Mumbai news - political leaders doing Yoga | Sarkarnama

राजकीय नेत्यांचा योग दिनात कृतिशील सहभाग

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 21 जून 2017

राजकीय नेत्यांची आजची सकाळ सुरू झाली ती आसने आणि प्राणायामाने. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज सर्वत्र उत्साहात सार्वजनिकरित्या योग करण्यात आला. त्यात राजकीय क्षेत्रातील मात्तबरांनीही उत्साहाने भाग घेतला. केवळ भागच घेतला नाही, तर नेत्यांनी स्वतः आसने आणि प्राणायाम करीत कृतिशील सहभाग नोंदवला.

पुणे : राजकीय नेत्यांची आजची सकाळ सुरू झाली ती आसने आणि प्राणायामाने. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सर्वत्र उत्साहात सार्वजनिकरित्या योग करण्यात आला. त्यात राजकीय क्षेत्रातील मात्तबरांनीही उत्साहाने भाग घेतला. केवळ भागच घेतला नाही, तर नेत्यांनी स्वतः आसने आणि प्राणायाम करीत कृतिशील सहभाग नोंदवला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू, प्रकाश जावडेकर, मुख्तार अब्बास नक्वी, मनेका गांधी, डॉ. जितेंद्र सिंग आदी नेत्यांनी योग करतानाची छायाचित्रे सोशल मिडियावर प्रकाशित केली आहेत.

पंतप्रधान मोदी यांनी लखनौमध्ये आयोजिलेल्या योग दिनाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देताना ते म्हणाले, की योग अनेकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. भारताबरोबरच जगभर योग मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध आहे. अनेक देश योगामुळे भारताशी जोडले जात आहेत. योगाला आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून मान्यता मिळाल्यानंतर गेल्या तीन वर्षांत अनेक योग प्रशिक्षण संस्था निर्माण झाल्या आहेत. योगशिक्षकांना मागणी वाढली आहे. प्रशिक्षण घेऊन रोजगार निर्माण झाला आहे. त्यात भारतीयांना प्राधान्य मिळत आहे. तंदुरुस्तीपेक्षाही वेलनेससाठी योग चांगले माध्यम आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी दिलेल्या संदेशात म्हटले आहे, की अनेक देश योग दिनात सहभागी होत आहेत. योग केवळ आपल्याला तंदुरुस्त बनवत नाही, तर आपली कार्यक्षमता आणि आत्मविश्वासही वाढवतो. त्यामुळे योगाला आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनवा. विकासाच्या वाटेवर चलताना तंदुरुस्त नागरिक, आरोग्यदायी समाज आणि आरोग्यपूर्ण राष्ट्रासाठी आवश्यक आहे. त्यामुळे योग हीच जगाच्या आरोग्याची गुरुकिल्ली आहे.     

संबंधित लेख