munde achhe hai | Sarkarnama

"मुंढे अच्छे है'! पीसीएमसीत अभिनंदनाचा ठराव! 

उत्तम कुटे 
बुधवार, 12 जुलै 2017

पिंपरी-चिंचवड महापालिकेत बुधवारी(ता.12) आक्रितच घडले. गेले दीड महिना पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांना धारेवर धरलेल्या पालिकेच्या खजिन्याची चावी असलेल्या स्थायी समितीने चक्क त्यांच्या अभिनंदनाचा ठरावच पास केला. 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत बुधवारी(ता.12) आक्रितच घडले. गेले दीड महिना पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांना धारेवर धरलेल्या पालिकेच्या खजिन्याची चावी असलेल्या स्थायी समितीने चक्क त्यांच्या अभिनंदनाचा ठरावच पास केला. 

जोपर्यंत मुंढे पालिकेत येत नाहीत, तोपर्यंत संचलन तुटीपोटी पीएमपीएमएलला देय असलेले पावणेसहा कोटी रुपये देणार नाही, अशी भूमिका घेणाऱ्या स्थायी समितीने पैसे मंजूर केलेच, त्याशिवाय मुंढे यांच्या अभिनंदनाचा ठराव त्यांना धारेवर धरणाऱ्या समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी स्वत: मांडला. त्यामुळे समितीचे इतर सदस्यांनाही त्याचा क्षणभर धक्का बसला. नंतर पालिका वर्तुळात तो 
चर्चेचा विषय बनला. गेले दीड महिना या दोन फायरब्रॅण्ड अधिकारी व पदाधिकाऱ्यांत सुरु असलेला संघर्ष थांबल्याने पीएमपीएमएल आणि पालिका अधिकाऱ्यांनीही सुटकेचा निश्वास टाकला. 

पुणे आणि पिंपरी पालिकेची संयुक्त परिवहन कंपनी असलेल्या पीएमपीएमएलमध्ये पिंपरी पालिकेचा चाळीस टक्के हिस्सा आहे. मात्र,त्यातुलनेत कंपनी सेवा देत नसून सापत्नभावाची वागणूक मिळत असल्याची पिंपरी-चिंचवडकरांची भावना आहे. ती भावना भाजप प्रथमच पालिकेत सत्तेत आल्यानंतर आणखी प्रबळ झाली. त्यातही पुण्याप्रमाणे लेडीज स्पेशल, एसी बस आणि अंतर्गत भागात सेवा देण्यासाठी स्थायीने पीएमपीएमएलला देय असलेला निधी गेले दीड महिना अडवून ठेवला होता. तसेच मुंढे यांनी शहराला भेट द्यावी, अशीही मागणी त्यांनी केली होती.एवढेच नाही, तर मुंढे यांच्या बदलीची प्रसंगी मागणी करू, असा इशारा महापौर नितीन काळजे यांनीही दिला होता. मात्र,गेल्या आठवड्यात महापौर, स्थायी समिती अध्यक्षा आणि भाजपचे शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप यांची पुणे येथील पीएमपीएमएलच्या मुख्यालयात मुंढे यांच्याशी "चाय पे चर्चा' झाली आणि त्यांच्यातील मतभेद संपले. 

चाय पे चर्चेनंतर एसी बसची मागणी मान्य होऊन ती मंगळवारी (ता.11) सुरुही झाली. तर, गुरुवारी (ता.13) लेडीज स्पेशलसह आणखी एक नवीन मार्ग सुरु होणार आहे. तर मिडी बस ताफ्यात आल्यानंतर अंतर्गत भागासाठी त्या दिल्या जाणार आहेत. मागण्या तत्वत मान्यच झाल्या नाहीत, तर त्यांची अंमलबजावणीही झाल्याने मुंढे यांचे अभिनंदन केले, असे सावळे म्हणाल्या. वाईटातून कधीकधी चांगले होते म्हणतात,त्याचा प्रत्यय या दोघांच्या भांडणातून आला आणि त्यात पिंपरी-चिंचवडकरांचे काहीअंशी भले झाले. कारण प्रथमच शहरात एसी बस आणि लेडीज स्पेशल त्यामुळे धावली आहे. 

संबंधित लेख