Mumbai News Smart City Mithi River | Sarkarnama

मिठी नदीत मासे सोडा; मच्छर गेला तरी मरून जाईल - डाँ. जितेंद्र आव्हाड

ब्रह्मा चट्टे
शुक्रवार, 28 जुलै 2017

कचऱ्यामुळे मुंबई शहराचे वाटोळे झाले आहे. कचऱ्याच्या भ्रष्टाचाराने मिठी नदीचे प्रदूषण वाढले आहे. स्वच्छ भारतचे अभियान करतोय पण झोपडपट्टीवासींयांना किती पाणी देतोय? सार्वजनिक शौचालय बांधल्यानंतर त्याचे दरवाजे गायब होतात, त्याच्या खिडक्या गायब होतात मग पाणी गायब होतं, अशा सार्वजनिक शोचालयात कसं जायचं?- डाॅ. जितेंद्र आव्हाड

मुंबई : ''जुनी लोकं सांगतात आम्ही कुर्ल्यापर्यंत मासे धरायला मिठी नदीत येत होतो. आज मिठीची  काय अवस्था झालीय हे पहा. मिठी नदीत पाण्यात मासे तर सोडा मच्छर गेला तरी मरून जाईल. प्रकाशभाई मिठीचं पाणी मतदारसंघात फवारा एकही प्राणी जिवंत राहयचा नाही." मिठीचे पाणी इतकं विषारी झालं असल्याचे सांगत राष्ट्रवादीचे आमदार डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत मिठी नदीच्या प्रदुषणावर लक्ष वेधले. ते मुंबईसह राज्यातील महापालिकांच्या समस्यांवर विरोधकांच्या वतीने मांडलेल्या स्थगन प्रस्तावावर बोलत होते.

डाँ. जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले, ''मुंबईच्या एसआरएचा घोटाळा गाजला. संदिप नवले नावाच्या माणसाने गप्प बसायला दिलेल्या लाचेचे 40 लाख रुपये माध्यमांसमोर दाखवले. त्यावर काही तरी कार्यवाही होईल असे वाटले होते. पण सगळेच गप्प. आम्ही पानिपतमध्ये विश्वासराव पाहिले होते. पणे हे  विश्वासराव कमालीचे 'कार्यक्षम' अधिकारी निघाले आहेत. त्यांचे कार्य तर बघा... एका रात्रीत चारशे पाचशे फाईली उरकतात.''

ते पुढे म्हणाले, "कचऱ्यामुळे मुंबई शहराचे वाटोळे झाले आहे. कचऱ्याच्या भ्रष्टाचाराने मिठी नदीचे प्रदूषण वाढले आहे. स्वच्छ भारतचे अभियान करतोय पण झोपडपट्टीवासींयांना किती पाणी देतोय? सार्वजनिक शौचालय बांधल्यानंतर त्याचे दरवाजे गायब होतात, त्याच्या खिडक्या गायब होतात मग पाणी गायब होतं, अशा सार्वजनिक शोचालयात कसं जायचं? आम्ही स्मार्टसिटी करतोय पण या स्मार्ट सिटीत हगायाची सोय नाही. मग कसा होणार स्वच्छ भारत?'' आव्हाड यांनी असे विचारताच सभागृहात एकच हास्यकल्लोळ झाला.

संबंधित लेख