मुंबईत शिवसेनेच्या चुकीच्या आत्मविश्‍वासाला टाचणी

सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या लढतीत शिवसेनेने दादर-माहीम हा आपला बालेकिल्ला मनसेकडून खेचून घेतला. शिवडीमध्येही शिवसेनेने आपले वर्चस्व कायम ठेवताना सातपैकी सहा जागा जिंकल्या. माजी महापौर श्रद्धा जाधव, महापौर स्नेहल आंबेकर यांनी विजय मिळवला; तर शिवसेनेचे नगरसेवक नाना आंबोले यांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला, त्यांची पत्नी तेजस्विनी यांना भाजपची उमेदवारी मिळूनही पराभव स्वीकारावा लागला.
  मुंबईत शिवसेनेच्या चुकीच्या आत्मविश्‍वासाला टाचणी

मुंबई ः मुंबई एकहाती जिंकणारच, या शिवसेनेच्या अतिआत्मविश्‍वासाला टाचणी लावत भाजपने शिवसेनेच्या बरोबरीने जागा मिळवल्या आणि मुंबईत आपलाही आवाज बुलंद आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध केले. भाजपच्या या मुसंडीमुळे 1997 नंतर प्रथमच शिवसेनेवर महापालिकेतील सत्ता गमावण्याची वेळ येऊ शकते. 
शिवसेना-भाजपच्या या तुल्यबळ लढतीत नशिबाचा फासाही भाजपच्या बाजूनेच पडला. भाजपचे नशीब एवढे जोरदार होते, की गेल्या काही दशकांत न दिसलेली समसमान मतसंख्याही आज पाहायला मिळाली. शिवसेनेचे सुरेंद्र बागलकर आणि भाजपचे अतुल शहा यांच्या या लढतीत अखेर लॉटरी काढून शहा यांना विजयी जाहीर करण्यात आले. 
या निकालाबाबाबत आश्‍चर्य व्यक्त होत असले, तरी मुंबईत विधानसभा निवडणुकीत दिसलेला कल मतदारांनी कायम ठेवला आहे. मतदारांनी दोनही पक्षांना समसमान जागा दिल्यामुळे हे दोन्ही पक्ष एकत्र आले, तर पालिकेतील त्यांची ताकद मोठी होईल; अन्यथा सत्तेसाठी घोडेबाजाराला ऊत येईल. या निवडणुकीत मराठी भाषक मतदार शिवसेनेमागे एकवटला; तर गुजराती, उत्तर भारतीय यांच्यासह अन्य भाषक मतदारांनी भाजपच्या पारड्यात भरभरून मते टाकली असे दिसते. भाजपला झोपडपट्टी विभागातील उत्तर भारतीय तसेच दक्षिण मुंबईच्या उच्चभ्रू वस्तीतील गुजराती भाषकांचाही पाठिंबा मिळाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे गेलेल्या जागा शिवसेनेने आपल्याकडे खेचून आपली संख्या वाढवली; तर कॉंग्रेस व अपक्षांच्या जागा कमी होऊन त्याचा फायदा भाजपला झाला. कॉंग्रेस आणि मनसे यांची पुन्हा एकदा धूळधाण झाली. 
दादर पुन्हा सेनेकडेच 
सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या लढतीत शिवसेनेने दादर-माहीम हा आपला बालेकिल्ला मनसेकडून खेचून घेतला. शिवडीमध्येही शिवसेनेने आपले वर्चस्व कायम ठेवताना सातपैकी सहा जागा जिंकल्या. माजी महापौर श्रद्धा जाधव, महापौर स्नेहल आंबेकर यांनी विजय मिळवला; तर शिवसेनेचे नगरसेवक नाना आंबोले यांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला, त्यांची पत्नी तेजस्विनी यांना भाजपची उमेदवारी मिळूनही पराभव स्वीकारावा लागला. 
दहिसरमध्येही शिवसेनेला चांगले यश मिळाले. विनोद घोसाळकर यांच्या स्नुषा तेजस्विनी विजयी झाल्या, पण गोरेगावचा गड राखणे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना शक्‍य झाले नाही. तेथे शिवसेनेचे राजन पाध्ये, प्रमिला शिंदे व लोचना चव्हाण हे तीन नगरसेवक पराभूत झाले. गोरेगाव पश्‍चिमेला भाजपने शिवसेनेला सर्वत्र मात दिली असताना पूर्वेकडे मात्र भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांचे भाऊ विनोद शेलार यांचा शिवसेनेच्या स्वप्नील टेंबवलकर यांनी पराभव केला. किरीट सोमय्या यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या मुलुंडमधील लढतीत भाजपने सहा जागा जिंकून शिवसेनेला धोबीपछाड दिली. त्यांचे पुत्र नील सोमय्या आणि शिवसेनेतून पक्षांतर केलेले प्रभाकर शिंदे विजयी झाले. 
मालाडमध्ये कॉंग्रेस आमदार अस्लम शेख यांनी चार नगरसेवक निवडून आणून आपला बालेकिल्ला शाबूत ठेवला. धारावीत शिवसेनेचे स्थापत्य समिती अध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी यांना अनपेक्षित पराभव स्वीकारावा लागला; तर महापौरपदाचे दावेदार मानले गेलेले यशोधर फणसे अंधेरीतून अनपेक्षितरीत्या पराभूत झाले. कॉंग्रेसमधून शिवसेनेत गेलेले माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनाही आंबोलीतून पराभव स्वीकारावा लागला. शिवसेनेचे मिलिंद वैद्य, विशाखा राऊत हे ज्येष्ठ नेते विजयी झाले. 
नशीबवान अतुल शहा 
अनेक जागांचा निकाल निसटत्या फरकाने लागला, पण यात भाजपचे अतुल शहा सर्वांत नशीबवान ठरले. मतमोजणीच्या सर्व फेऱ्या संपल्यावर फेरमोजणीची मागणी झाल्याने त्यात शिवसेनेचे सुरेंद्र बागलकर आणि शहा या दोघांनाही पाच हजार 946 अशी समसमान मते मिळाल्याचे जाहीर करण्यात आले. दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते, महापालिका आयुक्त आदी तेथे दाखल झाले आणि बरीच चर्चा झाल्यावर संध्याकाळी नियम तपासून सोडत काढण्यात आली; त्यात शहा विजयी ठरले. 
शेवाळेंना संमिश्र यश 
शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी पत्नी कामिनी व वहिनी वैशाली यांच्यासाठी उमेदवारी घेतली होती. त्यांची पत्नी पराभूत झाली, पण वहिनींना विजयश्री मिळाली. 
तेल गेले, तूप गेले 
दादरमधून मनसेचे नगरसेवक संदीप देशपांडे यांच्या पत्नी स्वप्ना देशपांडे यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन निवडणूक लढवली होती; मात्र त्या पराभूत झाल्या. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com