mumbai-udayanraje-ST-employee-suspend | Sarkarnama

एसटी कर्मचारी निलंबनाच्या वादात उदयनराजेंची उडी 

ब्रह्मा चट्टे
शुक्रवार, 22 जून 2018

अघोषीत संपात भाग घेतला म्हणून एसटी महामंडळाने 1010 कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. यामुळे कामगार संघटना आणि व्यवस्थापन यांच्या संघर्षाची चिन्हे दिसत आहेत. त्यातच आता या वादात साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी उडी घेतली आहे.

मुंबई : अघोषीत संपात भाग घेतला म्हणून एसटी महामंडळाने 1010 कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. यामुळे कामगार संघटना आणि व्यवस्थापन यांच्या संघर्षाची चिन्हे दिसत आहेत. त्यातच आता या वादात साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी उडी घेतली आहे. या कामगारांवर एकतर्फी कार्यवाही केली असल्याचे सांगत निलंबन मागे घेण्याची शिफारस उदयनराजे यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे केली आहे.

परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी वर्धापन दिनाचा मुहूर्तसाधत एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ घोषीत केली होती. ज्या कर्मचाऱ्यांना ही वेतनवाढ मान्य नसेल त्यांनी महामंडळाकडे 9 जून 2018 पर्यंत लेखी स्वरूपात अर्ज भरावा लागणार होता व असा अर्ज स्वीकारताना चित्रिकरण होणार असल्याने एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांमध्ये खदखद होती. परिणामी कर्मचाऱ्यांच्या वतीने सोशल मीडियात संपाची हाक देत महामंडळाच्या विरोधात एल्गार पुकारला. परिणामी दोन दिवस कडकडीत बंद पाळत कामगारांनी प्रशासनाच्या नाकात दम आणला. त्यानंतर तडजोड होत संप माघारी घेण्यात आला. 

या संपात सहभाग घेणाऱ्या 1010 कंत्राटी कामगारांवर एसटीने निलंबनाची कारवाई केली. ती कार्यवाही नैसर्गिक न्यायाची नसल्याचे सांगत खासदास छत्रपती उदयनराजे भोसले यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना पत्र लिहले आहे. 

या पत्रात ते म्हणतात, "आपणास शिफारस करण्यात येते की, श्री अक्षय गौतम बनसोड व अन्य एसटी सेवक कर्मचारी सातारा विभाग यांनी दि. 8 जून व 9 जून रोजीच्या संपात कोणतीही चौकशी करता व नैसर्गिक न्यायाचे तत्व न अनुसरता कामावरून काढून टाकले आहे. कामावरून त्यांना काढून टाकण्यापूर्वी त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी द्यायला हवी होती. त्यादिवशी एसटीचे 100 टक्के बंद असल्याने त्यांना कामावर येता आले नाही.
कामगारांचे कोणतेही म्हणणे न ऐकता त्यांच्यावर एकतर्फी निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे. या प्रकरणात नैसर्गिक न्यायाचे उल्लंघन केले आहे. या सर्वांना पुन्हा कामावर घेण्यात यावे.''

राजकारणाच्या बित्तंबातम्यांसाठी डाऊनलोड करा sarkarnama अॅप 

संबंधित लेख