लोडशेडिंगमुळे जनतेची माफी मागा : उद्धव ठाकरे

कोळशाचे नियोजन आणि व्यवस्थापन करण्यात तुम्ही चुकला असाल, कमी पडला असाल तर तसे जाहीर करून लोडशेडिंगचे चटके सहन करणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेची माफी मागा, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. `दिवे लावा' या मथळ्याखाली लिहलेल्या अग्रलेखात ठाकरे यांनी सोशल मीडियाचा संदर्भ देत `सामना'त सरकारची धुलाई केली आहे.
लोडशेडिंगमुळे जनतेची माफी मागा : उद्धव ठाकरे

मुंबई : कोळशाचे नियोजन आणि व्यवस्थापन करण्यात तुम्ही चुकला असाल, कमी पडला असाल तर तसे जाहीर करून लोडशेडिंगचे चटके सहन करणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेची माफी मागा, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. `दिवे लावा' या मथळ्याखाली लिहलेल्या अग्रलेखात ठाकरे यांनी सोशल मीडियाचा संदर्भ देत `सामना'त सरकारची धुलाई केली आहे. 

उद्धव ठाकरे लिहतात, "पूर्वाश्रमीची सगळीच सरकारे आणि राज्यकर्ते तद्दन नालायक होते. राज्य कारभार कशाशी खातात हेच त्यांना ठाऊक नव्हते. आता आम्हीच काय तो या महाराष्ट्राचा आणि देशाचा उद्धार करू, अशा गमजा मारणाऱ्या मंडळींचे बुरखे दररोजच टराटरा फाटत आहेत. विकासापासून ते ‘अच्छे दिन’पर्यंत, ‘मेक इन इंडिया’पासून ते महागाईपर्यंत आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्यांपासून महाराष्ट्राला अंधारात लोटणाऱ्या लोडशेडिंगपर्यंत प्रत्येक आघाडीवर राज्यकर्त्यांच्या अकार्यक्षमतेचे वस्त्रहरण होत असल्याचे ठाकरे यांनी नमूद केले आहे. 

उद्धव ठाकरे पुढे म्हणतात, " जनता रडगाणे ऐकण्यासाठी राज्यकर्त्यांना निवडून देत नाही. कोळशाचा पुरवठा कोणी करायचा, त्याची साठवणूक कोणी करायची, किती करायची हा सर्वस्वी सरकारचा विषय आहे. वीजनिर्मितीसाठी कोळसा आवश्यक आहे हे जर तुम्हाला ठाऊक आहे तर कोळशाचा पुरेसा साठा करून का नाही ठेवला ? टंचाई-टंचाई म्हणून तोच तो कोळसा किती दिवस उगाळत बसणार? पुन्हा कितीही उगाळला तरी शेवटी कोळसा तो कोळसाच! त्यामुळे तेच ते रडगाणे जनतेला ऐकवण्यापेक्षा एवढ्या दिवसांत कोळशाचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न का नाही केलेत? केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे तुम्हीच सत्तेवर आहात. मग अडचण कसली ? असा सवाल ठाकरे यांनी विचारला आहे. 

मोठमोठ्या जाहिराती आणि लंबीचवडी भाषणे यावर देश फार काळ चालत नसल्याचे सांगत उद्धव ठाकरे लिहतात, " लोक नंतर हीच भाषणे तोंडावर फेकून मारतात. त्याचे प्रत्यंतर राज्यकर्त्यांना आता येऊ लागले आहे. लोडशेडिंगच्या संतापातून भाजपच्या निवडणूक प्रचारातील एक जुना व्हिडीओ ‘नेट’कऱ्यांनी बाहेर काढला आहे.  त्यामुळे  ‘मुख्यमंत्र्यांनी आपलाच हा व्हिडीओ पुन्हा बघायला हवा’ अशा मल्लिनाथीसह स्वप्नाळू प्रचाराची धुलाई सोशल मीडियावर सुरू असल्याचे ठाकरे सांगतात.

भाजप खासदार किरिट सोम्मया यांचे नाव न घेता ठाकरे यांनी त्यांच्या चांगलेच तोंडसुख घेतले आहे. ते लिहतात, "सध्या गोट्या खेळणाऱ्या एका नेत्याने भांडुप-मुलुंडचे भारनियमन रद्द केल्याचा मेसेज फिरवला. त्यावरूनही सोशल मीडियावर जनता सरकारची सालटी काढत आहे. शहरे प्रकाशात, गावे अंधारात… हाच तुमचा `सबका साथ, सबका विकास' म्हणायचा का ? ग्रामीण भाग महाराष्ट्रात नाही का ? `विकासा''सोबत ``प्रकाश''ही गायब झाला काय ? असे एक ना अनेक तोफगोळे राज्यकर्त्यांवर डागले जात आहेत. 

जनतेच्या दुःखाची, त्यांच्या अडचणींची चाड बाळगली नाही तर जनता कुणालाही माफ करत नाही. सुशासन, सूक्ष्म नियोजन वगैरे शब्दांचे बुडबुडे सोडणे सोपे आहे, पण ते राज्य कारभारातही दिसायला हवेत. काळोखात बुडालेला महाराष्ट्र पाहता ते गेले आणि हे आले, पण काय बदलले? असा प्रश्न जनतेला पडू लागला आहे. 

``विकास…विकास'' म्हणून खूप ऊर बडवला, पण तो तर कुठेच दिसत नाही. म्हणून लोडशेडिंगचा अंधार केला जात आहे काय, असा सवाल लोक राज्यकर्त्यांना विचारत आहेत. महाराष्ट्राला अंधारात ढकलणाऱ्यांनो, कोळसा उगाळणे थांबवा आणि आता तरी ‘दिवे’ लावा ! अशी अपेक्षा शेवटी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com