शिवसेनेच्या वाटेत मांजरासारखे आडवे याल तर याद राखा! - उद्धव ठाकरे

बुडाखाली असलेल्या खुर्च्या व धनदांडग्यांचा पैसा यामुळे आलेल्या उबेतून शिवसेनेची जिगर निर्माण झालेली नाही. तेव्हा आमच्या मित्रवर्यांनी बाटग्या भगतगणांपासून सावधान राहावे.- उद्धव ठाकरे
शिवसेनेच्या वाटेत मांजरासारखे आडवे याल तर याद राखा! - उद्धव ठाकरे

मुंबई - ''सारे जग जेव्हा मोदींच्या विरोधात कोलाहल करीत होते व मोदीविरोधाचे फूत्कार सोडीत होते तेव्हा हिमतीने आणि अभिमानाने 'मोदींचा जय असो',  असे बोलणारी शिवसेनाच होती! आजच्या मोदीभक्तांचीही तेव्हा दातखिळी बसली होती याचा विसर बाटग्या 'भक्तगणांनी' पडू देऊ नये. शिवसेनेच्या वाटेत मांजरासारखे आडवे याल तर याद राखा!'', असा सज्जड दमच उद्धव ठाकरे यांनी मोदीभक्तांचे नाव घेत भाजपला दिला आहे. सामनाच्या 'बाटग्यांच्या आरोळ्या' या अग्रलेखात उद्धव ठाकरे यांनी मित्रपक्ष भाजपला चांगल्या कानपिचक्या दिल्या आहेत.

उद्धव ठाकरे लिहतात, ''शिवसेनेशी दोन हात करण्याची भाषा लालभाईंनी केली त्यांचे सध्या अस्तित्व तरी दिसते काय? सत्तेच्या बळावर शिवसेनेशी संघर्ष करण्याचे मनोरथ काँग्रेस व राष्ट्रवादीनेही केलेच होते. त्यांचे नामोनिशाण तरी उरले आहे काय? देशाच्या मुळावर आलेल्या खलिस्तानी आणि पाकडय़ा अतिरेक्यांनीही शिवसेनेस संपविण्याच्या 'सुपाऱ्या' काय कमी वेळा कातरल्या? पण शिवसेना उसळी मारायची काही थांबली नाही. कारण आमची मनगटे व जिगर स्वतःची आहे. बुडाखाली असलेल्या खुर्च्या व धनदांडग्यांचा पैसा यामुळे आलेल्या उबेतून शिवसेनेची जिगर निर्माण झालेली नाही. तेव्हा आमच्या मित्रवर्यांनी बाटग्या भगतगणांपासून सावधान राहावे.''

महापालिकेत मोदी नावावरून झालेल्या गदारोळाचा दाखला देत उद्धव ठाकरे यांनी भाजपला चांगलेच झोडपले आहे. याबाबत ठाकरे लिहतात, ''मोदीनामाचा गर्व असावा, पण उन्माद असू नये हे आमचे मत नरेंद्रभाईंनाही पटेल. इंदिरानामाच्या आरोळ्या कधीकाळी अशाच ठोकल्या जात होत्या. 'इंदिरा इज इंडिया' अशा घोषणा देऊन इंदिराभक्तांनी तेव्हा भारतमातेचाच अपमान केला होता. इंदिरा गांधींचाही पराभव झाला व तो पराभव अतिरेकी इंदिराभक्तीच्या ओंगळवाण्या प्रदर्शनाने झाला हे आम्ही भाजपातील धुरिणांना सांगत आहोत. मुंबई महापालिकेतील जीएसटी धनादेश सोहळय़ात सन्माननीय मोदींच्या नावाने उन्माद करण्याची गरज होती काय, हा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी व भाजप अध्यक्षांनी स्वतःला चिमटा काढून विचारायला हवा.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com