मोदी यांनी सांगितले, पण त्यात नवीन काय ? - उद्धव ठाकरे

आपला देश बुद्धांचा आहे, महात्मा गांधींचा आहे. आस्थेच्या नावावर सुरू असलेल्या हिंसेचे समर्थन करू शकत नसल्याचे मोदी यांनी सांगितले, पण त्यात नवीन काय ? हे सर्व काही जुनेच आहे व असेच काही लाल किल्ल्यावरून बोलण्याची परंपरा आहे. आस्थेच्या नावावर हिंसा कोण करीत आहे व त्यामागची कारणे काय आहेत ? असा प्रश्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. 'सामना'मध्ये लिहलेल्या " हे कोण बोलले बोला? सैनिकांनो, बंदुका मोडा ! " या मथळ्याखाली लिहलेल्या आग्रलेखा ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लालकिल्ल्यावरून केलेल्या भाषणाचा खरपूस समाचार घेतला आहे.
मोदी यांनी सांगितले, पण त्यात नवीन काय ? - उद्धव ठाकरे

मुंबई : आपला देश बुद्धांचा आहे, महात्मा गांधींचा आहे. आस्थेच्या नावावर सुरू असलेल्या हिंसेचे समर्थन करू शकत नसल्याचे मोदी यांनी सांगितले, पण त्यात नवीन काय ? हे सर्व काही जुनेच आहे व असेच काही लाल किल्ल्यावरून बोलण्याची परंपरा आहे. आस्थेच्या नावावर हिंसा कोण करीत आहे व त्यामागची कारणे काय आहेत ? असा प्रश्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. 'सामना'मध्ये लिहलेल्या " हे कोण बोलले बोला? सैनिकांनो, बंदुका मोडा ! " या मथळ्याखाली लिहलेल्या आग्रलेखा ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लालकिल्ल्यावरून केलेल्या भाषणाचा खरपूस समाचार घेतला आहे.

उद्धव ठाकरे लिहतात, "पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून भाषण केले आहे, पण हे भाषण जगाला उद्देशून केले असावे असेच जास्त वाटते. अनेक मुद्दय़ांना त्यांनी हात घातला आहे व अत्यंत ‘संयमी’ वगैरे पद्धतीने त्यांनी संदेश दिला आहे. नेहमीचे गुद्दे गायब व फक्त मुद्देच मुद्दे असे त्यांच्या भाषणाचे स्वरूप दिसते. मावळलेले उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी मुसलमानांना देशात असुरक्षित वाटत असल्याचे वक्तव्य करताच त्यांच्यावर टीकेची झोड उठली. संघ विचारक लोकांनी अन्सारी यांना देश सोडण्याची धमकी दिली. हमीद अन्सारी यांनी व्यक्त केलेली भीती व मोदी यांनी लाल किल्ल्यावरून आस्थेच्या नावावर हिंसाचार चालणार नसल्याची घेतलेली भूमिका यात सांगड दिसतेच असल्याचे ठाकरे यांनी नमूद केले आहे.

उद्धव ठाकरे पुढे लिहतात, "देशात हिंसाचार सुरूच आहे व तो श्रद्धा आणि आस्थेच्या नावावर सुरू असेल तर मुसलमानच काय, हिंदूंनाही असुरक्षित असल्याचे वाटू लागेल. हिंदुस्थानात जातीयवाद आणि धर्मांधतेला स्थान राहणार नसल्याची गर्जना पंतप्रधान महोदयांनी केली आहे. जातीयवादाचे विष देशाचे भले करू शकणार नाही हा विचार मोदी यांनी मांडला आहे, पण मुसलमानांची धर्मांधता संपवताना इतर अल्पसंख्याक समाजातील धर्मांधतेचा सैतानही उसळून येणार नाही हे पाहावे लागेल. आर्थिक विषमता हेच जातीयवादाचे कारण आहे. ही विषमता पंतप्रधान कशी काय संपवणार ? हरयाणा, राजस्थानात जाट व महाराष्ट्रात ‘मराठा’ समाज त्यांच्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरतो तेव्हा आर्थिक व सामाजिक विषमतेची दाहकता समजून येते. गोरक्षणाच्या मुद्दय़ावर हिंदू समाजातील काही घटक हिंसक व धर्मांध झाले आहेत आणि त्यांना फक्त इशारे देऊन भागणार नसल्याचेही ठाकरे यांनी सांगितले.

मुंबईसारख्या शहरातील शाकाहार विरुद्ध मांसाहार हा वाद म्हणजे नव्या धर्मांधतेचा उदय आहे. मांसाहार करणाऱ्यांना जागा नाकारणारे बिल्डर हे कोणत्या राजकीय पक्षाचे पोशिंदे आहेत याचा शोध घेतला तर ‘‘श्रद्धेच्या नावावर हिंसाचार व मस्तवालपणा चालणार नाही’’ या पंतप्रधानांच्या भूमिकेस अर्थ उरत नाही. ‘‘वंदे मातरम्’ म्हणणार नाही’’ असे मस्तवालपणे म्हणणारे लोक देशात आहेत. नोटाबंदी आणि जीएसटी लागू करताना जो कठोरपणा दाखवला तसा कठोरपणा ‘वंदे मातरम्’च्या बाबतीत का दाखवला जात नाही ? ‘‘वंदे मातरम् ची सक्ती सहन करणार नाही’’ असे म्हणणाऱ्या लोकांवर तुमचा धाक नाही किंवा या देशात ‘चलता है’ ही मानसिकता अद्यापि मेलेली नसल्याची खंतही ठाकरे यांनी व्यक्त केली.

ते पुढे लिहतात, " पंतप्रधान म्हणतात,‘‘आम्ही देशाला नवीन ट्रकवर घेऊन जात आहोत.’’ आम्ही त्यांचे स्वागत करतो. मोदी हे शूर आहेतच, मेहनतीदेखील आहेत, पण हा ‘ट्रक’ फक्त अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनचाच असू नये. ‘नोटाबंदी’ निर्णयानंतर देशातील काळा पैसा बाहेर आला असेलही, पण आपला वायदा परदेशी बँकांत दडवलेला काळा पैसा बाहेर आणण्याचा होता व सर्व देशवासीयांच्या खात्यात किमान १४ ते १५ लाख रुपये जमा करण्याचा होता. पुढच्या दोन वर्षांत हा वायदा पुरा व्हावा ही लोकांची माफक अपेक्षा आहे व पंतप्रधान ती नक्कीच पूर्ण करतील असे सांगत ठाकरे यांनी मोदींना लक्ष केले.

ते पुढे म्हणतात, "नोटाबंदीच्या निर्णयानंतर करदात्यांची संख्या वाढली. १८ लाख नवे करदाते मिळाले, पण आतापर्यंत २० लाख लोक बेरोजगारही झाले आहेत हे लपवता येणार नाही. डोकलामपर्यंत चिनी सेना घुसली आहे व लेह-लडाखला आपला विरोध डावलून चिन्यांनी रस्ते व पूल बांधण्याचे काम सुरू केले आहे. त्या लाल माकडांना पंतप्रधानांनी इशारा दिला आहे, पण कश्मीरचा हिंसाचार व अतिरेक मोडून काढण्यासाठी आपण जो गांधी विचार लाल किल्ल्यावरून मांडला, त्यामुळे आम्हीच काय, देशही निःशब्द झाला असेल. ‘‘ना गोली से, ना गाली से… समस्या का हल होगा कश्मिरी लोगों को गले लगाने से!’’ खरंच हा महान विचार आतापर्यंत कुणाला कसा सुचला नाही याचेच आश्चर्य वाटते. आता हा विचार अमलात आणण्यासाठी एकच करा. कश्मीरातील ३७० कलम लगेच हटवून टाका. म्हणजे देशभरातील लोकांच्या झुंडीच्या झुंडी कश्मीरात जातील व तेथील लोकांच्या गळाभेटी घेतील. सैनिकांनो, बंदुका मोडा व कश्मिरींना मिठ्या मारा. पंतप्रधानांच्या जोरदार भाषणाचे आम्ही स्वागत करीत आहोत ! असे म्हणतं शेवटी चिमटाही ठाकरे यांनी काढला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com