सुसाट भाजप, गोंधळलेली शिवसेना आणि भरकटलेले विरोधक 

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे विश्लेषण करताना विधानसभेत शिवसेना गोंधळलेली तर विरोधक भरकटले भाजप मात्र सुसाट सुटल्याचे गेल्या आठवड्यात दिसले.
सुसाट भाजप, गोंधळलेली शिवसेना आणि भरकटलेले विरोधक 

मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे विश्लेषण करताना विधानसभेत शिवसेना गोंधळलेली तर विरोधक भरकटले भाजप मात्र सुसाट सुटल्याचे गेल्या आठवड्यात दिसले. आधिवेशन सुरू होवून पहिला आठवडा संपलादेखील!

पावसाळी आधिवेशनाचे बिगूल वाजले अन् कामकाजाला सुरवात होताच पहिल्या दिवशी कागदपत्रे पटलावर ठेवण्याअगोदरच विरोधकांनी कर्जमाफीवरून चर्चेची मागणी केली होती. राष्ट्रवादी व काँग्रेसच्या सदस्यांनी कर्जमाफी मागणीच्या घोषणा करत सभात्याग केला. शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, `कर्जमाफीच्या सर्व प्रकारच्या चर्चेला तयार आहे. कर्जमाफीसाठी पुरवणी मागण्यात वीस हजार कोटी रूपयांची तरतुद केली आहे. विरोधक सांगतील तेव्हा याबाबत मी सांगायला तयार आहे,' स्पष्ट केले. अन् विरोधकांनी तलवारी म्यान केल्या. अधिवेशनाचा पहिला दिवस शोकप्रस्तावात गेला.

विधानसभेच्या दुसऱ्या दिवसाचे कामकाज सुरू होताच कर्जमाफीच्या मागणीवरून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी प्रश्नोत्तरे रद्द करुन नियम ५७ अन्वये चर्चेची मागणी केली. अध्यक्षांनी मागणी फेटाळल्यानंतर विरोधक संतापले. या वेळी विरोधकांनी कर्जमाफीची चर्चेची मागणी लावून धरली. शेवटी सत्ताधाऱ्यांच्या वतीने मांडण्यात आलेल्या नियम 297 अन्वये शेतकरी कर्जमाफीबद्दल सरकारच्या अभिनंदनाचा प्रस्तावात सुधारणा सुचवण्याची सुचना अध्यक्षांनी केली. अन् विरोधकांनी पुन्हा आपल्या तलवारी म्यान केल्या. नाही म्हणायला विरोधक आक्रमक झाले होते. पण त्यात नेहमीची धार नव्हती. या सगळ्या प्रकारात शिवसेनेचे आमदार मात्र कमालीचे गोंधळले होते. 

शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे `सामना'मधून कर्जमाफीच्या निर्णयावर "शिवसेनेचे अजब" सरकार येणार म्हणतं टीका करतात अन् शिवसेना आमदार लाचारीने अभिनंदनाच्या प्रस्तावाला पाठिंबा देतात असा टोला राष्ट्रवादीचे गटनेते आमदार जयंत पाटील यांनी शिवसेना आमदारांना लगावला. शिवसेनेचे प्रतोद आमदार सुनिल प्रभू मुंबईच्या प्रश्नावर अक्रमक झालेले दिसले. मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर काय करायचे सरकारचे अभिनंदन की विरोध हे तेही स्पष्ट करू शकले नाहीत. त्यामुळे शिवसेनेने सरसकट कर्जमाफीवरून राज्यभरात सभा घेत उगारलेला "बाण" भात्यात परत घेत शेवटी सरकारचे अभिनंदन केले. कर्जमाफीवरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. मात्र मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावर असमाधान व्यक्त करत सभात्याग करणे टाळले अन् तिथेच संपुर्ण अधिवेशनाचा आगामी कार्यक्रमाचा अंदाज आला. विरोधकांच्या समन्वयाचा अभाव स्पष्टपणे जाणवला. 

अधिवेशनात येथून पुढे लुटूपुटूची ही लढाई चालल्यास अश्चर्य वाटायला नको. कारण काँग्रेस अन् राष्ट्रवादीचे नेते अधिवेशनाच्या पुर्वसंध्येलाच एकमेकाविरोधात जात वेगवेगळ्या पत्रकार परिषदा घेतल्या होत्या. त्यामुळे संपुर्ण पहिल्या आठवड्यात विरोधक भरकटले दिसले.

विधानसभेच्या कामकाजला तिसऱ्या दिवशी सुरवात होताच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नियम 57 अन्वये स्थगन प्रस्तावाद्वारे चर्चेची मागणी केली होती. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी चर्चेचा प्रस्ताव फेटाळला. त्यावर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली. यावेळी निवेदन करताना अर्थमंत्री सुधिर मुनगंटीवार म्हणाले, "घाटकोपर दुर्घटना गंभिर आहे. मुख्यमंत्र्यांनी भेट देत चौकशीचे आदेश दिले आहेत. आम्ही चर्चेच्या तयारीत आहोत. सरकारच्या वतीने सविस्तर निवेदन करू." या उत्तरावर विरोधकांचे समाधान झाले नाही. विरोधी आमदारांनी गोंधळ करण्यास सुरवात केली. परिणामी विधानसभा पहिल्यांदा 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आली. त्यानंतर कामकाज सुरू होताच विरोधकांनी गोंधळ सुरूच ठेवल्यामुळे दुसऱ्यांदा 10 मिनिटांसाठी व तिसऱ्यांदा 15 मिनिटांसाठी विधानसभा तहकूब केली. शेवटी विरोधकांच्या वतीने स्थगन प्रस्तावावर घाटकोपर घटनेवर विरोधकांनी सरकारवर जोरदार प्रहार केला. मात्र, यावेळी विरोधकांच्या रडारवर शिवसेना होती. कारण मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या दुर्लक्षामुळेच घाटकोपर येथिल इमारत कोसळली असून ज्याच्यामुळे इमारत कोसळली तो शिवसेनेचा पदाधिकारी असल्याचा आरोप विरोधकांनी केला. यावेळी भाजपच्या आमदारांनी शिवसेनेवरच निशाणा साधला. शिवसेनेचे आमदार यावर जोरदार प्रत्युत्तर देतील असे वाटले होते. मात्र शिवसेनेचे विधानसभेतील प्रतोद सुनिल प्रभू यांनी, मुंबई महापालिकेकडे नागरिकांनी लेखी तक्रार दाखल केलेल्या नव्हत्या असा दावा करत तांत्रीक मुद्द्यावर महापालिकेची बाजू लावून धरत मुंबई मनपाला वाचवण्याचा प्रयत्न केला.

चौथ्यादिवशी प्रश्नोत्तराच्या तासावेळी पुणे जिल्ह्यातील सिंहगड किल्ल्याच्या घाट रस्त्यावरील दरडीबाबत भाजप आमदार बाबूराव पाचर्णे यांनी प्रश्न उपस्थीत केला. त्यावरून चर्चेत विधानसभेत विरोध - सत्ताधारी आमदारांमध्ये खडाजंगी झाली. विधानसभेच्या पावसाळी आधिवेशनाचा चौथा दिवसी प्रश्नोत्तराच्या तासाला सुरवात झाली ती शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून पंढरपूरचे आमदार भारत भालके यांनी सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळनिधीची घोषणा होवूनही पैसे मिळाले नसल्याची समस्या तारांकित प्रश्नांद्वारे मांडली होती. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विमा हप्ता किती भरला ? त्याचा परतावा विमा कंपन्यांनी किती दिला याची आकडेवारी मांडा असा अग्रह राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी धरला. राज्यातील शेतकऱ्यांनी पाच हजार कोटी रूपये विमा कंपन्यांकडे भरले आहेत. त्यातील किती रक्कम नुकसान दिली हे तपासा असायला हवे अशी मागणी विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांनी केली होती. त्यानंतर अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पीक विम्यावरून मुख्यमंत्र्यांना विचारणा केली होती. 

" येत्या ३१ जुलै रोजी पीकविमा भरण्याची मुदत संपत आहे. मात्र, पीकविमा ऑनलाईन भरण्याच्या पध्दतीमुळं बँकांच्या बाहेर शेतकऱ्यांच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत. पुढीचे दोन दिवस सलग सुट्टीमुळे विधीमंडळाचं कामकाज बंद राहणार आहे. त्यामुळं मुख्यमंत्री महोदय मुदतवाढी संदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्या व पीकविमा भरण्यासाठी आणखी काही दिवस मुदत वाढ द्या,"  अशी मागणी अजित पवार यांनी शुक्रवारी विधानसभेत केली होती. त्यावेळी नेहमीप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी, पीक विमा योजनी केंद्र सरकारची योजना आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना 31 जुलै पर्यंत पैसे भरू द्या. योग्यवेळी मुदतवाढीचा निर्णय जाहिर करू, असे अश्वासन विधानसभेत दिले होते. काल पीक विमा भरताना रांगेत नांदेड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तर बीड येथे पोलीसांनी शेतकऱ्यावर लाठीमार केला. अनेक ठिकाणी आजही बँकांसमोर रांगा आहेत. त्यामुळे पीकविम्याच्या मुद्द्यावर येत्या आठवड्यात चांगलाच गदारोळ होण्याची शक्यता आहे.

अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यातील शेवटच्या दिवशी नियम 293 अन्वये मुंबईसह राज्यातील महापालिकांच्या समस्यांवर विरोधकांच्या वतीने स्थगन प्रस्ताव मांडण्यात आला. त्यावेळी विरोधकांसह भाजप आमदारांनी शिवसेनेला चिमटे काढण्याची एकही संधी सोडली नाही. त्याचबरोबर आमदारांनी मनोरा आमदार निवासाच्या समस्याही पोटतिडकीने मांडल्या. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सदस्यांच्या अपात्रतेच्या सुधारणा विधयकांयावरून सत्ताधारी विरोधकांनी एकमेकांना चांगलेच चिमटे काढले. शुक्रवारी विधानसभेत वंदे मातरम् गीत गाण्यावरून गदारोळ झाला. सत्ताधारी आमदार आणि विरोधी आमदार प्रचंड अक्रमक झाले होते. एकमेकाकडे दोषारोप करत सदस्यांनी गोंधळ घातला. सत्ताधारी विरोधक आमने सामने येत एकमेकाच्या समोर भिडतात की काय अशी परिस्थीती निर्माण झाली होते. यावेळी एकनाथ  खडसे व अबू आझमी यांच्यात खडाजंगी झाली. यामुळे नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरची चर्चा बाजूला पडून वंदे मातरम् या एकाच विषयाभोवती फिरली. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मात्र शिवसेनेचे आमदार वंदे मातरम् वरून अक्रमक झाले. त्यामुळे मुलभूत प्रश्नांपेक्षा प्रतिकात्मक राजकारणाला आपल्याकडे जास्त महत्व दिले जाते हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com