mumbai politics | Sarkarnama

नारायण राणे यांची कॉंग्रेसकडून मनधरणी

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 2 मे 2017

कॉंग्रेसला सोडचिठ्‌ठी देत नारायण राणे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलेले असताना कॉंग्रेसने मात्र राणे यांची मनधरणी सुरू केल्याचे चित्र आहे. माजी केंद्रीय मंत्री व सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय मनीष तिवारी यांनी राणे यांची भेट घेऊन चर्चा केल्याची माहिती आहे. 

मुंबई : कॉंग्रेसला सोडचिठ्‌ठी देत नारायण राणे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलेले असताना कॉंग्रेसने मात्र राणे यांची मनधरणी सुरू केल्याचे चित्र आहे. माजी केंद्रीय मंत्री व सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय मनीष तिवारी यांनी राणे यांची भेट घेऊन चर्चा केल्याची माहिती आहे. 

सोनिया गांधी यांच्याशी भेट घेऊनच तिवारी मुंबईत दाखल झाले होते. त्यानंतर त्यांनी राणे यांची भेट घेतली. त्यामुळे पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांचा निरोप घेऊन तिवारी यांनी राणे यांच्याशी चर्चा केल्याचा दावा करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राणे यांनी गुजरातमध्ये जाऊन भाजप अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यानंतर राणे भाजपमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. मात्र, भाजपमधील अनेक नेत्यांचा राणे यांना विरोध असल्याचे सांगितले जात होते. त्यातच राष्ट्रपती निवडणुकीत भाजपचा मित्रपक्ष शिवसेनेची मदत हवी असल्याने राणे यांच्या भाजप प्रवेशाबाबत तर्कवितर्क सुरू झाले होते. 

दरम्यान, अगोदर मिलिंद देवरा यांनी राणे यांची भेट घेतल्यानंतर आता मनीष तिवारी यांनीही भेट घेतल्याने राणेंनी पक्ष सोडू नये यासाठी कॉंग्रेसने प्रयत्न सुरू केल्याचे सांगितले जात आहे. या दोघांच्या भेटीतल्या चर्चेचा तपशील कळालेला नसला तरी राणेंचा भाजप प्रवेश झाला नसल्याने ते आता कॉंग्रेसमधेच राहतील अशी शक्‍यताही वर्तविली जात आहे. 

संबंधित लेख