Mumbai Ramdas Athavale About Sagit Som Taj mahal | Sarkarnama

सोम यांचे ताजमहालबाबतचे वक्तव्य तेढ निर्माण करणारे : रामदास आठवले

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

ताज महाल बद्दल भाजप आमदार संगीत सोम यांनी केलेले वक्तव्य हिंदू मुस्लिमांमध्ये वाद निर्माण करणारे असून  ताज महाल हे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक ठरले आहे, हे सोम यांनी लक्षात घ्यावे- रामदास आठवले

मुंबई : ''जगातील सात आश्चर्यांपैकीं एक असलेले ताज महाल हे भारताच्या पर्यटन क्षेत्राची शान आहे. केवळ ऐतिहासिक पार्टनस्थळ नसून ताजमहाल हे जगात प्रेमाचे प्रतीक ठरले आहे. येथे दररोज देशविदेशातून हजारो पर्यटक भेट देतात. देशभरातील  हिंदू मुस्लिम पर्यटक एकत्र ताज महालला भेट देत असतात. त्यामुळे ताज महाल बद्दल भाजप आमदार संगीत सोम यांनी केलेले वक्तव्य हिंदू मुस्लिमांमध्ये वाद निर्माण करणारे असून  ताज महाल हे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक ठरले आहे, हे सोम यांनी लक्षात घ्यावे,'' असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री  रामदास आठवले यांनी केले आहे.

भाजप आमदार संगीत सोम यांनी ताज महाल बद्दल मांडलेल्या मताचे खंडन करून त्यांची भूमिका चुकीची असल्याचे सांगत आठवले यांनी आपला विरोध नोंदविला आहे. शहाजहान यांनी आग्रा येथे उभारलेला ताज महाल हा त्यांचा पत्नीच्या स्मरणार्थ उभारला आहे. त्यासाठी देशातील कामगारांनी कष्ट केले आहेत. जगभरात या वास्तुकलेचा हा उत्कृष्ट नमुना आहे. ताज महालचा जगभरात होणारा गौरव हा ते साकारणाऱ्या  भारतीय कलाकारांचा आणि कामगारांच्या कष्टाचा गौरव आहे. त्यामुळे ताज महाल गुलामगिरीचे प्रतीक असा अवमानकारक उल्लेख करणाऱ्या भाजप आमदार संगीत सोम यांचा भूमिकेचा आपण विरोध करीत असल्याचे ना रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.

''लोकप्रतिनिधींनी संविधानाच्या चौकटीत राहून भूमिका मांडली पाहिजे. आमदार सोम यांची भूमिका दोन समाजात तेढ निर्माण करणारी असल्याने त्यांच्या भूमिकेचा विरोध केलाच पाहिजे,'' असे आठवले म्हणाले.

 

संबंधित लेख