Mumbai News Maratha-morcha-CM | Sarkarnama

मुंबईतील मराठा मोर्चाला शांत करण्यात मुख्यमंत्र्यांचे डावपेच ठरले यशस्वी 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

मुंबईतील लाखोंच्या मराठा मोर्चाच्या शिष्टमंडळापुढे काय आश्‍वासन द्यायचे याचा अभ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच करताना, कोणताही नेता नसलेल्या मराठा क्रांती मोर्चामध्ये भाजपचे खासदार संभाजी राजे, कॉंग्रेस नेते आमदार नारायण राणे आणि माथाडी नेते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार नरेंद्र पाटील हे पुढारी म्हणून पुढे कसे आले हा प्रश्‍न सामान्य मराठा समाजातील कार्यकर्त्यांना पडला असला तरी, या नेत्यांचा सहभाग फडणवीस यांच्या पथ्यावर पडल्याचे बोलले जाते.

मुंबई : मुंबईतील लाखोंच्या मराठा मोर्चाच्या शिष्टमंडळापुढे काय आश्‍वासन द्यायचे याचा अभ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच करताना, कोणताही नेता नसलेल्या मराठा क्रांती मोर्चामध्ये भाजपचे खासदार संभाजी राजे, कॉंग्रेस नेते आमदार नारायण राणे आणि माथाडी नेते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार नरेंद्र पाटील हे पुढारी म्हणून पुढे कसे आले हा प्रश्‍न सामान्य मराठा समाजातील कार्यकर्त्यांना पडला असला तरी, या नेत्यांचा सहभाग फडणवीस यांच्या पथ्यावर पडल्याचे बोलले जाते.
 

कोपर्डीतील घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि मराठा आरक्षणाचा मुख्य मुद्दा घेवून राज्यात 57 ठिकाणी मराठा क्रांती मुक मोर्चे निघाले होते. देशाच्या आर्थिक राजधानीत 9 ऑगस्ट रोजी निघणाऱ्या मोर्चात मराठा समाजातील तरुण या स्वयंस्फुर्तीने गावाकडून मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याचे दिसून आले. या मोर्चातील तरुणांचा समाजातील आमदार, खासदार यांच्यावर रोष असल्याचे दिसून आले होते. त्यामुळेच, भाजप आमदार आशिष शेलार, नितेश राणे, नरेंद्र पाटील यांना संतप्त तरुणांच्या भावनांचा आझाद मैदानात अनुभव आला होता. 

या सर्व पार्श्‍वभूमीवर मुंबईतील मराठा समाजाच्या मोर्चाला राज्य सरकार म्हणून योग्य रितीने सामोरे गेलो नाही तर नामुष्की झाली असती, याची जाणीव मुख्यमंत्री फडणवीस यांना होती. त्यामुळे, मराठा क्रांती मोर्चा यशस्वी व्हावा यासाठी आयोजक प्रयत्न करत असताना, मराठा समाजाच्या मागण्याबाबत कितपत तडजोड करणे शक्‍य आहे, याचा विचार मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेले खासदार संभाजीराजे यांचा मोर्चातील प्रमुख सहभाग हा सरकारविरोधी धार कमी करण्यासाठी कारणीभूत ठरल्याचे बोलले जाते. त्यात, गेल्या काही दिवसापुर्वी भाजप प्रवेशाच्या रांगेत असलेल्या कॉंग्रेस नेते नारायण राणे यांचेही महत्व या मोर्चाच्या निमित्ताने वाढल्याचे दिसून आले. भाजपमध्ये नारायण राणे यांना एन्ट्री कधी मिळणार हे गुलदस्त्यात असले तरी, मराठा मोर्चाच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चर्चा सुरु होती. त्यात नारायण राणे हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या शेजारी बसले होते, त्यातून राणे यांना पुन्हा महत्व निर्माण झाले असून, आझाद मैदानात नितेश राणे, नरेंद्र पाटील आणि संभाजी राजे यांना व्यासपीठावर पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, या नेत्यांबरोबर मुख्यमंत्र्यांनी आधीपासून चांगला सुसंवाद चांगला ठेवला होता, अशी माहिती आता पुढे येत आहे. 

मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने राज्य सरकारकडे केलेल्या या मागण्यांबाबत सकारात्मक तोडगा काढल्याचा संदेश देण्यात मुख्यमंत्री यशस्वी ठरले असले तरी, मराठा समाजातील तरुणांमध्ये आश्‍वासनाची कधी पुर्तता होईल, अशी सार्वत्रिक भावना आहे.

संबंधित लेख