Mumbai news - Udhav Thakare | Sarkarnama

एनडीएच्या 'त्या' बैठकीतील पक्ष म्हणजे वाऱ्यावरचीच वरात : उद्धव ठाकरे 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 17 जुलै 2017

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीआधी दिल्लीत एनडीएच्या सर्व घटक पक्षांची एक बैठक झाली. त्यासाठी सगळ्यांनाच सन्मानाने आमंत्रित करून प्रत्येकाचे मानपान करण्यात आले. आम्ही स्वतः या बैठकीस हजर राहून आमची भूमिका मांडली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीत जन्मापासून ‘भाजपा’स सोबत करणारे फक्त दोनच पक्ष त्या बैठकीत होते. ते म्हणजे शिवसेना व अकाली दल. बाकी सगळी वाऱ्यावरचीच वरात होती, असा चिमटा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढला आहे.

मुंबई : राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीआधी दिल्लीत एनडीएच्या सर्व घटक पक्षांची एक बैठक झाली. त्यासाठी सगळ्यांनाच सन्मानाने आमंत्रित करून प्रत्येकाचे मानपान करण्यात आले. आम्ही स्वतः या बैठकीस हजर राहून आमची भूमिका मांडली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीत जन्मापासून ‘भाजपा’स सोबत करणारे फक्त दोनच पक्ष त्या बैठकीत होते. ते म्हणजे शिवसेना व अकाली दल. बाकी सगळी वाऱ्यावरचीच वरात होती, असा चिमटा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढला आहे. सामनातील " कोविंद यांना शुभेच्छा " या मथळ्याखाली लिहलेल्या अग्रलेख एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहे. 

उद्धव ठाकरे लिहतात, " हिंदुस्थानच्या राष्ट्रपतिपदाची निवडणूक आज होत आहे. ‘कौन बनेगा अगला राष्ट्रपती?’ हे काही रहस्य राहिलेले नाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे रामनाथ कोविंद हेच राष्ट्रपतीपदी विराजमान होतील. काँग्रेसच्या मीरा कुमार विरुद्ध भाजपचे रामनाथ कोविंद असा हा सरळ सामना आहे. श्री. कोविंद हे भारतीय जनता पक्षाचे नेते असले तरी उमेदवार राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे आहेत. कारण फक्त ‘भाजप’ म्हणून राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकणे सोपे नाही. देशभरातील आमदार व खासदार या निवडणुकीसाठी मतदान करतात. प्रत्येक राज्याच्या विधानसभेच्या आकारमानानुसार मतांचे मूल्य ठरले जाते. अनेक मोठ्या राज्यांत आजही भाजपविरोधी सरकारे आहेत हे लक्षात घेतले तर या निवडणुकीतले एनडीएचे महत्त्व लक्षात येत असल्याची आठवणही ठाकरे यांनी करून दिली.

ठाकरे पुढे म्हणाले, " आजची राष्ट्रपतीपदाची निवडणूक ही आता एकतर्फीच होत आहे. कोविंद यांच्या विरोधात काँग्रेसने मीरा कुमार यांना जणू मारून मुटकूनच उभे केले आहे. बाबू जगजीवनराम यांची कन्या असलेल्या मीरा कुमार यांनी हिंदुस्थानी परराष्ट्रसेवेत काम केले आहे. केंद्रीय मंत्रीपदापासून लोकसभा अध्यक्षपदापर्यंत सर्व पदे भूषविली आहेत. त्यांना एक मोठा राजकीय वारसा लाभल्यामुळेच त्या इथपर्यंत भरारी मारू शकल्या. उलट रामनाथ कोविंद यांच्यामागे असा कोणताही वारसा नाही. एका सामान्य व्यक्तीस देशाचे सर्वोच्च पद लाभत आहे. त्यामुळे कोविंद यांच्यापुढे असलेली आव्हाने मोठी आहेत. त्यांना स्वतःला सिद्ध करून दाखवावे लागेल व राष्ट्रपतीपदावर रबरस्टॅम्पचा जो शिक्का लागला आहे तो पुसून काढावा लागेल. कोविंद हे सभ्य व साधे आहेत. ते ‘दलित’ असल्याचा उल्लेख वारंवार केला जातो. ते योग्य नसल्याचेही ठाकरे नमूद करतात. 

ते पुढे म्हणाले, "अमेरिका, फ्रान्स व इतर देशांच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीची जशी रणधुमाळी असते तशी आपल्या देशात नसते. अमेरिकेचे तर सर्व वातावरण अध्यक्षीय निवडणुकीत ढवळून निघते. कारण तिथे राष्ट्राध्यक्ष हा देशाचा सर्वेसर्वा असतो. त्याच्या हाती राष्ट्र घडविणाऱ्या निर्णयाचे सर्वाधिकार असतात. हिंदुस्थानात तसे नाही. इथे राष्ट्रपती हे नामधारीच आहेत. पंतप्रधानांच्या मर्जीनेच ते लढतात व जिंकून येतात. सरकारला ते मार्गदर्शन करतात. अलीकडच्या काळात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपतीपदास प्रतिष्ठा मिळवून दिली. रामनाथ कोविंद यांना ही प्रतिष्ठा वाढवावी लागेल. रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती झाल्यातच जमा आहेत. निवडणूक ही औपचारिकता आहे. श्री. कोविंद यांना आमच्या शुभेच्छा! ही ठाकरे यांनी दिल्या.

संबंधित लेख