्हा परिषद, वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना अशा स्थानिक स्वराज्य आणि सहकारी संस्थांवर त्यांचे वर्चस्व आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादीतील नाराज गटासोबत त्यांचे राजकीय सौदहार्याचे संबंध आहेत. 

धनंजय मुंडेंचीही राजकीय कारकिर्द दिवंगत मुंडेंच्या काळात सुरु झाली असली तरी पुढे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये स्वत:च्या हिंमतीवर त्यांनी आपले स्थान निर्माण केले आहे. विधान परिषदेत आणि राज्यभरातील सभांमधून आपल्या वक्तृत्वाने विरोधकांना घायाळ करुन आपले स्वतंत्र राजकीय वलय निर्माण करण्यात त्यांनी यश मिळविले आहे. 
पक्षाच्या टॉप नेत्यांच्या यादीत त्यांचे नाव आहे. जिल्ह्याच्या पक्षसंघटनेवरही आता त्यांचाच दबदबा आहे. परळी नगर पालिका, बाजार समितीसह इतर स्थानिक स्वराज्य व सहकारी संस्थांच्या निवडणुका त्यांनी जिंकल्या आहेत. 

... एकत्र येणे अवघड आणि न परवडणारे 
चंद्रकांत दादांना आणि सामान्य समर्थकांना मुंडे भावंडांनी एकत्र यावे असे वाटत असले तरी राजकीय व्यवहारिकेतून विचार केला तर हे अवघड आहे. दोघे एकत्र आले तर त्यांच्यात ज्येष्ठत्वाचा प्रश्न निर्माण होईल. तसेच, त्यांच्या जिवावर त्या - त्या पक्षातील समर्थक नेत्यांच्या राजकीय भविष्याचाही प्रश्न निर्माण होईल. आज दोघे वेगवेगळ्या पक्षात असल्याने त्या - त्या पक्षातील पदांसह संस्थांमधील पदे आपल्या समर्थकांना मिळवून देण्यात दोघांना यश आले आहे. एकत्र आल्यानंतर याला निश्‍चितच मर्यादा पडतील. 

कटुता कमी होणे गरजेचे 
दोघांचे राजकीय पक्ष आणि विचारधारा वेगळी असली तरी दोघांमधील नाते पाहता त्यांच्यातील कटुता कमी होण्याची गरज आहे. किमान त्यांच्यातील कटुता कमी झाली तरी त्यांच्या एका समर्थक गटाला मोठे हायसे वाटणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com