Mumbai University Results Row | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

विद्यापीठाच्या निकालावरून सरकार तोंडघशी! डेडलाईन संपली, अद्यापही 254 हून अधिक निकाल बाकी

सरकारनामा बुरो
शनिवार, 5 ऑगस्ट 2017

कुलगुरू हा राज्यपाल नियुक्त असल्याने सरकारला त्यांच्यावर थेट कारवाई करता येत नसल्याने सरकारची मोठी अडचण झाली आहे, त्यातच देशमुख यांनी सरकारला सर्व निकाल हे 5 ऑगस्टपर्यंत लागतील अशी माहिती देऊन सरकारलाच तोंडघशी पाडले असल्याने याविषयी सरकारची मोठी कोंडी झाली आहे.

मुंबई : मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी सरकारला मागील आठवड्यात दिलेल्या माहितीच्या भरवशावर सरकारने विधांमंडळात मुंबई विद्यापीठाचे सर्व निकाल हे 5 ऑगस्टपर्यंत लागतील असे स्पष्ट आश्वासन दिले. त्या आश्वासनाची आज डेडलाईन संपली असून अद्यापही विद्यापीठाचे 254 हुन अधिक निकाल बाकी राहिल्याने देशमुख यांच्या चुकीच्या माहितीमुळे सरकार आज तोंडघशी पडले आहे.

त्यामुळे मंगळवारी विधानमंडळात पुन्हा एकदा कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या निलंबनाचा विषय जोरात गाजण्याची शक्यता निर्माण झाली असून यासोबतच विधानमंडळात याच निकालाच्या डेडलाईनचा बाऊ करणारे उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे हेही विरोधकांच्या अजेंड्यावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मुंबई विद्यापीठाच्या रखडलेल्या निकालाच्या संदर्भात पावसाळी अधिवेशनात तीव्र पडसाद उमटले आहेत. विधानसभा आणि विधानपरिषदेतही कुलगुरू डॉ. संजय देशमुख आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे.

कुलगुरू हा राज्यपाल नियुक्त असल्याने सरकारला त्यांच्यावर थेट कारवाई करता येत नसल्याने सरकारची मोठी अडचण झाली आहे, त्यातच देशमुख यांनी सरकारला सर्व निकाल हे 5 ऑगस्टपर्यंत लागतील अशी माहिती देऊन सरकारलाच तोंडघशी पाडले असल्याने याविषयी सरकारची मोठी कोंडी झाली आहे.

त्यामुळे या विषयी आता मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस हे यावर काय निर्णय घेतील याकडे लक्ष लागले आहे.त्यातच सरकारकडून देशमुख यांच्याबद्दलची तीव्र नाराजी राज्यपालांना कळविण्यात आली असल्याने  येत्या काही दिवसात देशमुख याची कुलगुरू पदावरून उचलबांगडी केली जाण्याची शक्यता शिक्षण क्षेत्रात वर्तवली जात आहे.तर मागील काही दिवसात मुंबई विद्यापीठाच्या निकालावरून अनेक पक्ष संघटनांनी राज्यपालांकडे तक्रारी आणि त्यासाठीचे निवेदनही दिले असल्यानेच राज्यपाल कार्यालयातून विद्यापीठाच्या निकालावर रोज लक्ष ठेवून असल्याने डॉ. देशमुख यांच्यावर कारवाई अटळ असल्याचे बोलले जात आहे.

संबंधित लेख