Mumbai news - Presidential election | Sarkarnama

राष्ट्रपती निवडणूक; मुख्यमंत्री शक्तिप्रदर्शनाच्या तयारीत

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 15 जुलै 2017

राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद आजपासून मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते आमदारांच्या भेटीगाठी घेणार आहेत. शिवसेनेची 63 मते निश्‍चित आहेत. अपक्ष आमदार व राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील आमदारांची अतिरिक्त मते वळवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शक्तिप्रदर्शन करण्याच्या प्रयत्नात आहेत. तसेच, या दौऱ्यात कोविंद "मातोश्री'वर जाणार नसल्याचे समजते.

मुंबई : राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद आजपासून मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते आमदारांच्या भेटीगाठी घेणार आहेत. शिवसेनेची 63 मते निश्‍चित आहेत. अपक्ष आमदार व राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील आमदारांची अतिरिक्त मते वळवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शक्तिप्रदर्शन करण्याच्या प्रयत्नात आहेत. तसेच, या दौऱ्यात कोविंद "मातोश्री'वर जाणार नसल्याचे समजते.

विश्‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉंग्रेसमधील नऊ तर राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील पाच आमदार सत्ताधाऱ्यांच्या संपर्कात आहेत. काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षातील आमदार संपर्कात असल्याचे चित्र सत्ताधारी पक्षाने निर्माण केले होते. आता हे आमदार राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनिमित्ताने निष्ठा प्रकट करण्याची शक्‍यता आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे आमदार पक्षादेशाचे पालन करून यूपीएच्याच उमेदवाराला राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करतील असे सांगितले जात आहे. मात्र या निवडणुकीनंतर विरोधी बाकांवरून छुपे मतदान करणारे आमदार खुलेपणाने समोर येऊन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पाठीशी उभे राहतील, असे चित्र आहे. यासंदर्भातील व्यूहरचना तयार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

भाजपचे आमदार व खासदारांना सोमवारच्या मतदानासाठी मुंबईत बोलावले आहे. जोरदार पाऊस असल्याने त्यांना मुंबईत आधीच दाखल होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्यासह शुक्रवारी मुंबईत छोट्या दौऱ्यावर येणार आहेत. विमानतळावर उतरल्यावर ते थेट गरवारे सभागृहात नियोजित बैठकीला जातील. शिवसेनेचे आमदार व खासदारांनाही या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले आहे. सार्वजनिक उपक्रममंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना गटाचे नेते म्हणून जबाबदारी आहे.

अपक्ष आमदारांचीही घेणार भेट 
अपक्ष आमदारांचा एक गट रवी राणा यांच्या नेतृत्वात रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन त्यांना समर्थन देईल. या गटात शिरीष चौधरी, विनायक पाटील, गणपत गायकवाड, महेश लांडगे आणि मनसेचे शरद सोनवणे यांचा समावेश असेल. कोविंद यांच्यासारख्या उच्चविद्याविभूषित व्यक्‍तीने राष्ट्रपती व्हावे ही आमची इच्छा असल्याचे राणा यांनी सांगितले. फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून काही आमदारांसह त्यांना पाठिंबा देणार असल्याचे राणा यांनी सांगितले. 

संबंधित लेख