Mumbai news - Shetti's ultimatum | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

राजू शेट्टींचा सरकारला अल्टीमेटम 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

आम्ही सदाभाऊ खोत यांची पक्षातून 8 ऑगस्टलाच हाकालपट्टी केली असून त्यांचा आमच्या पक्षाशी काहीही संबंध राहिलेला नाही. त्यामुळे त्यांच्या मंत्रीपदाचाही आमच्या संघटनेशी संबंध उरला नसल्याने त्यासाठी सरकारची आणि भाजपाचीही भूमिका नेमकी काय आहे ते स्पष्ट करावे आणि याची माहिती आम्हाला आठ दिवसांत द्यावी.

- खासदार राजू शेट्टी

मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी नेते व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे मंत्रीपद घालविण्यासाठी खासदार राजू शेट्टी यांनी कंबर कसली असून त्यासाठी त्यांनी सरकारला खोत यांच्यावरील कारवाईसाठी आठ दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. आम्ही खोत यांची पक्षातून 8 ऑगस्टलाच हाकालपट्टी केली असून त्यांचा आमच्या पक्षाशी काहीही संबंध राहिलेला नाही. त्यामुळे त्यांच्या मंत्रीपदाचाही आमच्या संघटनेशी संबंध उरला नसल्याने त्यासाठी सरकारची आणि भाजपाचीही भूमिका नेमकी काय आहे ते स्पष्ट करावे आणि याची माहिती आम्हाला आठ दिवसांत द्यावी, अशी मागणी करणारे एक पत्र खासदार शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. 

सदाभाऊ खोत यांच्यामुळे राज्यात गेल्या काही महिन्यांपासून भाजपा आणि स्वाभिमानी संघटनेत बरीच मोठी दरी निर्माण झाली आहे. त्यातच शेट्टी यांच्या या पत्रामुळे येत्या आठ दिवसांत खोत यांचे मंत्रीपद जाईल की, त्यांचे भाजपातच पुनर्वसन केले जाईल याविषयी येत्या आठ दिवसांत निर्णय होण्याची शक्‍यता यामुळे निर्माण झाली असून त्यानंतर दोन्ही पक्षात बऱ्याच घडामोडी होणार असल्याचे संकेतही खासदार राजू शेट्टी यांनी `सरकारनामा'शी बोलताना दिले. 

आम्ही भाजपासोबत निवडणूकपूर्व झालेल्या समझोत्यानुसार त्यांनी आम्हाला विधानपरिषदेसह एक मंत्रीपद देण्याचे कबूल केले होते. त्यापार्श्‍वभूमीवर खोत यांना मंत्रिपद मिळाले. मात्र आता आम्ही खोत यांची पक्षातून हकालपट्टी केली असल्याने याविषयी ते आमच्या पक्षाचे सदस्य आणि मंत्रीही उरले नाहीत. यामुळे भाजपाने आणि सरकारनेही याविषयी आपली भूमिका येत्या आठ दिवसांत आम्हाला कळवावी अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्र्यांना दिले असून त्या नंतर आमची काही भूमिका आम्ही स्पष्ट करणार असल्याचेही शेट्टी म्हणाले.
 
दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळात आपल्याला मंत्रिपदाची ऑफर दिली जातेय, याविषयी विचारणा केली असता त्यांनी सांगितले, की मागील साडेतीन वर्षांत मी कधीही मंत्रीपद मागितलेले नाही, जेव्हा-जेव्हा मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू होतात, त्यावेळी माझ्याबद्दल अशा बातम्या पेरत असून आपल्याला आता मंत्रिपदासाठी स्वारस्य नाही. केवळ शेतकऱ्यांचे प्रश्‍न मार्गी लावणे यावरच आपला फोकस असल्याचेही त्यांनी सांगितले.

संबंधित लेख