Mumbai news - Maratha morcha - Azad Maidan | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

मराठा मोर्चासाठी आझाद मैदानाचे प्रवेशद्वार केले मोठे

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

भायखळ्याहून आझाद मैदानापर्यंत येणाऱ्या मराठा मोर्चासाठी महानगरपालिकेने आझाद मैदानाचे प्रवेशद्वार मोठे केले असून बॉम्बे जिमखानासमोरील जागेसह मैदान खुले केले आहे. मोर्चाच्या मार्गावर तात्पुरती शौचालये व पिण्याच्या पाण्याचीही सोय आहे.

मुंबई : भायखळ्याहून आझाद मैदानापर्यंत येणाऱ्या मराठा मोर्चासाठी महानगरपालिकेने आझाद मैदानाचे प्रवेशद्वार मोठे केले असून बॉम्बे जिमखानासमोरील जागेसह मैदान खुले केले आहे. मोर्चाच्या मार्गावर तात्पुरती शौचालये व पिण्याच्या पाण्याचीही सोय आहे.

आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्यांसाठी महापालिकेच्या मुख्यालयासमोरील प्रवेशद्वाराचा उपयोग केला जातो. मात्र मोर्चातील सहभागींची संख्या लक्षात घेता हे प्रवेशद्वार अपुरे पडणार असल्याने हजारीमल सोमानी मार्गावरील रेलिंग काढून मैदानात जाण्याचा मार्ग मोठा करण्यात आला आहे. 

सीएसटी ते चर्चगेट दरम्यान प्रवास करणारे हजारो पादचारी या मार्गाचा रोज उपयोग करतात. आझाद मैदानात सध्या मेट्रो तीनच्या कामासाठी मोठा भाग मेट्रो रेल महामंडळाच्या ताब्यात आहे. मोर्चातील लाखो सहभागकर्त्यांसाठी मैदानाची जागा अपुरी पडण्याची शक्यता आहे. बॉम्बे जिमखान्यासमोरच्या जागेचाही वापर करता येईल. ही जागा यापूर्वीच सर्वासाठी खुली असल्याचे फलक लावले गेले आहेत.

पालिका आयुक्त अजोय मेहता आणि पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्या संयुक्त बैठकीत मैदानाचे प्रवेशद्वार मोठे करण्याची तसेच जिमखान्यासमोरील जागेचा वापर करण्याबाबत चर्चा झाली.

मोर्चामधील सहभागकर्त्यांसाठी तात्पुरत्या  २० शौचकूपांची सोय असलेली १४ तात्पुरती शौचालये ठेवण्यात आली आहेत. वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान, जेजे रुग्णालय, सीएसटी स्टेशन, आझाद मैदान येथे वैद्यकीय सेवा मराठा मोर्चा शांततेत पार पाडण्यासाठी नियोजन - मराठा क्रांती मूक मोर्चा शांतता व शिस्तीत पार पडावा यासाठी जवळपास वीस हजार स्वयंसेवकांनी या करिता नोंदणी केली आहे. नोंदणीचे काम सकाळपासून दादर येथील शिवाजी मंदिरात सुरू होते. 

मराठा क्रांती मोर्चाचे संपर्क कार्यालय या ठिकाणी असल्यामुळे शिवाजी मंदिरला छावणीचे स्वरूप आले आहे. मुंबईतून अंदाजे सहा हजार, नवी मुंबईतून तीन हजार तर पुणे आणि कोल्हापूर येथून प्रत्येकी एक हजार कार्यकर्त्यांची स्वयंसेवक म्हणून ऑनलाईन नोंदणी केली आहे.  उर्वरित महाराष्ट्रातून अंदाजे दहा हजार स्वयंसेवक मंगळवारी रात्री मुंबईत दाखल झाले. मोर्चाच्या नियोजनासाठी २३ समित्या व उपसमित्या तयार करण्यात आल्या आहेत. 

आरोग्य, गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्था, पार्किंग सुविधा अशा कामासाठी या समित्या कार्यरत असतील अनेक आमदारांनी मुंबईबाहेरून आलेल्या स्वयंसेवकांच्या निवासाची व्यवस्था केली आहे. आमदार निवासातच स्वयंसेवकांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

उस्मानाबादवरून आलेल्या स्वयंसेवकांसाठी नवी मुंबईतील तेरणा वैद्यकीय महाविद्यालय खुले करण्यात आले आहे. माजी मंत्री कमलकिशोर कदम यांनी देखील त्यांच्या एमजीएम महाविद्यालयात स्वयंसेवकाच्या राहण्याची सोय केली आहे. डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये मोर्चात सहभागी होणाऱ्यांसाठी न्याहारीची व्यवस्था करण्यात आली आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पार्किंगची सुविधा करण्यात आली आहे. १०० रुग्णवाहिका आणि डॉक्टरांचे पथकही मोर्चादरम्यान कार्यरत राहणार आहे.

संबंधित लेख